जोशी-बेडेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीची जाणून घेतली माहिती

ठाणे ः मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे या दरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवाराने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे? तरुणाईला पडलेल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत शिंदे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

दरम्यान, समृध्द, सुजाण, बळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि ठाण्यातील के.ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित लोकशाही गप्पा- भाग ७ अंतर्गत ‘कशी होते मतदार नोंदणी' या परिसंवादात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी पवन चांडक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अर्चना घोलप, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोषकुमार सेंद्रे आदि सहभागी झाले होते. संवादक प्रणय चव्हाण आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अभिषेक नेमाणे यांनी मान्यवरांशी संवाद साधला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार युवराज बांगर, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक, उपप्राचार्य टोके, महेश पाटील, संदीप पागे, आठवले, आदि उपस्थित होते.

विशेष पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजे काय, मतदार नोंदणी करणे का आवश्यक आहे? १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आगाऊ मतदार नोंदणी करता येते का? अशा अनेक शंकांची उत्तरे मान्यवरांनी दिली. परिसंवादास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनीनी मतदार नोंदणी जनजागृतीविषयी पथनाट्य सादर केले. महाविद्यालयात उभारलेल्या मतदार नोंदणी केंद्राचे उद्‌घाटन देशपांडे यांच्या हस्ते झाले.

भारताची लोकशाही व्यवस्था जगातील मोठी लोकशाही आहे. लोकशाही टिकविण्याची आणि अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. पारदर्शक निवडणुका या लोकशाहीचा गाभा आहे. त्यासाठी मतदार याद्या सदोष असणे आवश्यक आहे. मतदार यादी निर्दोष, पारदर्शक, परिपूर्ण आणि अधिक अचूक असावी, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वंचित, बेघर, तृतीयपंथीय, महिला, युवक अशा घटकांच्या हातात लोकशाहीच्या नाड्या आहेत. तेच जर या प्रक्रियेच्या बाहेर असतील तर लोकशाही बळकट कशी होणार? म्हणून तरुणांना, वंचित समाजातील घटकांना प्रवाहात आणण्यासाठी सदर कार्यक्रम महत्वाचा आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले.

विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती अशी अनेक कामे करण्यात येत आहेत. या कार्यक्रम अंतर्गत युवा, बेघर, तृतीयपंथीय, देहविक्रय करणाऱ्या महिला, भटके विमुक्त, वंचित घटकांची मतदार यादीत नोंद करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जाची तपासणीसाठी विशेष यंत्रणा राबविण्यात येत आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.

दरम्यान, विशेष पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत जोशी बेडेकर महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या केंद्रातून विद्यार्थ्यांना अर्ज वाटप, नोंदणीसाठी मदत केली जात आहे. यावेळी महाविद्यालयातील १२०० विद्यार्थ्यांनी अर्ज नेले असून त्यातील ४०० जणांनी अर्ज सादर केले आहेत.

राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदार यादीत नाव नोंदवा...
मतदान का करावे, या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सदर प्रश्नाचे उत्तर मतदान का करायचे नाही, यातच सामावले असल्याचे सांगितले. सैनिक ज्या प्रमाणे देशाचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य समजतो, त्याप्रमाणेच प्रत्येकाने मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजावे. चांगले प्रतिनिधी संसदेत, विधानसभेत पाठविण्यासाठी, पुढील पिढीसाठी लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी, बळकट लोकशाही हवी असेल तर मतदान करणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे तरुण वाहन परवाना काढण्यासाठी सजग असतो त्याप्रमाणेच त्याने मतदार यादीत नाव येण्यासाठीही सजग असले पाहिजे, असे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी स्पष्ट केले.

ऑफलाईन, ऑनलाईन अर्ज करण्याची सोय...
मतदार यादीत नाव नोंदणी साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही पर्याय वापरता येतात. घरबसल्याही ऑनलाईनद्वारे अर्ज करता येतो आणि त्या अर्जावरील कार्यवाहीची माहितीही मिळते. एनव्हीएसपी बेवसाईट, व्होटर पोर्टल, पीडब्ल्युडी अप या विविध माध्यमातून अर्ज करता येते. ज्यांच्याकडे राहण्याचा पत्ता नाही, अशा बेघर, आदिवासी, भटक्या समाजातील नागरिकांना स्वयंघोषणापत्र देऊनही नोंदणीसाठी अर्ज करता येते. तसेच मतदारसंघाबाहेर कर्तव्यावर असणारे, दिव्यांग, मतदान केंद्रावर जाऊ न शकणारे ८० वर्षावरील चालू न शकणारे ज्येष्ठ नागरिक यांना पोस्टल बॅलटद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली.
यावेळी चांडक आणि घोलप यांनी मतदान नोंदणी प्रक्रियेविषयी माहिती दिली. तसेच अर्ज नाकारण्याची कारणे आदिंची माहिती दिली. सहायक मतदार नोंदणी अधिकारी वृषाली पाटील यांनी आभार व्यक्त केले. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल भारत सरकारच्यावतीने 'स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार' ने सन्मानित