महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आदीवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पनवेल मधील शिक्षक दाम्पत्याची धडपड
नवी मुंबई : आदिवासी समाजातील मोठा वर्ग आजही शिक्षणापासून वंचित रहात आहे. आर्थिक परिस्थितीमुळे या समाजातील अनेक मुला-मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागत आहे. त्यामुळे अशा मुला मुलींचा शोध घेऊन त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करुन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास पनवेल मधील रवींद्र ठाकूर व त्यांची पत्नी पुष्पलता ठाकूर या दाम्पत्याने घेतला आहे. 2009 पासून ठाकुर दाम्पत्य पनवेल तालुक्यातील धामणी येथील आदिवासी पाडÎातील मुला-मुलींना मोफत शिक्षणाबरोबरच त्यांना सर्व प्रकारच्या शालेपयोगी वस्तू पुरवित आहेत. कुणाच्याही मदती शिवाय ठाकुर दाम्पत्य केवळ आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी हे कार्य अविरतपणे करत आहेत.
बेलापुर येथील भजनरत्न महादेव दिनकर कोळी अर्थात महादेव बुवा शहाबाजकर यांनी सन 2009 साली पनवेल तालुक्यातील धामणी या गावात आनंदी दिनकर कोळी शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून फक्त आदिवासी मुलांसाठी ज्ञानाई माध्यमिक विद्यालय ही शाळा सुरु केली. सुरुवातीला या शाळेत फक्त पाचवी आणि आठवीचे दोन वर्ग सुरु केले होते. त्यावेळी या शाळेत फक्त 25 विद्यार्थी होते. मौजे धामणी हे गाव डोंगराळ भागात असून तो संपूर्ण परिसर हा आदिवासी आहे. या भागातील बहुतांश मुले हि प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱया शाळेत न जाता घरीच राहुन आपल्या कुटुंबा सोबत मोलमजुरीची कामे करत होते. अशा मुलांना शिक्षणाचे माध्यम उपलब्ध व्हावे यासाठी महादेव बुवा शहाबाजकर यांनी रवींद्र ठाकूर यांना सोबत घेऊन धामणी येथील शाळा नियमित सुरु राहील यासाठी प्रयत्न सुरु केले.
त्यानंतर रवींद्र ठाकूर व त्यांची पत्नी पुष्पलता ठाकूर यांनी संपूर्ण आदिवासी पाडÎांतील जी मुले शिक्षण न घेता घरीच आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या मुलांना ज्ञानाई माध्यमिक विद्यालयात प्रवेश दिला. त्यानंतर रवींद्र ठाकूर व पुष्पलता ठाकूर या दोघांनी या शाळेतील मुलांना ज्ञानार्जनाचे काम सुरु केले. आज या शाळेत 250 आदिवासी मुलं शिक्षण घेत आहेत. ठाकुर दाम्पत्य वेगवेगळ्या शाळेत शिक्षक म्हणून काम पाहात असले तरी, ते आपली शाळा सांभाळून ते या शाळेत आदीवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम करत आहेत. ठाकूर सर हे रोज सकाळी 8 ते 10.30 या वेळेत या शाळेत जाऊन मोफत शिक्षण देतात, त्यानंतर ते आपल्या नियोजित शाळेत जातात. त्याशिवाय ठाकूर दाम्पत्य प्रत्येक शनिवार रविवार या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे या शाळेचा दहावीचा निकाल देखील 90 टक्केच्या वर लागत आहे.
ठाकुर दाम्पत्य 2009 पासून या शाळेतील मुलांना संपूर्ण गणवेश, वह्या-पुस्तके, पेन, पेन्सिल, दफ्तर, जाण्या येण्यासाठी बस पास, दुपारचे जेवण हे मोफत, कुणाच्याही मदती शिवाय करत आहेत. या शाळेला कोणत्याही प्रकारची सरकारी मदत नसताना ठाकुर दाम्पत्य केवळ आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी हे कार्य अविरतपणे करत आहेत. आज ही शाळा कुणाच्याही मदती शिवाय सुरु असून यात सुमारे 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हि शाळा अविरतपणे सुरु ठेवण्यासाठी ठाकूर दाम्पत्य प्रयत्न करीत आहेत.