महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
15 ते 18 वयोगटातील दिव्यांगांकरिता 13 जानेवारी रोजी विशेष लसीकरण सत्र आयोजन
नवी मुंबई : 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 206 शाळांमध्ये सत्रे आयोजित करीत लसीकरण करण्यात आलेले असून शासनाने दिलेल्या उद्दिष्टापैकी 3 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत पहिल्या टप्प्यात 77 टक्के मुलांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
यानंतरही लस न घेतलेल्या उर्वरित मुलांना लस संरक्षित करावे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीत लसीकरण न झालेल्या मुलांची संख्या 20 पेक्षा जास्त आहे अशा शाळांमध्ये लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत तसेच 20 पेक्षा कमी मुले बाकी असलेल्या शाळांतील मुलांनी महानगरपालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली व तुर्भे अशी 4 रूग्णालये आणि 23 नागरी आरोग्य केंद्रे अशा 27 लसीकरण केंद्रांवर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दुस-या सत्रात पहिल्या दिवशी 11 जानेवारी रोजी 2996 मुलांचे लसीकरण करण्यात आलेले असून आता 15 ते 18 वयोगटातील एकूण 81 टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
यामध्ये 15 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांना सुलभतेने लसीकरण करून घेता यावे यादृष्टीने त्यांच्याकरिता 13 जानेवारी 2022 रोजी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे सेक्टर 15, नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय आणि सेक्टर 3, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णालय याठिकाणी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
18 वर्षावरील दिव्यांगांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वीही विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आलेली असून दिव्यांग कल्याणकारी दृष्टीकोनातून नियमित कोव्हीड लसीकरणात नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांना रांग न लावता लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
यामध्ये भर घालत आता 13 जानेवारी रोजी 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणामध्ये दिव्यांग मुलांकरिता मोफत विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी घ्यावा व लस संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.