अखेर शिक्षण विभागाकडून १७८ शिक्षकांची भरती पूर्ण

तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची नेमणूक

तुर्भे : नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने मागील महिन्यापासून सुरु करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया अखेर नुकतीच पूर्णत्वाला आली आहे. १८३ पैकी १७८ शिक्षकांची भरती करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट यांनी दिली. तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या ५३ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळांसाठी तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घ्ोतला होता. यामध्ये प्राथमिक विभागासाठी १२३ शिक्षकांची तर माध्यमिक विभागासाठी ६० शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी १० जुलै या दिवशी इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्र घेण्यात आली. त्यानंतर त्यांची छाननी करुन गुणक्रमानुसार (मेरीट) निवड आणि प्रतिक्षा यादी प्रसिध्‌ करण्यात आली.

या भरती प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज ५८० प्राप्त झाले, तर माध्यमिक शिक्षक पदासाठी ५३३ अर्ज प्राप्त झाले. १३ जुलै रोजी प्राथमिक, तर १५ जुलैला माध्यमिक शिक्षकांची निवड आणि प्रतिक्षा सूची प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार नियुक्तीपत्र घेऊन ५ दिवसांत शाळेवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील महिन्यात शिक्षक भरतीमध्ये निवड होऊनही जे शिक्षक नियुक्ती पत्र घेण्यासाठी आले नाही, अशा शिक्षकांना शेवटची संधी म्हणून एक नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर प्रतिक्षा सूचीवरील उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला. त्यानुसार शिक्षण विभागाच्या वतीने प्रतिक्षा सूचीवरील उमेदवारांना पत्र पाठवण्यात आले होते. यामध्ये प्राथमिक विभागासाठी २७, तर माध्यमिक विभागासाठी ९ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. महापालिका प्रशासनाने १८३ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, इंग्रजी भाषेचे ५ शिक्षक प्रारंभी पासूनच मिळाले नाही. त्यामुळे आता १७८ शिक्षकांची अंतिम भरती पूर्ण करण्यात आली आहे, असे उपायुवत घनवट यांनी सांगितले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ठाणे महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर होणार कारवाई