17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022

१७ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेसाठी ‘नवी मुंबई'ला यजमान शहराचा बहुमान

नवी मुंबई  ः जगातील सर्वात लोकप्रिय क्रीडा प्रकार असणाऱ्या फुटबॉलची १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा-२०२२ भारतात होत असून या स्पर्धेसाठी नवी मुंबई शहराला यजमान शहराचा बहुमान लाभलेला आहे. सदर बाब आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. फिफा वर्ल्डकपचे सामने पाहण्याकरिता जगभरातून येणाऱ्या फुटबॉल खेळाडुंच्या आणि क्रीडारसिकांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज झाले आहे. तरीही यामध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व प्राधिकरणांना दिले.

येत्या ११ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत भारतामध्ये होत असलेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा मधील महत्वाचे ५ सामने नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील स्टेडीयम मध्ये १२, १५, १८, २१ आणि ३० ऑक्टोबर रोजी होणार आहेत. या अनुषंगाने यजमान शहर म्हणून करावयाच्या तयारीचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी २७ सप्टेंबर रोजी सविस्तर आढावा घेतला.


याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड, क्रीडा विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, इतर विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी त्याचप्रमाणे ‘फिफा'च्या पदाधिकारी रोमा खन्ना, मनदीप सहरन, अर्पिता नाखवा, श्रुती दागा, उमाशंकर कनोजिया तसेच डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम व्यवस्थापनाचे संचालक वृंदन जाधव आणि संबंधित महापालिका, पोलीस अधिकारी आणि ‘फुटबॉल फेडरेशन'चे अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक दिवशी २ सामने याप्रमाणे ५ दिवस डॉ.डी.वाय.पाटील स्टेडियम येथे सामने होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना ३० ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममध्ये होणार आहे. सदर जागतिक स्पर्धेमध्ये अमेरिका, मोरोक्को, ब्राझिल, जर्मनी, नायजेरिया, चिली, न्युझीलंड, स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, चीन, जपान, टान्झानिया, कॅनडा, फ्रान्स आणि यजमान भारत अशा १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेने २०१७ साली नवी मुंबईत झालेल्या फिफा स्पर्धेच्या वेळी विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेरुळ, सेक्टर-१९ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यांपूर्वीचा सराव फुटबॉल संघ करणार असून त्याठिकाणची सर्व व्यवस्था सुसज्ज राहील. तसेच विशेषत्वाने पलड लाईटच्या रिफोकसिंगची कामे गुणवत्तापूर्ण आणि जलद करुन घ्यावीत, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

दरम्यान, नवी मुंबईत जागतिक स्तरावरील नामांकित महिला फुटबॉल खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी वर्ल्डकप स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईकर नागरिकांना उपलब्ध होणार आहे. विशेषत्वाने युवक आणि त्यातही प्रामुख्याने युवती मोठ्या संख्येने सामने बघण्यासाठी उपस्थित राहतील. तसेच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थीही सामने पाहण्यासाठी उपस्थित राहतील अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित करुन नियोजन करावे, असेही आयुक्तांनी यावेळी सूचित केले.

१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबई शहराला पुन्हा एकवार आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्याची संधी लाभली आहे. स्वच्छ-सुंदर शहराप्रमाणेच क्रीडानगरी असाही नवी मुंबईचा नावलौकीक व्हावा यादृष्टीने महापालिकेसह सर्व संबंधित प्राधिकरणांनी कार्यवाही करावी. नवी मुंबईकर नागरिकांनीही या जगभरातील खेळाडुंना प्रोत्साहित करण्यासाठी सामन्यांच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. -अभिजीत बांगर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

उरण शहरात विविध संस्थांमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन