रायफल शुटिंग खेळामध्ये नमुंमपा शाळांमधील विद्यार्थी चमकणार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून महानगरपालिका संचालित शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिंपिक स्तरावर खेळल्या जाणा-या खेळांचेही तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून “रायफल शुटिंग खेळाचे नमुंमपा शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महानगरपालिका क्रीडा विभागाच्या माध्यमातून या क्षेत्रातील अत्यंत नावाजलेल्या खेळाडू व अनुभवी प्रशिक्षक श्रीम. सुमा शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

याकरिता महापालिका शाळांमधील मुलामुलींची यादी शिक्षण विभागाच्या वतीने मागविण्यात आलेली आहे. यामधील 85 मुले व 51 मुलींची पात्रता फेरीची निवड चाचणी दि. 22 व 23 जुलै 2022 रोजी फादर ॲग्नल स्पोर्ट्स सेंटर येथील शुटिंग रेंजवर घेण्यात आली व निवड चाचणी मधून प्राथमिक फेरी मध्ये 14 मुले व 12 मुलींची निवड करण्यात आलेली आहे.

या निवड चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे रायफल शुटिंग खेळाबाबत केवळ बघून आणि वाचून असलेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच शुटिंग रेंजमध्ये / हातामध्ये रायफल घेतल्यानंतर त्यांच्या चेह-यावर अत्यंत आनंदाची भावना दिसून आली. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच रायफल हातात घेऊनसुध्दा टायमेटच्या जवळपास लक्ष्य साध्य करुन अंगभूत क्रीडागुणांमुळे 14 मुले व 12 मुलींनी त्यांच्यातील गुणवत्तेचे दर्शन घडवित   दखल घेण्यास भाग पाडले.

यापुढील काळात या मुलामुलींच्या अंतिम निवड चाचणीअंती 13 विद्यार्थ्यांना रायफल शुटिंगचे पुढील तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठीचा संपूर्ण खर्च महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. रायफल शुटिंग सारख्या खेळामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळण्याची संधी देण्यात आली असून आगामी काळात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर महानगरपालिकेचा नावलौकिक उंचावतील असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त करत या विद्यार्थ्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

 
 
 
Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण नमुंपमा शाळांतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण योजना