चिरनेरमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट बिकट चिखलातून 'स्कूल चले हम'

उरण : उरण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासींच्या वाड्या-वस्त्यांवर साधा रस्ता झाला नसल्याने आजही चिरनेरसारख्या ऐतिहासिक गावातील आदिवासी वाड्यांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दलदलीच्या रस्त्यातून चिखल तुडवीत शाळा गाठावी लागत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिवी चिखलाची वाट आल्याने आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
चिरनेर हे इंग्रज राजसत्तेविरुद्ध १९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहाच्या लढ्याचे गाव आहे. या स्वातंत्र्य लढ्यात आठ शूरवीरांना हौतात्म्य प्राप्त झाले होते त्यात नाग्या कातकरी हा कातकरी आदिवासी तरुण हुतात्मा झाला होता.
 
मात्र त्याच्या वारसांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कातकरी आदिवासी समाजाची मोठी वस्ती आहे. मात्र चिरनेर ग्रामपंचायतीच्या उदासीन व दुर्लक्षित कारभारामुळे या आदिवासी वाड्यांपर्यंत अजूनही पक्का रस्ता होऊ शकला नाही की शुद्ध पाणीपुरवठा होत नाही, परिणामी या आदिवासींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासन कधी लक्ष देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.शाळेत जाताना विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.
 
 केळाचा माळ या आदिवासी वाडीची लोकसंख्या सुमारे २०० च्या आसपास आहे. या वाडीतून २५ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गावातील शाळेत यावे लागते, मात्र या मुलांना रस्ता नसल्याने शिक्षणासाठी दगड-मातीच्या रस्त्यातून चिखलाची दलदल तुडवीत रोज सुमारे तीन किमीची पायपीट करावी लागत आहे. यामुळे शिक्षण घेणे त्रासदायक झाले आहे.
 
चिरनेर गाव ते केळाचा माळ आदिवासी वाडीपर्यंतच्या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडून १३ लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र काम झाले नाही. याबाबत पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले झाले आहे. यामुळे आदिवासी समाजातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 
केळाचा माळ आदिवासी वाडी रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असला तरी काही तांत्रिक बाबींमुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही. सध्या आदिवासी विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्याचा त्रास होत आहे. लवकरच त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. - महेश पवार ग्रामविकास अधिकारी, चिरनेर
Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सीकेटी महाविद्यालयाच्या रुसा, प्लेसमेंट सेल अतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित