स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही `त्यांचे'  काय?

मी, माझे घर, माझी पत्नी, माझी मुलं, माझा टीव्ही आणि माझ्या घरातून दिसतो तेवढाच भारत अशी संकुचित मानसिकता असणाऱ्या अनेकांना घरापासून, पालकांपासून दुरावलेल्या मुलांचा विचार करण्यासाठी फुरसदही नसते. या मुलांबद्दल आपल्या पारंपारिक अभ्यासक्रमात धडा, कविता नसते. अशा मुलांची माहिती देणारी, जागरुकता निर्माण करणारी व्याख्याने अनेक शिक्षणसंस्थांमधून शक्यतो आयोजित केली जात नाहीत. या मुलांचे पुढे होते काय? ती भिक मागतात, चोऱ्या करतात, नशेच्या आहारी जातात की आणखी काय होते? स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या देशात हे प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करत नसतील तर ते लक्षण ठिक नव्हे!

   गोष्ट ५६-५७ वर्षांपूर्वीची आहे. मी त्यावेळी इयत्ता पहिलीत असेन. त्यावेळी आम्ही डोंगरी, मुंबई ९ येथे राहात असू. तेथून पायी दहा पंधरा मिनिटांवर असलेल्या देवीच्या देवळात मला वडील दर्शनासाठी घेऊन जात असत. एकदा असेच देवळात गेल्यावर वडील काही आणण्यासाठी म्हणून बाजूच्या दुकानांत गेले. बराच वेळ येईनात म्हणून मला जिथे थांबायला सांगितले होते ती जागा सोडुन त्यांना शोधण्यासाठी मी निघालो. बरीच शोधाशोध करुनही ते दिसले नाहीत म्हणून मी तडक घरी निघालो. ते मुंबईतले रस्ते, भरपूर वाहतुक, अनेक सिग्नल्स ओलांडत मी घरी आलो. त्याआधी मला कधीही एकट्याला आई-वडील, आजी-आजोबांनी रस्त्यावर फिरु दिले नव्हते, एकुलता एक असल्याने कुणी ना कुणी तरी माझ्या नेहमीच सोबत असत. मी लांबच्या देवळात वडीलांसोबत गेलो असता एकटाच परत आल्याचे पाहुन आई, आजोबा म्हणू लागले असा कसा एकटाच आलास म्हणून? मी काय झाले ते सांगितले. फोन, मोबाईल, पेजर, वगैरे गोष्टी माहित नसलेले ते दिवस. अर्ध्या पाऊण तासाने वडील घामाघूम होत घरी आले आणि मी आजोबांच्या मांडीवर बसलेला पाहुन त्यांनी मला मिठीच मारली.

   प्रसंग दुसरा. वडीलांच्या कंपनीची सहल पंढरपूर, तुळजापूर, जेजूरी अशा तीर्थक्षेत्रांकडे निघाली होती. मीही सोबत होतो. तेंव्हा सहा किंवा सात वर्षांचा असेन. पंढरपूरला बसमधून सारे उतरुन देवळाकडे निघाले. खूप गर्दी होती. कुठेतरी गर्दीत माझा हात वडीलांच्या हातातून सुटला. वेगळे शहर, वेगळी माणसं, वेगळे रस्ते; काहीच ओळखीचे दिसेना. काही वेळाने माझा धीर सुटला व मी रडायला सुरुवात केली. कुणा सज्जनाने मला सोबत घेतले व एका हाराच्या दुकानाजवळ लाकडी स्टुलावर बसायला दिले व ती व्यक्ती तिथे उभी राहिली, जेणेकरुन मी सगळ्यांना सहज दिसावा. तोवर वडीलांनीही शोधाशोध सुरु केली होती...काही वेळाने वडील तेथे आले व मला उचलून घेतले.

   हे दोन प्रसंग मी सुरुवातीलाच यासाठी सांगितले की मी किंवा माझ्यासारख्या फारच कमी व्यक्ती सुदैवी असतील ज्यांना त्या बालवयात लगेच शोधले गेले, ते कोणत्याही अपघातात सापडले नाहीत, कुणा चोरांच्या-गुन्हेगारांच्या टोळीने त्यांचा ताबा घेतला नाही. त्यामुळे त्यांचे पुढचे सारे आयुष्य व्यवस्थित सुरु राहिले. पण महानगरी मायापुरी मुंबईत, ठाण्यात, पुण्यात, नागपूरात, कोल्हापूरात, नाशिकमध्ये, नवी दिल्लीत, हैद्राबादेत, कोलकात्यात, बंगळुरुत, चेन्नईत रोजच्या रोज अशी कित्येक बालके रस्ता चुकत असतील, रेल्वे स्थानकात गाडी पकडताना त्यांच्या परिवाराशी ताटातुट होत असेल, काही जणांच्या आईने दुसऱ्या व्यक्तीबरोबर घरोबा केल्यामुळे घर सोडुन ते पळून गेले असतील, काहींच्या वडीलांनी आईला हाकलुन दिले असेल व दुसऱ्या बाईला घरात आणल्यानंतर या मुलाचा सांभाळ करण्यात ती हेळसांड करीत असेल म्हणून त्या मुलांनी घर सोडले असेल, काहींना अनेक भावंडे असल्यामुळे त्यांचे भरणपोषण करण्यात आईवडीलांना अपयश आल्याने ही मुले घर सोडुन इतर मार्गांना लागली असतील. एक ना अनेक कारणे असतात मुले घर सोडण्याची, चूकण्याची किंवा परिवारापासून दुरावण्याची. संपूर्ण जगात एक नंबरची विक्रमी लोकसंख्या असलेल्या या भारतात रोजच्या रोज शेकडो मुले आपल्या आईवडीलांपासून दुरावत असतील, रेल्वेस्थानक, बस स्टॅण्ड, तीर्थक्षेत्रे अशा ठिकाणी चुकत असतील किंवा हेतुपुरस्सर सोडुन दिली जात असतील. या मुलांचे पुढे होते काय? ती भिक मागतात, चोऱ्या करतात, नशेच्या आहारी जातात, गुन्हेगारी टोळ्यांच्या हाती लागतात, मोठी झाल्यावर जेलमध्ये सडतात..की आणखी काय होते? सुरक्षित, संरक्षित, आटोपशीर, चौकोनी कुटुंबात वाढलेल्या अनेकांना असे प्रश्नही पडत नाहीत.

    पण सगळेच इतके निराशाजनकही नाही. या जगात जसे खलनायक आहेत तसे नायकही असतात. स्व-केंद्रीत असतात तसे समाजाप्रति समर्पित वृत्तीने झोकून देत काम करणारेही असतात. म्हणूनच तर समाजपुरुषाचा ‘समतोल' साधला गेला आहे. अशाच मुलांचा सांभाळ करुन त्यांचे मनपरिवर्तन, पुनर्वसन करायचा प्रयत्न करुन पोलीसांच्या सहकार्याने त्यांचे पालक किंवा त्यांना पुढील आयुष्य चांगले लाभण्यासाठी कार्यरत असणाऱ्या त्या मुलांच्या भाषा, प्रांत यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या संस्थेकडे सोपवण्यात मौलिक योगदान देणाऱ्या ‘समतोल फाऊंडेशन' या कल्याण तालुक्यातील मामनोली या गावाजवळ दुर्गम भागात, जंगलात असणाऱ्या संस्थेचे कामकाज पाहण्याचा योग रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी दुसऱ्यांदा मला लाभला. आजवर या संस्थेच्या माध्यमातून जवळपास एक लाखाहुन अधिक मुलग्यांचे ‘मनपरिवर्तन' करण्यात यश आल्याची माहिती मिळाली.. तेंव्हा अशा प्रकारच्या अनेक संस्थांची किती गरज आपल्या समाजाला आहे हेही अधोरेखित झाले. आजमितीस आयटी क्षेत्रात किंवा केवळ संगणकावर बसून बैठे काम करणाऱ्या अनेक जोडप्यांमध्ये वंध्यत्व अर्थात मुलं न होण्याची समस्या वाढीस लागली आहे. वंध्यत्वावर उपचार करणाऱ्या डॉवटरांचे दवाखाने त्यांचा सल्ला घेण्यासाठी आलेल्या जोडप्यांनी ओसंडून वाहात आहेत. मुलं होत नाहीत म्हणून वैद्यकीय उपचारांसह देव-धर्म, अंगारे धुपारे, नवससायास, राशी-ग्रह-चंद्र-तारे-कुंडली-पत्रिका यांच्यासह विविध धार्मिक विधी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. ...आणि त्याचवेळी एकापेक्षा अनेक लग्न करणारे, अनेक मुले जन्माला घालणारे, सांभाळ न करता आल्याने मुलांना कुठेतरी सोडुन देणारे अनेक नमुनेही पाहायला मिळतात. मी तर असेही पाहिले आहे की मुल आंधळे, अपंग, दिव्यांग प्रकारचे जन्माला आले तर काही जोडपी अशी मुलं सरळ बसस्थानकात, रेल्वे स्थानकात सोडुन देतात. मग कुणीतरी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अशांची माहिती सेवाभावी संंस्थांपर्यंत पोहचवतात व अशी निराधार मुलं या संस्थांमध्ये दाखल केली जातात. थोडवयात ज्याच्याकडे दात आहेत, त्याच्याकडे चणे नाहीत व ज्याच्याकडे चणे आहेत त्याला दात नाहीत अशातला प्रकार! दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, अनिल अवचट, रविंद्र कोल्हे या आणि अशा अनेक समाजधुरीणांनी अशा मुलांसाठी/व्यक्तींसाठी डोंगराएवढे कार्य करुन ठेवले आहे. तरीही रोजच्या रोज निराधार होणारी अनेक मुले आहेत. रस्यावर, चौकात, दारोदार भिक मागणाऱ्या, परिस्थितीने, नियतीने अन्याय केल्यावर एकाकी पडल्याने भंगार, डबे-प्लास्टीक बाटल्या गोळा करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या डोळ्यातील करुण, अगतिक, मजबूर, असहाय्य भाव एकदा नीट न्याहाळा. आपल्या मुलाला साधा ताप आला, शिंक आली, सर्दी-खोकला झाला तरी आपला जीव खालीवर होतो. मुलांच्या आजारात हाताचा पाळणा करुन रात्र रात्र जागणाऱ्या माता मी पाहिल्या आहेत. मग तुम्ही सांगा.. या निराधार बनलेल्या मुलांची यात काय चूक आहे? त्या मुलांना आई-वडीलांचे, समाजाचे प्रेम मिळवण्याचा, त्यांच्या संरक्षित, सुरक्षित छत्रछायेत, मायेखाली, वात्सल्याच्या नजरेत राहण्याचा अधिकार नाही का?

   या प्रकारच्या मुलांसाठी शासकीय अनाथालये, बालनिरीक्षण केंद्रे वगैरे वगैरे सारे आहे. पण तेथे त्यांना मायेची ऊब मिळत असेल? प्रत्येक मुल हे विशेष असते. त्याच्या सवयी, त्याच्या आवडी, न आवडणाऱ्या बाबी हे सारे खास असते. आई-वडील, सख्खी भावंडे सोडल्यास इतर कुणी हे विशेषत्वाने करु शकेल काय? अशा वेळी श्री. विजय जाधव संस्थापित ‘समतोल फाऊंडेशन' सारख्या बिगर सरकारी संस्थांचे काम डोळ्यात भरणारे आहे. निराधार मुलांना सांभाळणे, त्यांची काळजी घेणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात नेण्यासाठी प्रयत्नशील राहणे  हे खचितच सोप्पे नव्हे. कारण अशी रेल्वे स्थानकात सापडलेली मुले ही बऱ्याचदा नशेच्या आहारी गेलेली असतात. त्यासाठी ती गुन्हेगारी स्वरुपाची कृत्येही करु लागलेली असतात. तो सारा नकारात्मक ठसा पसुन त्यांना व्यसनमुक्तीचे, कष्टाचे, मेहनतीचे, चांगुलपणाचे, सामाजिकतेचे मोल समजावून त्यानुसार वागायला लावणे हा सारा मनःशांतीची कसोटी पाहणारा मामला  असतो. स्वतःचे एक मुल वाढवताना, त्याला सुसंस्कारी करताना, त्याच्यासाठी विविध प्रकारचे खर्च करताना पालकांची काय ओढाताण होत असते याची कल्पना आपल्या साऱ्यांना असेलच. या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांनी सोडुन दिलेली, नशेबाज, अनेकदा कुसंस्कारी बनू लागलेली मुले आपल्याकडे घेणे, त्यांना खाऊ-पिऊ घालणे, आजारांत त्यांची काळजी घेणे, त्यांना शिकवणे खूपच जिकीरीचे असते. म्हणूनच ‘समतोल' व  त्या सारख्या संस्थांच्या कामाबद्दल आस्था बाळगणे, त्यांच्याप्रति सहकार्याचा हात पुढे करणे हे तुमचे आमचे कर्तव्य ठरते.

   स्वतःचे, पत्नीचे, विवाहाचे, आपल्या मुलामुलींचे वाढदिवस अनेकजण खूप थाटामाटात हॉटेल, फार्म हाऊस, हॉलिडे होम, रिसॉर्ट अथवा तत्सम ठिकाणी वारेमाप खर्च करुन साजरे करीत असतात. ते अशा मुलांसाठी राबणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन त्या मुलांसोबत साजरे केल्यास त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. पोट भरुन तृप्तीचे ढेकर देणाऱ्यांनाच पुन्हा पार्टी देण्याऐवजी या मुलांसाठी अन्नदान, वस्त्रदानाप्रमाणेच वह्या-पुस्तके-छत्री, स्कूल बॅग्ज, चपला-बूट, केसांचे तेल, साबण अशा नित्याच्या वापराच्या वस्तू दिल्यास संस्था त्यावर करीत असलेला निधी अन्य गरजेच्या कामांसाठी वापरता येईल. आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी देऊनही या सत्कार्यात आपला वाटा उचलता येईल. अशा संस्थांची केंद्रे बऱ्याचदा निसर्गाच्या सानिध्यात, डोंगरात, जंगलात, नदी-तलावाजवळ वगैरे असल्याने निसर्गाच्याही निकट जाण्याचे, झाडाफुलांशी, गाई-गुरांशी, शहरी वातावरणात पारच दुर्मिळ होऊन बसलेल्या माती-गवत-फुलपाखरे-पक्षी यांच्याशीही हितगुज साधण्याची संधी लाभेल. बघा.. यातले काय जमते ते! कुठल्याही बालकावर निराधार होण्याची वेळ कधीही न येवो या मनीषेसह भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनि राहो!

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

Read Previous

नवे शहर : विश्वास आणि विकासाचा ३१ वर्षांचा प्रवास