आता पेटवू सारे रान; एक महिन्याचा अल्टिमेटम 

पनवेल : आता पेटवू सारे रान असा एल्गार करत भूमिपुत्रांनी सिडकोला त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एवढेच नाही तर सिडको वठणीवर नाही आली तर येत्या काळात तब्बल एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा या आंदोलनातून जाहीर करण्यात आला आहे.  दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत 'जय दिबा' असा जयघोष करत आज (२४ जानेवारी) ओवळे फाटा येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लाक्षणिक काम बंद आंदोलन लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या साक्षीने झाले. 
 
        प्रकल्पग्रस्तांच्या मागील आंदोलनांचा अनुभव घेत या आंदोलनावेळी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करावा लागला होता. वारकरी मंडळींनी टाळ पखवाजचा ठेका घेत दिबांचा जयजयकार केला.  तर दिबासाहेबांचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, सिडको मुर्दाबाद, अशा घोषणांनी भूमिपुत्रांनी आसमंत दणाणून सोडला होता. या आंदोलनाचा धसका घेऊन सिडकोने स्वतःहून विमानतळाचे काम बंद केले.  अन्यथा विमानतळ क्षेत्रात घुसून काम बंद करण्याची तयारी यावेळी स्प्ष्टपणे दिसत होती. मात्र विमानतळाचे काम बंद आहे कि नाही याची खात्री करण्यासाठी आमदार महेश बालदी, नंदराज मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांच्या ५० भूमिपुत्रांनी विमानतळ कामाची पाहणी करून काम बंद असल्याची खात्री केली. 
 
रखरखत्या उन्हात या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, कॉम्रेड भूषण पाटील, राजाराम पाटील, संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल, दशरथ भगत, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, राजेश गायकर, दीपक पाटील, उत्तम कोळी, सुनील पाटील, किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, अमर पाटील, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, प्रवीण पाटील, संतोष शेट्टी, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर,चारुशीला घरत, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, प्रमिला पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, कुंडेवहालचे सरपंच सदाशिव वास्कर, विजय घरत, गोवर्धन डाऊर, दगडू गायकवाड, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारतीय प्रजासत्ताक दिनी सुलेखनकार अच्युत पालव साकारणार 'स्वच्छतेचे अक्षररंग