महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
सुख नक्की कशात असतं?
आपल्या संतांनी म्हटले आहे "सुख पहाता जवापाडे दुःख पर्वताएव्हढे” तेच संत असेही म्हणतात "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान.” पण जगात माणूस हा सुखासाठीच धडपड करताना दिसत असतो. मग सुख म्हणजे खरोखर नक्की काय असतं?
आपण जगात पहात असतो की शेतात राबणारा शेतकरी आणि शेतमजूर शेतात राबराब राबून सकाळी कांद्या बरोबर भाकरी खातो आणि तांब्याभर पाणी पिऊन झाडाच्या सावलीत शांत झोपतो. रात्री घरी आल्यावर बायकोने रांधलेले साधेच जेवण पोटभर जेऊन घोंगडीवर शांत झोपतो. झोपडीत ना गादी असते, ना पंखा असतो. पण त्याला शांत झोप लागते. उलटपक्षी श्रीमंत माणूस उत्तम सवरक जेवण घेऊन एसी लावून गादीवर झोपतो. पण त्याला शांत झोपच लागत नाही. इकडे शेतकरी गाद्यागिरद्या नसताना शांत झोपतो, तर दुसरीकडे सर्व सुविधा असूनही श्रीमंत माणूस तळमळतच असतो. मग सुख नक्की कशात असते?
या प्रश्नाचे उत्तर पहिल्या परिच्छेदातिल संत वचनात आहे. संत म्हणतात "चित्ती असू द्यावे समाधान.” माणसाच्या दुःखाचे खरे कारण असमाधान हेच आहे. माणसाला जे मिळालेले आहे त्यात समाधान नसल्यामुळे तो अधिक मिळवण्याच्या मागे लागतो. बरे ते मिळाल्याने तरी तो सुखी होतो काय? तर नाही. अजून अधिक मिळवण्यासाठी त्याची धडपड चालूच रहाते आणि त्यामुळे तो सुखी होऊ शकत नाही.
या संबंधात श्री समर्थ रामदास स्वामिंनी प्रश्न विचारला आहे, "जगी सर्व सूखी असा कोण आहे?” आणि दुसऱ्याच चरणात ते त्या प्रश्नाचे उत्तरही देतात. समर्थ म्हणतात, ”विचारी मना तूच शोधून पाहे. समर्थ रामदास स्वामी काय सांगतात? "विचारी मना तूच खरा सुखी आहेस ज्याचे मन विचारी असते तोच माणूस सुखी असतो. शोधून पाहे म्हणजे नीट विचार करुन पहा. जो माणूस समाधानी असतो, तोच माणूस सुखी होऊ शकतो. असमाधान हेच दुःखाचे खरे कारण आहे." - रमेश नारायण वेदक