तिकिटांचा काळाबाजार त्यात कोकणकरांचे हाल !

ऑनलाईन तिकीट बुकींगच्या बाबतीत केला जाणारा मोठा स्कॅम आयआरटीसीने शोधून काढला आहे. जानेवारी ते मे २०२५ दरम्यान आयआरसीटीसीने तब्बल २.९ लाख अशी तिकीट बुकिंग्स शोधून काढली आहेत. तिकिट बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये तिकीटे बूक केली जातात; मात्र ही सर्व तिकीटे सर्वसामान्य प्रवाशांकडून बुक केली जात नसून फसवणूक करणाऱ्या एजंट मंडळींकडून केली जात असल्याचे उघड झाले आहे. ही तिकीटे ज्या खात्यांवरुन खरेदी केली जातात ती खाती खोटी माहिती देऊन आणि ऑटोमॅटिक तंत्रज्ञान वापरुन हाताळली जातात.कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून दरवर्षी हा त्रास कोकणकरांना सहन करावा लागत आहे. यावर उपाय काढणार तरी कोण?

 शिमगा आणि गणपती हे कोकणातील पारंपारिक उत्सव. गेल्या काही वर्षांत कोकणपट्टीत राहणाऱ्या जवळपास प्रत्येक घरातील किमान एक माणूस नोकरी व्यवसायासाठी मुंबई ठाण्यात येऊन राहिला आहे. त्याच्यातील काहींची तिसरी तर काहींची चौथी पिढी आज या शहरांत राहत आहे, शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करत आहे. असे असले तरी या सर्वांची नाळ अजूनही कोकणातील आपल्या गावाशी, घराशी आणि कुटुंबाशी घट्ट जोडलेली असल्याने किमान या दोन सणांच्या निमित्ताने जवळपास प्रत्येक कोकणकर आपल्या गावी जायला निघतो. गणपती अगदी तोंडावर आल्याने आत्ता गणपतीत गावी जाण्याची सिद्धता या सर्वांची सुरु झाली आहे, त्यासाठी कार्यालयातून सुट्टी घेणे.

 गणपतीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करणे, कुटुंबासाठी आणि गावी राहणाऱ्या आपल्या वाडवडिलांसाठी नवीन कपडे खरेदी करणे याबरोबरच  गावी जाण्यासाठी तिकीटमिळवण्याची धडपडही सुरु झाली आहे.

कोकणात रेल्वे सुरु झाल्यापासून कोकणकरांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे कोकणकर पहिले प्राधान्य रेल्वेला देतात त्यासाठी बुकिंग केव्हापासून सुरु होणार याची वाट पहिली जाते. एकदा ती तारीख कळली की तिकीट खिडक्यांवर मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतात. कोकणकरांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासन या दोन सणांच्या निमित्ताने दरवर्षी जादा गाड्या सोडते, यंदाही प्रशासनाच्या वतीने जादा रेल्वे आणि एस टी बसेस सोडण्यात येणार आहेत. मात्र दरवर्षी या सर्व रेल्वेगाड्या तिकीट खिडकीवर आपला नंबर येण्याआधीच फुल्ल झालेल्या पाहायला मिळतात. ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांनाही हाच अनुभव येतो. तात्काळ बुकींगच्या बाबतीतही हा अनुभव आज अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे या बुकिंग जातात कुठे हा यक्षप्रश्न यानिमित्ताने प्रत्येकालाच पडतो. मग सुरु होते तिकीट मिळवण्यासाठीची धडपड. कोणाच्या ओळखीने तिकीट मिळते का? बुकिंग एजंटकडे तिकीट मिळते का याचा शोध घेतला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तासनतास रांगेत उभे राहूनही तिकीट मिळत नाही मात्र या एजंट मंडळींना अधिकचे पैसे देऊन सहज तिकीट मिळते. मग या एजंट मंडळींकडे तिकीट येते तरी कुठून? अर्थातच यामागे मोठा भ्रष्टाचार लपला असून रेल्वेतील अधिकारी मंडळींपासून तिकीट बुक करणारे कर्मचारीही या साखळीत सहभागी झालेले असतात. ऑनलाईन तिकीट बुकींगच्या बाबतीत केला जाणारा मोठा स्कॅम आयआरटीसीने शोधून काढला आहे. जानेवारी ते मे २०२५ दरम्यान आयआरसीटीसीने तब्बल २.९ लाख अशी तिकीट बुकिंग्स शोधून काढली आहेत. तिकिट बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये तिकीटे बूक केली जातात; मात्र ही सर्व तिकीटे सर्वसामान्य प्रवाशांकडून बुक केली जात नसून फसवणूक करणाऱ्या एजंट मंडळींकडून केली जात असल्याचे उघड झाले आहे. ही तिकीटे ज्या खात्यांवरुन खरेदी केली जातात ती खाती खोटी माहिती देऊन आणि ऑटोमॅटिक तंत्रज्ञान वापरुन हाताळली जातात. ज्यामुळे तिकीटांची विक्री सुरु झाल्यानंतर काही वेळातच या खात्यांवरुन तिकीटे बुक केली जातात आणि सर्वसामान्यांच्या हाती लागते ती केवळ निराशा.

‘द टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय रेल्वेने खोटी माहिती आणि आयडी देऊन तयार केलेली अडीच कोटी खाती निष्क्रिय केली आहेत. तसेच २० लाख खाती रिव्हेरिफिकेशनअंतर्गत असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी अनेक खाती ही तात्पुरत्या ईमेल आयडीवरुन तयार करण्यात आली आहेत. हे ईमेल आयडी मोजक्या वेळा वापरले जाण्यासाठीच असतात. त्यामुळेच यामागील खरे आरोपी शोधणे कठीण आहे.  या खोट्या खात्यांच्या माध्यमातून तिकीटांची दलाली करणारे मोठ्या प्रमाणात तिकीटे बुक करतात आणि नंतर अधिक किंमतीला ती सर्वासामान्य, गरजू लोकांना विकून नफा कमवतात. उत्सवाच्या काळात आणि सुट्ट्यांच्या काळात तिकीटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होतो. जेव्हापासून कोकण रेल्वे सुरु झाली आहे तेव्हापासून दरवर्षी हा त्रास कोकणकरांना सहन करावा लागत आहे. यावर उपाय काढणार तरी कोण? आजमितिला मोठमोठे दिग्गज मंत्री कोकणाला लाभलेले आहेत. पुढच्या १० पिढ्या बसून खातील एव्हढी संपत्ती कोकणकरांच्या जीवावर त्यांनी उभी केली आहे. ही मंडळी या भ्रष्टाचाराकडे, कोकणकरांवर होत असलेल्या या अन्यायाला केव्हा वाचा फोडणार आहेत ?

गेल्या काही वर्षांपासून काही राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी कोकणकरांना आपल्या गावी जाता यावे यासाठी स्वखर्चातून खासगी आणि एसटी बसेस विनामूल्य उपलब्ध करून देतात. काहीजण रेल्वेचे कन्फर्म तिकीटही विनामूल्य मिळवून देतात; मात्र गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव असल्याने अनेक कोकणकरांना इतरांच्या मेहेरबानीतून हा उत्सव साजरा करायचा नसतो. गणरायाच्या कृपेनेच आपला चरितार्थ चालला असून गणेशोत्सवासाठी आपल्या स्वकमाईतून पैसा खर्चावा ही त्यांची मनोमन इच्छा असते अशा भाबड्या गणेशभक्तांनी दरवर्षी तिकिटासाठी संघर्षच करायचा का? संघर्ष करूनही तिकीट काही मिळत नाही, मग इच्छा नसतानाही एजंटच्या घशात अधिकचे पैसे कोंबून पुन्हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचे का? ही लुबाडणूक कोकणकरांनी आणखी किती वर्षे सहन करायची? भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. या किडीतून काही जण श्रीमंत होतात; मात्र सामान्य माणूस त्यामध्ये पिचला जातो. कोकणकरांची होत असलेली ही पिळवणूक थांबवण्यासाठी सरकार काही करणार आहे की नाही ? - जगन घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतातील शिल्पधन त्रिकुटेश्वर मंदिर गदग : ‘स्वयंभू ईश्वर'