राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांना उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई :  भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झालेली असून हा दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो व या निमित्ताने निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने मतदान जनजागृती प्रक्रियेत लोकसहभागावर भर देण्याचा प्रयत्न केला असून त्याकरिता आयोजित विविध स्पर्धांना मिळालेला प्रतिसाद बघता हे उपक्रम यशस्वी झाल्याचे समाधान वाटते व याचा परिणाम आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी होईल असा विश्वास निवडणूक विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांनी व्यक्त केला.

      राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्त साधून नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध मतदान जनजागृतीपर स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी शिक्षण विभागाचे उप आयुक्त जयदिप पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी अभय जाधव, अतिक्रमण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीम. मंगला माळवे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. ऋतुजा संख्ये, प्रभारी विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे उपस्थित होते.

      या स्पर्धांमध्ये शिक्षण विभागाच्या सहकार्याने निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मनोगत व्यक्त करताना शिक्षण विभागाचे उप आयुक्त जयदिप पवार यांनी निवडणूका व लोकशाही यांचे महत्व सोप्या भाषेत समजावून सांगत विद्यार्थ्यांनी चांगल्या संख्येने सहभागी होऊन जागरुकता दाखविली त्याबद्दल प्रशंसा केली.

      लघुपट स्पर्धेत बोट वोट या लघुपटास सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. दूरदृष्टी व अस्तित्व या लघुपटांनी व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेतील अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार अशी सर्वोत्कृष्ट पारितोषिकेही वितरीत करण्यात आली.

      जिंगल स्पर्धेत मारू ब्रदर्स, मल्हार जोशी, अजय तावडे यांनी अनुक्रमे 3 क्रमांकाची बक्षिसे पटकाविली.

      मिम स्पर्धेमध्ये संकेत मुळगांवकर, मिथुल कुर्लेकर, प्रणव पवार पहिल्या 3 क्रमांकाचे मानकरी ठरले.

      घोषवाक्य स्पर्धेत श्वेता पाठारे, कुणाल वारुळे, अनिल सोनावणे यांनी अनुक्रमे 3 क्रमांकाची बक्षिसे संपादन केली.

      शालेय स्तरावरील निबंध स्पर्धेत प्रिन्स पवार, तन्वी पवार, नुतन पिलाणे त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धेत सृष्टी चव्हाण, दिशा सरवणकर, रोहित गुप्ता तसेच वक्तृत्व स्पर्धेत अस्मिता जाधव, दिक्षा आहेर, ज्ञानेश्वरी जाधव यांनी त्या त्या स्पर्धांमध्ये प्रथम 3 क्रमांकाची पारितोषिके पटकाविली.

      राष्ट्रीय मतदार दिनाच्या विविध स्पर्धांमध्ये 497 स्पर्धकांनी सहभागी होत लोकशाहीचे व मतदानाचे महत्व विविध माध्यमांतून प्रभावीपणे अभिव्यक्त करून नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाचा हा उपक्रम यशस्वी केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोच्या 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेस प्रजासत्ताक दिनी प्रारंभ