महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कारगिल युद्धातली कमी प्रसिद्ध बलिदाने!
अशुली आणि सुंदर सिंग यांच्यावर पूर्ण विश्वास होता...ते दोरखंड धरून यांना वर घेत होते....कंपनी वर चढून आली...तोवर इतर ठिकाणांवरून कंपनीवर गोळीबार होऊ लागला...पण अशुली आणि सुंदर सिंग डगमगले नाहीत....जबर जखमी झाले; पण जागा नाही सोडली! वर आलेल्या सैनिकांनीही मग नेम धरले....आणि ५१४० डोंगर गोळीबाराने चमकू लागला..शत्रूवर आता चौफेर हल्ला सुरु होता...पहाट होऊ लागली होती....मिशन फत्ते...अशुली आणि सुंदर सिंग यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांना संदेश दिला....!
कारगिलमध्ये घुसलेल्या पाकिस्तानला आता अखेरचा मोठा धक्का मारण्याची वेळ आली होती. १९९९ च्या मे महिन्यात सुरु झालेले ‘ऑपरेशन विजय' अनेक बलिदाने करीत पुढे वाटचाल करीत होते. टायगर हिल, तोलोलिंग सारखी महत्त्वपूर्ण शिखरे भारतीय बहादूर अधिकारी-सैनिकांनी पुन्हा ताब्यात मिळवली होती. पण एखादी मोठी फांदी तोडत असताना आणि ती अगदी तुटण्याच्या बेतात आली असताना, एखादी मोठी गाठ लागावी आणि कु-हाड अडावी अशी परिस्थिती निर्माण झाली!
१६९९२ फूट उंची लाभलेल्या आणि ५१४० असा क्रमांक प्राप्त झालेल्या एका शिखरावर शत्रू अतिशय भक्कम स्थितीमध्ये बसून होता...आणि मन मानेल त्या ठिकाणी अचूक गोळीबार करू शकत होता. ५१४० वर कब्जा मिळवण्यासाठी वर चढून जाताना मध्ये पिरॅमिड, ब्लॅक टूथ अशी नावे मिळालेले भलेमोठे उंचवटे गाठावे लागणार होते आणि याही उंचवट्यांवर शत्रूचा एक मोठा संगर कार्यरत होता. संगर म्हणजे खंदक, बंकर! यातून लपून शत्रू गोळीबार करू शकतो आणि पाकिस्तानची तयारी कित्येक महिने आधीपासून असल्याने हे संगर अत्यंत भक्कम होते.
या शत्रूकडे स्वयंचलित मशीनगन्स होत्या, रॉकेटस होती आणि मुख्य म्हणजे उंचावर असल्याचा फायदा होता..त्यांना खालून वर येणा-या भारतीय सैनिकांना टिपून मारता येत होते! भारतीय रणधुरंधरांनी या दिवसापर्यंत बराच अनुभव गाठीशी जमा केला होता....अर्थात त्यासाठी मोठी किंमत मोजली होती. ५१४० वर तीन बाजूंनी हल्ला करायचे ठरले...१३, जम्मू काश्मीर रायफल्स, १८,गढवाल रायफल्स आणि १, नागा रेजिमेंट. ही नागा रेजिमेंट तर भारतीय सेनेतील नवख्या रेजिमेंटस पैकी एक...१९७० मध्ये स्थापित झालेली. यांनी १९७१मध्येही उत्तम कामगिरी बजावली होती. मणिपूर आणि दक्षिण-पूर्व भागातील पर्वतीय प्रदेशातील काटक, शूर सैनिकांचा समावेश असतो या रेजिमेंटमध्ये. पर्वतराजीमध्ये जन्मलेले हे सैनिक जन्मजात पट्टीचे गिर्यारोहक असतात. कारगिलमध्ये म्हणूनच सर्वांत आधी १, नागा रेजिमेंट उतरवली गेली होती...आणि सुदैवाने १९९८ मध्ये १, नागा काश्मीरमध्येच होती...त्यांनी अनेक अतिरेकीविरोधी मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या होत्या! पण आता त्यांना प्रत्यक्ष, त्यांच्या घरच्या मैदानावर अर्थात डोंगरामध्ये त्यांचे युद्धकौशल्य दाखवण्याची संधी मिळाली होती!
५१४० वरील हल्ल्याच्या आधीही १, नागाने राजपुताना रायफल्सला त्यांच्या कामगिरीत मोलाचे साहाय्य केले होतेच. इतर अनेक मोहिमांमध्ये यांनी सहभाग घ्ोतला होताच. आणि आता त्यांच्यावर हा काळा दात उपटून काढण्याची जबाबदारी दिली गेली होती!
२२ जुलै, १९९९...तिन्ही बाजूंनी चढाई सुरु झाली...१, नागाच्या अल्फा कंपनीला अर्थात सुमारे १२० सैनिकांना एका विशिष्ट बाजूने पर्वत चढून जात हल्ला करण्याचा आदेश दिला गेला...सायंकाळी सैनिक पाठीवर रायफल्स, मशीनगन्स घेऊन डोंगर चढू लागले...पाकिस्तानी सैन्य वरून अधून मधून गोळीबार करत होतेच. शिवाय शंका आली तर त्या विशिष्ट दिशेला प्रचंड गोळीबार सुरु होई.
१, नागा अल्फा बरीच वर चढून आली होती...पण एका चौदा-पंधरा मीटर्स उंचीच्या अगदी सरळसोट कातळाच्या भिंतीने त्यांची वाट रोखली...ग्रेनाईटचा डोंगर तो...मुंगीलाही पाय ठेवता येणार नाही...अशी स्थिती. नाही म्हणायला बोट रुतवता येईल एवढी जागा होती अध्येमध्ये...पण पाय कुठे ठेवणार? वरून कुणीतरी दोरखंड सोडला तर त्याला धरून वर चढता येईल...पण वर दोर लावणार कोण? निरुपाय होऊन कंपनी थबकली...पण काहीच क्षण! ३२ वर्षे वयाचे आणि अतिशय कुशल गिर्यारोहक, अनुभवी सैनिक असलेले शिपाई सुंदर सिंग नेगी आणि २३ वर्षांचा तरणाबांड पहाडी गडी शिपाई के.अशुली स्वयंस्फूर्तीने पुढे सरसावले. अशुली तर पुढेच निघाले...खांद्यावर लाईट मशीनगन, हातगोळे आणि इतर साहित्य...सोबत मोठा दोरखंड. रात्रीचा भयावह अंधार...महाभयानक थंडी...आणि काचणारा डोंगर...बोटं सोलवटून निघणार हे निश्चित. एक एक इंच शरीर वर उचलत न्यावे लागत होते...बोटाच्या साहाय्याने...शरीराचा सारा भार हातांच्या बोटांवर. वर बसलेला शत्रू सावध झालेला होता...यांची हालचाल जराशी जरी दिसली, यांची सावली थोडीशी जरी दिसली तरी वरून प्रचंड गोळीबार होत राहिला....पण त्यांचे नेम चुकत होते सुदैवाने. सुंदर सिंग आणि अशुली...जीवाच्या आकांताने चढण चढत होते....खाली इतर सैनिक श्वास रोखून वर पहात होते...डोंगरराजा...यश दे आमच्या पोरांना...अधिकारी साकडे घालत होते...कितीतरी वेळ हे श्वास रोखलेले राहिले...शत्रूने आता तर रॉकेट डागायला आरंभ केला होता...अशुली आणि सुंदर सिंग यांच्या शेजारच्या पहाडाच्या ठिक-या उडत होत्या....! पण तरीही हे वीर थांबले नाहीत...एखादी घोरपड डोंगरकड्याला घट्ट चिकटून राहावी आणि वरवर चढत राहावी,तसे हे दोघे वर चढत होते. आणि त्यांच्यापैकी एकजण त्या उंचवट्याच्या वरच्या भागाला धरू शकला...त्याने दोरखंड एका कपारीला घट्ट अडकवला....खाली असलेला गडी वर ओढून घेतला गेला.....शत्रूच्या संगरमध्ये हालचाल सुरु झाली...हिंदोस्तानी आ गये...एकच कल्लोळ उठला...संगरमधल्या स्वयंचलित बंदुका गर्जू लागल्या...अशुली यांनी लाईट मशीनगनच्या वर्षावात त्यांना भाजून काढले...सुंदर सिंग नेगी यांनी एक हातगोळा अगदी अचूक फेकला आणि संगर शांत झाला...कायमचा! खाली असलेली कंपनी आता भराभर वर चढू लागली...दोरखंड भक्कम बांधला गेला होता...आणि मुख्य म्हणजे अशुली आणि सुंदर सिंग यांच्यावर पूर्ण विश्वास होता...ते दोरखंड धरून यांना वर घ्ोत होते....कंपनी वर चढून आली...तोवर इतर ठिकाणांवरून कंपनीवर गोळीबार होऊ लागला...पण अशुली आणि सुंदर सिंग डगमगले नाहीत....जबर जखमी झाले; पण जागा नाही सोडली! वर आलेल्या सैनिकांनीही मग नेम धरले....आणि ५१४० डोंगर गोळीबाराने चमकू लागला..शत्रूवर आता चौफेर हल्ला सुरु होता...पहाट होऊ लागली होती....मिशन फत्ते...अशुली आणि सुंदर सिंग यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांना संदेश दिला....! तिन्ही बाजूंनी प्रचंड जोशात हल्ला झाल्याने ५१४० लवकरच ताब्यात येऊ शकले...पण अशुली आणि सुंदर सिंग जबर जखमी झाले होते, प्रचंड रक्तस्त्राव झाला होता...वैद्यकीय मदत मिळाली; पण तोवर उशीर झाला होता...त्या उंच डोंगरांच्या साक्षीने हे दोन्ही वीर त्या डोंगरांच्या वर असलेल्या आभाळातील स्वर्गाकडे निघून गेले होते...पण त्यांच्या पराक्रमाने त्या युद्धातले एक मोठे यश भारतीय सेनेला लाभले! मणिपूरमधील सेनापती जिल्ह्यात एका खेड्यात, सामान्य घरात जन्मलेले शिपाई के.अशुली माओ यांना पुत्रप्राप्ती होऊन केवळ सहाच महिने झाले होते...त्यांनी त्यांच्या नवजात बालकाचा चेहराही अजून पाहिला नव्हता....आता तर बापलेकाची भेट होणारच नव्हती! के. अशुली यांना ५१४० कारवाई मध्ये धीरोदात्त पराक्रम गाजवल्याबद्दल मरणोत्तर वीर चक्र प्रदान केले गेले!
(शिपाई सुंदरसिंग नेगी आणि के.अशूली यांचा पराक्रम सर्वांना समजावा म्हणून हा लेख लिहिला आहे. इंटरनेटवर अनेक अशा साईट्स आहेत, ज्या इंग्रजीत माहिती देत असतात. व्हिडिओ, मुलाखती, बातम्या आहेत. त्यांतून मी ही माहिती संकलित केलेली असते. छायाचित्रेसुद्धा साभार घेतलेली असतात. जय हिंद!)
-संभाजी बबन गायके