पनवेल प्रीमिअर लिग क्रिकेट स्पर्धेत ‘शौर्य टायगर इलेव्हन संघ' विजेता

साईकृपा शिवण्या इलेव्हन संघ उपविजेता

खारघर : पनवेल समालोचक असोसिएशन तर्फे खारघर पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानक शेजारील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या पनवेल प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत खुंटुकबांधण गावातील शौर्य टायगर इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करुन पाच लाख रुपये रवकमेचे पारितोषिक आणि आकर्षक चषक पटकावला. या स्पर्धेत आदई गावातील साईकृपा शिवण्या इलेव्हन संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.  

पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन खेळाडू तयार होण्यासाठी पनवेल समालोचक असोसिएशन तर्फे पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानक शेजारील मैदानात २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ दरम्यान  आयोजित करण्यात आलेल्या पनवेल प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत नामांकित संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या खुंटुकबांधण गावातील शौर्य टायगर इलेव्हन संघाला ५ लाख रुपये रोख आणि चषक तर उपविजेत्या आदई गावातील साईकृपा शिवण्या इलेव्हन क्रिकेट संघाला अडीच लाख रुपये रोख आणि चषक देवून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत शौर्य टायगर इलेव्हन क्रिकेट संघातील खेळाडू अजय भातुसे याने मालिकावीर किताब पटकावला. मॅन ऑफ द सिरीज बहुमान पटकावणाऱ्या अजय भातुसे याला मोटारसायकल भेट देण्यात आली.

नवीन क्रिकेट खेळाडू उदयास यावेत, या उद्देशाने पनवेल समालोचक असोसिएशन तर्फे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. विशेष म्हणजे स्पर्धा आयोजनातून मिळालेल्या रक्कमेचा उपयोग पनवेल तालुक्यातील आदिवासी पाड्यातील महिला आणि शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हितासाठी केला जातो, असे ‘पनवेल समालोचक असोसिएशन'चे संस्थापक संदीप वास्कर यांनी सांगितले. 

खुंटुकबांधण गावातील शौर्य टायगर इलेव्हन क्रिकेट संघाने पनवेल प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने खुंटुकबांधण ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. यापुढे मुले-मुलींनी चांगला खेळ खेळावा, यासाठी योग्य ते सहकार्य केले जाणार आहे. - विनोद घरत, सामाजिक कार्यकर्ते - खुटुकबांधण गाव. 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

नवी मुंबई प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शुभारंभ