महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
झुळूक आणखी एक !
मरणाला कुठला आलाय विधिनिषेध? कुणी कुठल्या कारणानं, कधी, आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कुणाच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं..हे कोण ठरवत असेल तो असो...मृत्यू सर्वत्र एकाच चेहऱ्याने वावरतो...वेदनेच्या! म्हणूनच ज्याला शक्य आहे, त्याने असे मरणस्पर्श झालेल्या मनांशी संवाद साधत राहायला पाहिजे...एक नित्योपचार म्हणून. मृत्यूच्या उतरंडीवर सर्वांत वर आहेत..ते तरुण, देखण्या, सशक्त, नीडर सैनिकांचे मृत्यू..अर्थात अकालमृत्यू!
काळ हेच औषध असतं, असं म्हणतात. पण हा काळ ज्याला कंठावा लागतो त्या जीवालाच ठाऊक त्या वेदनांचा दाह! विस्मरण, स्मरण आणि मरण या एकमेकांच्या हातात हात गुंफून चालणाऱ्या गोष्टी. एखाद्याला आपण विसरून गेलो तर आपल्या लेखी त्याचा मृत्यूच झालेला असतो. आणि हे जग सोडून गेलेल्यास आपण स्मरणात ठेवले तर तो जिवंत असतो. पण कित्येक वेळा, कित्येकांना स्मरण जणू मरणाचा अनुभव देत असावे. कालौघात विरहाची धार जराशी बोथट होत असेलही, पण स्मरणाच्या तारेला झंकारुन उठायला एखादी हलकीशी झुळूकही पुरेशी ठरत असावी...किंबहुना त्या तारा वाऱ्याची यासाठीच तर आळवणी करीत असाव्यात!
खरं तर कोणत्याही प्राण्याच्या बाबतीत, वस्तूच्या, पदार्थाच्या बाबतीत उत्पत्ती, स्थिती आणि लय हा क्रम ठरलेला असतो. पण आधी जन्माला आलेला जीव नंतर जन्माला आलेल्या जीवाच्या आधी जावा...नंतर जन्मलेल्याने नंतर जावे...खरं तर हाच क्रम योग्य आहे. पण निसर्ग याबाबतीत खूप अन्यायी आहे. प्रत्येकाची मरणरेषा स्पष्ट आखलेली असते या श्वासांच्या शर्यतीत.. आणि श्वास थांबवता येत नाहीत...अंतिम रेषा पार करेपर्यंत. कुणी बळजबरी केली आणि स्वतःचे श्वास स्वतःच थांबवले की ती शर्यत पुन्हा पहिल्यापासून आरंभ करावी लागते...पुढील जन्मात! ज्यांचे श्वास इतरांनी थांबवले, त्यांची शर्यत अपूर्ण राहते बराच काळ...पण सुटका नाही!
निष्प्राण देह जड होऊन जातो..आणि हा देह वाहून नेणारे खांदे जर या देहापेक्षा ज्येष्ठ असतील तर हा जडपणा अधिकचा असतो...जगातला सर्वांत मोठा भार...हा भार जन्मभर खांद्यावरून उतरत नाही.
या स्मरण वेदनेवर काळ हा उतारा वरवर गुणकारी भासतो..पण मनाला चकवा देऊन कळ उसळी मारतेच अधून मधून. त्यापेक्षा सतत स्मरण राखत राहिलं तर सवय तरी होऊन जाते.
काळीज जितकं जुनं तितकं ते हळवं. माणसांच्या गराड्यातून स्वतःच्या काळोखात एकदा का हे काळीज गेलं ना की त्याला फक्त त्याचीच धडधड ऐकू येते.हा एक हृदयविकारच जणू.
आणि म्हणून अशा काळजांना एकाकी नसतं राहू द्यायचं. त्यांचं अंधारात जाण्याचं शक्य तितकं लांबवत राहायचं! काही अंधारात एकाच्या जोडीला दुसरंही हृदय असतं..आणि ते एकाअर्थी बरं असतं. ये हृदयीचे ते हृदयी समजू शकतं.
लोकांचं काय हो...लोक विसरून जातात. सोयरे सुतक फिटलं की मोकळे होतात. मित्र परिवार स्मृतिदिनापुरता उरतो. सांत्वने, आश्वासने घडीची सोबती असतात...शेवटी ज्याचे भोग ज्याचे त्यानेच भोगावेत..अशीच जगरहाटी असते!
मरणाला कुठला आलाय विधिनिषेध? कुणी कुठल्या कारणानं, कधी, आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कुणाच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं..हे कोण ठरवत असेल तो असो...मृत्यू सर्वत्र एकाच चेहऱ्याने वावरतो...वेदनेच्या!
म्हणूनच ज्याला शक्य आहे, त्याने असे मरणस्पर्श झालेल्या मनांशी संवाद साधत राहायला पाहिजे...एक नित्योपचार म्हणून. मृत्यूच्या उतरंडीवर सर्वांत वर आहेत..ते तरुण, देखण्या, सशक्त, नीडर सैनिकांचे मृत्यू..अर्थात अकालमृत्यू!
या तरुणांचे प्राणहरण करण्यासाठी आलेल्या दुतांचेही हात थरथरत असतील त्यांना पाशात अडकवताना...पण त्यांना स्वर्गात नेण्याचे भाग्य लाभते यासाठी ते दूत दैवाचे आभारही मानत असावेत! गेल्या काही दिवसांत अशाच काही माता, पिता, बंधू, भगिनी यांच्याशी संवाद घडला...आणि लक्षात आलं...समाज आणि हे वेदनापिडित यांच्यात खूप मोठी दरी आहे! केवळ वेळ-प्रसंगीच आठवणी जागवत न राहता...त्यांच्या आठवणी जागत्या ठेवायला हव्यात...त्यांच्या अखेरीपर्यंत. आपल्या घरात दिवा लावताना त्यांच्याही अंधा-या घरांत एक पणती पोहोचवावी जाणत्यांनी! सुदैवाने असे जाणते आपल्याकडे फार अधिक नसले तरी मूठभर तरी आहेत. हे सुहृद सैनिकांच्या मुलांशी, पत्नीशी,आई-वडिलांशी सतत संपर्कात राहतात...त्यांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी सांगत असतात, ऐकत असतात. त्यांच्या मुलांच्या पराक्रमाच्या कहाण्या इतरांना सांगत असतात...पुनःपुन्हा! देव घ्या फुका..देव घ्या फुका...न लगे रुका मोल काही! अर्थात देव मिळवायला काही खर्च लागत नाही...तुम्हीही असे देव शोधा.... त्यांनी घडवलेल्या सैनिकांच्या हौतात्म्याच्या कथा सर्वत्र पोहोचू द्यात...आणि या कथा सर्वत्र पोहोचत आहेत हेही त्यांच्यापर्यंत पोहोचावा! तुमच्या शब्दांची एक झुळूक..त्यांच्या अंतरीच्या जखमा सुखावून जातील! हुतात्मा सैनिकांच्या परिवारांसाठी काम करणा-या सर्व बंधू-भगिनी-मातांना सप्रेम नमस्कार. जय हिंद! - संभाजी बबन गायके