पनवेल मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची निर्मिती

पनवेल : पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल येथे आदई सर्कल जवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित केले जात आहे. या प्रशिक्षण केंद्रास आयुक्त गणेश देशमुख आणि माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनी नुकतीच भेट देऊन कामाचा आढावा घेतला.

याप्रसंगी महापालिका शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उपअभियंता सुधीर सांळुखे,  बांधकाम विभागातील अभियंता, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सध्या या प्रशिक्षण केंद्राच्या ग्राऊंडचे आणि पॅव्हेलियनचे काम प्रगतीपथावरती असून येत्या काही महिन्यांमध्ये सदर काम पूर्ण होईल.

क्रिकेट लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा खेळ आहे. या खेळामध्ये प्राविण्य मिळवायचे असेल तर मुंबईमधील प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घ्यावा लागतो. त्यासाठी येणारी अडचण लक्षात घेऊन पनवेल महापालिका कार्यक्षेत्र तसेच नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील किक्रेटपटुंना शास्त्रशुध्द पध्दतीने क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे या हेतुने पनवेल महापालिकेने प्रभाग समिती-ब अंतर्गत नवीन पनवेल (पूर्व) सेवटर-११ मधील भूखंड क्र.२८ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र (ॲकॅडमी) विकसीत करण्याचे काम सुरु केले आहे.

सदरचे प्रशिक्षण केंद्र कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांच्या संस्थेस चालविण्यात देण्यात आले आहे. या कामाची अंदाजित रक्कम ८.८४ कोटी रुपये असून सुमारे २९.८९९ चौ.मी. (७.४७ एकर) क्षेत्रफळ जागेमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक वर्षी १० ते १९ वयोगटातील किमान १०० विद्यार्थाना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पनवेल शहर तसेच नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील भविष्यातील क्रिकेटपटुसांठी सदर प्रशिक्षण केंद्र अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

करावे येथे ‘नमो चषक' क्रिकेट स्पर्धेचा थरार