म्हणी, वाक्प्रचारांचा छोटा पॅक.. मोठा धमाका

आपण लहानपणापासून विविध म्हणी, वाक्प्रचार ऐकत असतो. कमीत कमी शब्दांत जास्तीत आशय सांगण्याचे काम या म्हणी, वाक्प्रचार करत असतात. प्राचीन, ग्रामीण जीवनात त्या त्या काळाला अनुसरुन विविध म्हणी, वाक्प्रचार उपयोगात आले. त्यांचा लिखित साहित्यातही समावेश होत गेला. अलिकडच्या संगणक, मोबाईलप्रेमी नव्या पिढीला यातील काही म्हणी कदाचित समजणारही नाहीत, की त्यांचा अर्थही लक्षात येणार नाही. पण त्या म्हणी, वाक्प्रचार हे आपला सांस्कृतिक ठेवा बनून राहिले आहेत हे मात्र नक्की ! काळानुसार आता त्यात नव्या म्हणी, नवे वाक्प्रचारांची भर पडणार आहे.

   प्राणी आणि मनुष्यप्राणी यांत मूलभूत फरक काय? तर मानवप्राण्याला वाणी अर्थात बोलण्याचे वरदान लाभले आहे. तसे प्राणी-पक्षीही बोलत असतीलच की! त्यांचीही भाषा असेल; ती आपल्याला समजत नाही एवढेच. पण मनुष्यप्राण्याला या वाणीबरोबर बुध्दीचीही साथ लाभल्याने त्याने ती वाणी अर्थात बोली, भाषा आधी चित्रबध्द व कालांतराने लिपीबध्द केली आणि दळणवळण, संभाषण, संवादाचे एक प्रमुख साधन म्हणून उपयोगात आणली. याच भाषांचे अभ्यास होऊ लागले, त्यावर संशोधने झाली, विद्यापीठांतून स्नातक मंडळी त्यावर पदव्या मिळवू लागली. काही भाषांना अभिजाततेचा दर्जाही प्राप्त झाला. हीच भाषा पुढे जाऊन विसंवादाचे कारण बनेल, सीमावादाचे निमित्त बनेल, भाषांवरुन भांडणे, जाळपोळ, बंद पाळले जातील, ‘आपटून मारु/बुडवून मारु, नही मराठी बोलेंगे... क्या उखाडना है ऊखाड लो' असे शब्दप्रयोग केले जातील हे त्या भाषांना लिपीबध्द करणाऱ्यांनी कधी मनातही आणले नसेल. पण प्रत्यक्षात ते घडत असल्याचे आपण सारे अनुभवत आहोत हे मात्र खरे!

   भाषा कोणतीही असो; त्यातील म्हणी,  वाक्प्रचार, सुभाषिते त्या भाषेला रंगत आणत असतात. प्राचीन काळापासून या भाषांचे जतन, संवर्धन करण्याचे काम प्रामुख्याने महिलावर्गाने केले आहे. कारण मुल जन्माला आले की ते पहिल्यांदा ऐकते ते आपल्या आईचाच आवाज. त्याच्या नजरेला दर्शन होते ते त्याच्या आईचेच! महिला या एकाच वेळी अनेक कामे करता करता संवादही साधत असतात, अधिक बोलत असतात. भाषेचा खरा प्रचार-प्रसार करीत असतात. ते करताना त्या भाषेत विविध प्रयोग करुन निसर्ग, अनुभव, नित्याचे व्यवहार यातून भाषा समृध्द करत असतात. त्यामुळे मातेविषयी, मातृभाषेप्रति कुणीही अधिक संवेदनशील असणे अगदी स्वाभाविकच आहे. म्हणूनच की एखाद्याला डिवचायचे, चिडवायचे, भडकवायचे असेल तर त्याला आईवरुन शिव्या दिल्या जात असाव्यात काय? ‘उंटावरुन शेळ्या हाकणे..' हे आपण अनेकदा ऐकले असेल. पण महानगरी वातावरणात राहिलेल्या अनेकांना याचा नेमका अर्थ कदाचित माहित नसेल. शेळ्या हाकणे हे तसे जिकिरीचे काम आहे. मग उंटावर बसून त्या हाकणे तर कर्मकठीण! काहीही न करता बरेच काही करत असल्याचा देखावा निर्माण करणे म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकणे होय. आपल्या शहरी मुलाबाळांना आता जीवंत उंट व शेळी दाखवणे तसे कठीण काम बनले आहे. केवळ जिओग्राफिकल किंवा ॲनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवरच हे प्राणी हालचाल करताना पडद्यावर पाहायला मिळतात. अशावेळी या म्हणी नव्या पिढीच्या डोक्यात उतरणे आणि त्यांनी त्यांचा वापर त्यांच्या लिहीण्या-बोलण्यात करणे दुरापास्त बनून गेले आहे.

   ‘बाजारात तुरी भट भटणीला मारी' हीही आता दुर्मिळ, अनोळखी बनत गेलेली म्हण आहे. एकेकाळी शालेय अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात अशा प्रकारच्या म्हणींचा समावेश असे. एखादी गोष्ट हाती यायच्या, मिळायच्या आतच त्यावरुन भांडण, वाद निर्माण करणे हा याचा अर्थ आहे. आता एखादा भट भटणीला मारायला गेला तर कदाचित ‘डोमेस्टीक व्हायोलन्स अर्थात घरगुती हिंसाचाराचा' गुन्हा दाखल होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे ते दृश्यही आता कुठे दिसणे कठीण! मग जे दिसणे, ऐकणे, अनुभवणे कठीण बनत चालले आहे ते तुमच्या भाषेत कसे उतरावे? म्हणून ही म्हणही आता कालसुसंगत राहिलेली नाही. ‘दिले दान घेतले दान पुढच्या जल्मी (जन्मी या अर्थाने !) मुसल्मान!' ही पण एक म्हण होती. मला याचा अर्थ कधीही कळला नाही. केवळ यमक जुळते म्हणून ती उपयोगात आली का? तेही माहित नाही. आता तर समाजमाध्यमांवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट आली तर दोन समुहांत जातीय/धार्मिक दंगा उसळतो. जाळपोळ, हिंसाचार, अटकसत्र,  गुन्हे नोंदवण्याचे प्रकार सुरु होतात. त्यामुळे याही म्हणीचे काहीच औचित्य उरले नाही. ‘आमची अब्रू मातीत घातलीस' किंवा ‘हमारे खानदानका नाम मिट्टीमे मिला दिया' या प्रकारचाही एक वाक्प्रचार काही वर्षांपूर्वीपर्यंत चित्रपट, मालिका, कथा, कादंबऱ्या यातून हमखास ऐकायला, वाचायला मिळत असे. शक्यतो ज्या मुला-मुलींनी पळून जाऊन जाती-धर्माबाहेरच्या जोडीदाराबरोबर लग्न केले आहे किंवा लग्न करायच्या बेतात आहेत अशांना प्रामुख्याने त्यांचे त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, काका-मामा ही बुजुर्ग पिढी हा डायलॉग दातओठ खात सुनवत असे. अशा वेळी त्या लग्नाळू युवा-युवतीला मदत करणाऱ्या मित्र-मैत्रीणी, काही शुभचिंतक नातेवाईकांची फळी पुढे सरसावत असे आणि सर्व संबंधितांच्या शिव्या-शाप, अपशब्द, अबोला झेलून त्या दोन जीवांचे मिलन घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावत असे. पुढे पुढे असे होऊ लागले की हे ‘खानदान की इज्जत/अब्रू मातीत'वाले डायलॉग फेकणारेच लोक नंतर त्या जोडप्यांशी गोड होत, त्यांची मुले खेळवताना मी पाहिले आहेत...आणि संकटसमयी मदत करणारे मित्र-मैत्रीणी, नातेवाईक मात्र कायमचे दुश्मन बनून जात.  

   ‘मी म्हणून टिकले..दुसरी कुणी असती तर केंव्हाच हे घर सोडुन निघून गेली असती..' हा वाक्प्रचार आहे मराठीत; पण याचे  रुपांतर कोणत्याही भाषेत केले तरी चालू शकेल इतका तो दैनंदिन जीवनात अखिल भारतीय  पातळीवर वापरला जातो. वर म्हटल्याप्रमाणे महिला या भाषेच्या खऱ्या प्रचारक-प्रसारक असतात व त्याच भाषा खऱ्या अर्थाने समृध्द करत असतात. मला तर संशय आहे की आई-वडीलांनी, काका-मामा, मध्यस्थाने पुढे येऊन जुळवून दिलेले सजातीय विवाह तर आहेतच; पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडुन मग प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांमध्येही ‘मी म्हणून टिकले' या वाक्प्रचाराचा वापर वाढत्या प्रमाणात होत असावा. अगदी अमिताभ बच्चनलाही खासदार जया कधी ना कधी तरी ‘मी म्हणून टिकले' असे बोललीच असेल. तिची राज्यसभेतील भाषा ऐकली तर यात सत्यता असण्याचीच शक्यता अधिक वाटते. एक मात्र खरे की ‘दुसरी कुणी असती तर घर सोडुन गेली असती' असे म्हणणाऱ्या महिला कधीही ते घर सोडुन जात नाहीत. कारण...त्या आधी बोललेल्या असतात की ‘मी म्हणून टिकले.' ‘झाकली मूठ सव्वा लाखाची' ही एक लोकप्रिय म्हण आहे. मागील पिढीच्या बोलण्यातून ती वारंवार ऐकायला मिळते. याचा अर्थ असा की आपली दुबळी, कमजोर बाजू लोकांसमोर न आणता तशीच झाकून, दडपून, लपवून ठेवणे. पण मला एक समजत नाही की नेमके सव्वा लाखच का इथे वापरले आहेत? झाकून झाकायचे तर चांगले पन्नास-साठ तरी झाकायचे होते. हल्ली महागाई किती वाढलीय?  सव्वा लाखात काय होणार? मग मीच माझी समजूत घालतो की सव्वा लाख रुपये तरी एका मुठीत मावतील काय? त्यात मोदींनी हजाराच्या नोटा बंद केलेल्या! म्हणजे सगळ्या पाचशेच्याच नोटा मुठीत घेऊन झाकाव्या लागतील. म्हणजे पाचशेच्या सुमारे दोनशे पन्नास नोटा! त्याची घडी कितीतरी जाड होणार..त्यामुळे नोटा झाकल्या जाण्याऐवजी मुठीतून दिसण्याची शक्यताच अधिक वाढेल. जास्त हव्यास नसलेलाच बरा! सव्वा लाख तर सव्वा लाख ! या म्हणीला समांतर पंक्ती मला एका हिंदी सिनेमाच्या गाण्यात सापडल्या. १९७३ साली रजतपटावर झळकलेल्या धर्मा या चित्रपटासाठी वर्मा मलिक यांनी लिहीलेले, प्राण आणि बिंदू यांच्यावर चित्रीत झालेले, आशा भोसले व मोहम्मद रफी यांनी गायिलेले ‘इशाराेंको अगर समझो राज को राज रहने दो' हे गाणे त्या काळी प्रचंड गाजले होते.

   गेल्या पंचवीस तीस वर्षांत जन्माला आलेल्या पिढीला या साऱ्या म्हणी, हे विविध वाक्प्रचार माहीत असतीलच असे नाही. कोणत्याही भाषेच्या या अंगाचे संरक्षण, संवर्धन, प्रचार, प्रसार होण्यासाठी ते सतत वापरात असावे लागतात. त्यासाठी लोकांनी एकत्र येणे, बोलणे, थट्टाविनोद करणे, प्रसंगी भांडणे, वाद घालणे, प्रसंगी शिव्याही देणे हे सारे गरजेचे असते. आता कुटुंबेही आक्रसत गेली आहेत आणि लोकांचे एकमेकांमध्ये जाणे, मिसळणे, वावरणेही अवघड बनत चालले आहे. ती सर्व कामे लोक हल्ली मोबाईलला करायला सांगतात. भाषा ही तोंडात व कानात असते. की पॅडवर किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉपवर असते ती केवळ लिपी! म्हणून आताच्या काळाला अनुसरुन मग काही वेगळ्या म्हणी जन्माला घालाव्यात की काय, याचा विचार मी केला आणि त्यातील काही सुचल्याही. उचलली बोटे ठेवली की पॅडवर! मी अनेक ठिकाणी पाहिलंय की कार्यक्रम सुरु असतानाच अनेक जण फोटो, व्हिडिओ काढतात आणि मोबाईलच्या की पॅडवर काहीबाही टाईपून लागलीच ते समाजमाध्यमी धाडतात. दुष्काळात सर्व्हर डाऊन. याचाही अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. पैसे काढायला जावे तर एटीएम वर किंवा गुगल पे वर सर्व्हर डाऊनची सूचना झळकते. अकाऊंटला नाही रुपये सात.. करतो लाखाची बात! हेही तुम्ही पाहु शकता. बोलघेवडे लोक काय प्रकारच्या थापा मारतील आणि पुन्हा पैशांसाठी कुणापुढे हात पसरतील याचा नेम नसतो. फेसबुकवर पाच हजार मित्र नि गल्लीत विचारीना कुत्रं ! असंही अनेकांच्या बाबतीत अनुभवायला येतं. नवरा एकदा का कामावर गेला...इकडे बाई रमली बनवण्यात रीला. अलिकडे सेल्फी काढण्याच्या, रील्स बनवण्याच्या प्रकारांना ऊत आला आहे. त्यातही अनेक महिला यात आघाडीवर दिसून येतात. स्वतःचा एखादा मादक फोटो समाजमाध्यमावर झळकावून सांगा मी कशी दिसते? टाईप प्रश्न विचारुन आंबटशौकीन रिकामटेकड्यांना खुळावण्याचे प्रकारही या नटखट महिलांकडून लाईक, शेअर, कमेंट कमावण्याच्या नादात सातत्याने केले जात असतात. त्यामुळे या व अशा अनेक नवीन म्हणी, वावप्रचारही आता भाषेमध्ये रुळतील की काय, याची शक्यता अधिक वाटते.

-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

राखी