‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद'मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय कामगिरी

२५ शाळांमधील ७५ प्रकल्पांची जिल्हास्तरावर निवड

नवी मुंबई : भारत सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या वतीने चांद्रयान-३ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषद'च्या ठाणे जिल्हा तालुका पातळीवर नोंदणी झालेल्या ४२४ प्रकल्पांमधून नवी मुंबई महापालिकेच्या २५ शाळांमधील ७५ इतक्या मोठ्या संख्येने प्रकल्पांची जिल्हास्तरावर निवड झाली असून नवी मुंबई महापालिकेच्या ‘शिक्षण व्हिजन'चे सदर यश असल्याचे दिसून येत आहे.

‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद'साठी ठाणे जिल्ह्यातून तालुका पातळीवर ४२४ विज्ञान प्रकल्पांची विक्रमी नोंदणी झाली. यामधील २८३ प्रकल्पांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये आरोग्य-स्वच्छता, पर्यावरण संवर्धन- पारंपारिक ऊर्जा, शेती-अन्न सुरक्षा तसेच आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये लर्निंग लिंक्स फाऊंडेशन आणि एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज्‌ या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सुरु असलेल्या ‘एडब्ल्यूएस थिंक बिग स्पेस' या उपक्रमांतर्गत सदर प्रकल्प ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद'कडे पाठविण्यात आले होते. यामधून इयत्ता ६ वी ते ८ वी च्या २५ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ७५ प्रकल्पांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.

जिज्ञासा ट्रस्ट ‘बालविज्ञान परिषदची २३ वर्षे संघटक म्हणून कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून यावर्षींची परिषद २७ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत जिल्हा स्तरावर संपन्न होत आहे. या ‘परिषद'मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विज्ञान प्रकल्प सादर केले जाणार आहेत.

नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी इतक्या मोठया संख्येने तालुका स्तरावर मिळवलेले यश महापालिका शाळांतील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पध्दतीचे यश आहे. सदर प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि संस्थेच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन आणि जिल्हास्तरावरील ‘विज्ञान परिषद'साठी शुभेच्छा!. -राजेश नार्वेकर, आयुवत- नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाची राष्ट्रीय , राज्य पातळीवर दखल