श्रावणमासी

तिला पाहाताच मी हरखुन गेलो. ती लावण्यसुंदरी विविध अलंकार ल्यालेली मी पाहत होतो. हिरवा शालु नेसून ती लावण्यवती अधिकच मोहक दिसत होती. अशी लावण्यसुंदरी मी माझ्या नेत्रांनी पाहत बसलो होतो. माझे नेत्र तिचं सौंदर्य बघून सुखावत होते. तसा मी तिला अधिकच निरखुन पाहत होतो. हिरव्यागार गवतांचं रंग सांडीवर ल्यालेली तिच्या साडीवर विविध फुलांची नक्षी उठून दिसत होती. हिरवा रंग नेत्रांना सुखावत असतो. म्हणून तर धरणीनं श्रावणात हिरवा शालु नेसून नट्टापट्टा केला होता. तो तिचा नट्टापट्टा साऱ्या जीवांना लुभावत होता. इतकं ते लोभसवाणं रुप मी एकटक पाहत बसलो होतो. इतवयात झाडावर बसलेल्या पोपटाने आवाज दिला तसा मी त्या पोपटाकडे बघू लागलो..जणू तो मला खालीवर मान हलवून सांगत होता...

सृजन श्रावण आला...मित्रा,  सृजन श्रावण आला..

असा हा सृजन श्रावण म्हणजे धरणीचा जणू लग्न सोहळा. अशा या श्रावणाचं आगमन होताच ही धरणी हिरवा शालु नेसून नवरीवाणी नटू लागते. तिच्या लावण्यांवर मेघांनी हलकेच वर्षाव केला. तशी ती धरणी मेघांच्या वर्षावानं लाजुन चुर झाली. एखाद्या प्रियकरानं प्रेयसीच्या अंगावर हलकेच पाण्याचे तुषार उडवावे तसे तुषार मेघांनी तिच्या अंगावर उडवले तेव्हा ती धरणी लाजून गोरीमोरी झाली नववधु सारखी. खरच धरणी आज नववधु झाली होती. हेच ते दिवस तिचे फुलायचे, झुलायचे आले होते. वाराही खट्याळपणे तिचा पदर उडवीत होता. तरीही धरणीला त्याचा मुळीच राग येत नव्हता. कारण हा वारा तिचा जीवलग मित्र होता. श्रावणातला घन धरणीच्या अंगावर पडून धरणीला तृप्त करीत होता. त्या तृप्ततेच्या भावनेने धरणीच्या अंगावरील रोम न्‌ रोम शहारुन येत होता. ती शहारली की अधिक सुंुदर दिसायची.

तिचं ते सुंदर रुप मी कितीतरी वेळ न्याहळत बसायचो. हिरव्यागार लता वेली, तरु तिच्या अंगावर शोभून दिसायचे. जणू धरणी लता वेली, तरु आणि फळाफुलांचे अलंकार ल्यालेली दिसत होती. तिचा हा साजशृंगार साऱ्या जीव सृष्टीला सुखावत होता. विविध रंगांनी नटलेल्या धरणीचं श्रावण महिन्यातील रुप पाहण्यासारखं असतं. असा हा धरणीला नटविणारा श्रावण अन्‌ सजीव सृष्टीला लुभावणारा श्रावण आला की श्रावणमासी हर्ष मानसी झाल्याशिवाय राहात नाही. - एकनाथ गोपाळ मढवी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

विनोद सम्राट शाहीर दादा कोंडके