१४ जानेवारी रोजी ‘नमो' खारघर मॅरेथॉन

आठ गटात स्पर्धा; २ लाख रुपयांची बक्षिस

पनवेल : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नमो चषक' अंतर्गत येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी ‘एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी', असे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन ‘नमो खारघर मॅरेथॉन-२०२४ स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे.

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेला विकास याबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘नमो चषक' स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध कला आणि क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. त्या अंतर्गत खारघर मॅरेथॉन, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, सायक्लोथॉन, कॅरम, बुध्दीबळ या क्रीडा स्पर्धा तसेच नृत्य, चित्रकला, गायन, वक्तृत्व या कला स्पर्धांचे सुध्दा आयोजन करण्यात येत आहे. ‘नमो चषक' अंतर्गत स्पर्धांमुळे युवा पिढीला कला आणि क्रीडा स्पर्धेकडे आकृष्ट करता येणार असून, पनवेल विधानसभा क्षेत्रात २५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांना सहभागी करण्याचे उद्दिष्ट आमदार प्रशांत ठाकूर यांनी नजरेसमोर ठेवले  आहे.

येत्या १४ जानेवारी रोजी खारघर सेक्टर-१९ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून खारघर मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून, पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी ९ वाजता होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पनवेल महापालिका सभागृह नेते आणि स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सेलिब्रिटींची मांदियाळी लाभणार आहे.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली २००६ साली ‘पनवेल मॅरेथॉन'च्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे मॅरेथॉन स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली. यापूर्वीच्या मॅरेथॉन स्पर्धा ‘रन अगेंस्ट एडस', ‘पर्यावरणाच्या संरक्षणासाठी', ‘एक धाव आरोग्यदायी पनवेलसाठी', ‘रन फोर निर्भय भारत', ‘सदभावना दौड', ‘एक धाव पाणी बचतीसाठी', ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव', ‘एक धाव महिलांच्या सन्मानासाठी', ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झक्शन',  ‘हम फिट तो इंडिया फिट', ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी' अशी घोषवाक्य घेवून यशस्वीरित्या उत्कृष्ठ आयोजनाने स्पर्धा पार पडल्या आहेत. सामाजिक, शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट आणि सुयोग्य नियोजन तसेच वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिध्द असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. यंदाची मॅरेर्थान स्पर्धा १४वी स्पर्धा असून, मॅरेथॉन स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ५ किमी अंतर तसेच खारघर दौड गट ३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड २ किलोमीटर अशा आठ गटात होणार असून, २ लाख रुपयांची बक्षिसे आहेत. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यातील पुरुष खुला गट आणि महिला खुला गटासाठी १०० रुपये तर उर्वरित गटांसाठी २० रुपये नाममात्र ‘प्रवेश फी' असून, प्रवेश फी सामाजिक उपक्रमासाठी वापरली जाते.  

मॅरेथॉन स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यशस्वी करण्यासाठी स्वागत, प्रसिध्दी, आयोजन, मार्ग नियोजन,  प्रवेशिका देणे आणि घेणे, पंच आणि नियमावली, फिडिंग आणि स्पंजिग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, बक्षिस वितरण अशा विविध समित्या असणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेण्याची अंतिम तारिख ६ जानेवारी २०२४ असून, चेस्ट नंबर १० जानेवारी पर्यंत स्पर्धकांनी घेऊन जाणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी  www.khargharmarathon.in या संकेत स्थळावर तसेच बारकोड ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेचा जास्तीत जास्त स्पर्धक, क्रीडारसिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः ०२२-२७७४४४१०, ०२२-२७७४४५७७, ०२२-६८५७४४०१, ०२२-६८५७४४०२, ०२२-६८५७४४०७, ८८९८७७७७११ किंवा ८०९७६८४६६४.

स्पर्धेतील बक्षिसांचा तपशिल  
पुरुष खुला गट (फक्त रायगड जिल्हा) - अंतर १० किलोमीटर
प्रथम क्रमांक - २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक - १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ - ७ स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपये तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट.

महिला खुला गट (फक्त रायगड जिल्हा) - अंतर १० किलोमीटर
प्रथम क्रमांक - २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक - १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ - ७ स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपये तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट. 

 

--

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संकल्प संपूर्ण स्वास्थ्य उपक्रम