नवी मुंबईकर विद्यार्थ्यांमधील कौशल्याला इनोव्हेटिव्ह प्रोगाम ट्रेनींग द्वारे मुक्त वाव

नवी मुंबई : मिशन इनोव्हेशन प्रोग्राम द्वारे विदयार्थ्यांच्या कल्पकतेला नवी दिशा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील १६ शाळांमध्ये जाऊन ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना इनोव्हेटिव्ह प्रोग्राम ट्रेनिंग देण्यात आलेले आहे. यामध्ये डॉ.डी.वाय.पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर यांनी महत्वाची भूमिका बजावलेली असून याकामी प्रा. आशिष जाधव आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्फत पुढाकार घेण्यात आलेला आहे.

यामध्ये मुलांच्या विज्ञानविषयक आवडीला योग्य दिशा देऊन त्यांच्यातील विज्ञान-तंत्रज्ञान याबाबतच्या विविध संकल्पनांना मुक्त वाव देण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील कौशल्याचा उपयोग करुन उपलब्ध संसाधनांमध्ये प्रकल्प निर्मिती करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे.

या उपक्रमाकरिता ग्रॉक लर्निंग प्रा.लि. यांच्या मार्फत एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स यावर आधारित शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात एमबीएस हायस्कुल ईश्वरनगर दिघा (२० विद्यार्थी), आदर्श हिंदी विद्यालय-दिघा (२० विद्यार्थी), साईनाथ हिंदी विद्यालय-वाशी (१२० विद्यार्थी), तेरणा विद्यालय-नेरुळ (१८ विद्यार्थी), तेरणा माध्यमिक-नेरुळ (३५ विद्यार्थी), शिरवणे विद्यालय-नेरुळ (४० विद्यार्थी), नवी मुंबई विद्यालय कोपरी (२०विद्यार्थी), अंजुमन इस्लाम उर्दू स्कुल-तुर्भे (४९ विद्यार्थी), आयसीएल स्कुल-तुर्भे (१८ विद्यार्थी), नुतन मराठी विद्यालय-नेरुळ (३० विद्यार्थी), डॉ. एस. व्ही. सामंत हायस्कुल-तुर्भे (२० विद्यार्थी), हिेंदमाता विद्यालय-दिघा (२० विद्यार्थी), श्रीराम विद्यालय-ऐरोली (२० विद्यार्थी), शिक्षक प्रशिक्षक विद्यालय-नेरुळ (५७ विद्यार्थी), गोल्ड क्रेस्ट हायस्कुल-वाशी (२५विद्यार्थी), आयसीएल हायस्कुल-वाशी (३०विद्यार्थी) अशा प्रकारे एकूण ५४२ विदयार्थ्यांनी इनोव्हेटिव्ह प्रोग्राम ट्रेनिंगचा लाभ घेतला.

शाळा शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यापूर्वी विविध शाळांमधील २०० हून अधिक विज्ञान शिक्षकांना  डी. वाय. पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने भविष्यातील प्रगतीचा वेध घेऊन आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सवर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे डी.वाय.पाटील इंजिनिअरींग कॉलेजच्या ३० विद्यार्थ्याना प्रशिक्षित करुन मेंटॉर बनविण्यात आले होते.

विद्यार्थी प्रशिक्षणानंतर नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने डॉ.डी.वाय.पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर आणि ग्रॉक लर्निंग यांच्या सहयोगातून विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्वच्छ इनोव्हेशन टेक्नोलॅाजी स्पर्धा आयोजित करणार असल्याची माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली आहे.

दरम्यान, यापुढील काळात आणखी शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जाणीवा उंचावण्यासाठी इनोव्हेटिव्ह प्रोग्राम ट्रेनिंग उपक्रमाचे आयोजन केले जाणार असून या विद्यार्थ्यांमधील कौशल्याचा उपयोग नवी मुंबईच्या प्रगतीशील वाटचालीत होणार आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पनवेल महापालिकेच्या शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान'