१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशा १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्को या जागतिक संस्थेच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनाची शिफारस झाल्याने महाराष्ट्राच्या गौरवात भर पडली आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच सामान्य जनतेनेदेखील गड-किल्ल्यांवर जाऊन आपला आनंद व्यक्त केला. आपला इतिहास प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असतेच. या शिवाय इतिहासातून लढण्याची प्रेरणा मिळते. भविष्याची रणनीती ठरवण्याची दिशा मिळते. येणाऱ्या पिढ्यांना आपल्या पूर्वजांसह जुनी संस्कृती अभ्यासता येते. त्यामुळे ऐतिहासिक दुर्ग आपले कायम प्रेरणास्त्रोत आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात निर्माण झालेले हे दुर्ग महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीची साक्ष देणारे ठरते. सोबतच अल्प आयुष्यातसुद्धा जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर तुम्ही भीम पराक्रम जगापुढे ठेवू शकता. हजारो वर्ष येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करू शकता असा वस्तूपाठ छत्रपती शिवरायांच्या या १२ किल्ल्यांनी महाराष्ट्राला, देशाला दिला होता. आता हा दूरदृष्टीचा वारसा यानिमित्ताने जागतिक झाला आहे.

 युनेस्को - कार्य आणि भूमिका : युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) या संस्थेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून शांतता व सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. युनेस्कोचा उद्देश म्हणजे जगातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचे जतन करणे, जपणे आणि जागतिक समुदायात त्यांची ओळख निर्माण करणे. यासाठी                                 , १९७२  तयार करण्यात आले.

भारताने १९७७ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा करारावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून अनेक स्थळांना या यादीत मान्यता मिळाली आहे. सध्या भारतात जवळपास ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत (२७ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक, १ मिश्र स्वरूपाची व इतर प्रस्तावित).यामध्ये राजस्थानच्या गडकिल्ल्यांचाही सहभाग होता. महाराष्ट्राचे गड किल्ले मात्र दुर्लाक्षित होते. यानिमित्ताने त्याकडे जागतिक लक्ष वेधले गेले आहे. भारतातील स्थळांची शिफारस केंद्र सरकार अंतर्गत भारतीय पुरातत्व विभाग करतो. राज्य सरकार, स्थानिक संस्था आणि तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र सरकार युनेस्कोला प्रस्ताव सादर करते.

पराक्रमाच्या १२ यशोगाथा : महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी नामनिर्देशन देण्यात आले आहे. हे सर्व किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे जिवंत प्रतीक आहेत. स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला रायगड, शिवाजी महाराजांचा सर्वात प्रिय किल्ला राजगड, अफझलखानाचा वध ज्या ठिकाणी झाला तो प्रतापगड, महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार पन्हाळा, महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी, भक्कम डोंगर रांगेवर वसलेला आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचा लोहगड, मराठ्यांनी पहिला मोठा विजय मिळवलेला किल्ला साल्हेर, सागरी संरक्षणासाठी बांधलेला दुर्ग सिंधुदुर्ग, सागरी दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा सुवर्णदुर्ग, सागरी लढायांचे केंद्र विजयदुर्ग आणि मुंबई किनाऱ्याजवळील सागरी संरक्षणकवच असलेला खांदेरी किल्ला. तर तामिळनाडू राज्यातील दक्षिणेकडील रणभूमीवर मराठ्यांनी ताबा मिळवलेला जिंजी किल्ल्याचा यात समावेश आहे.

 तत्कालिन युद्धनीतीचे शिलालेख : महाराष्ट्रातील हे बारा किल्ले आपल्या शेकडो युद्धनीतीच्या प्रात्यक्षिकांसह उभे आहेत.हे वास्तुकलेचे प्रत्यक्ष दर्शन असले तरी जगाला आपल्या दगडांच्या कवितेतून तत्कालीन युद्धनीतीला सांगणारे उत्तम प्रतीचे जणू शिलालेखही आहेत. थोडक्यात, प्रत्येक किल्ल्याकडे आपली एक गाथा आहे. जगाला नवल वाटेल अशी रोचक प्रत्येकाची कथा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हे किल्ले राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अनमोल आहेत. प्रत्येक किल्ल्याचे वैशिष्ट्य स्वयंपूर्ण असून जागतिक पर्यटकांनादेखील तत्कालीन युद्धनीतीची माहिती देणारे आहे. सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांवर आणि किनाऱ्यावरही किल्ले बांधण्यात आली, ज्यामुळे शत्रुपासून संरक्षण अधिक प्रभावी झाले. मराठा स्थापत्यकलेतील माची एक वैशिष्ट्य  किल्ल्याच्या टोकाला किंवा बाहेरील भागात असलेले बुरुजयुक्त संरक्षण. अशा माच्या जगातील इतर कुठल्याही किल्ल्यांमध्ये दिसत नाहीत.

शत्रूला सहज लक्षात न येणारे वळणदार, सुरक्षित दरवाजे ही एक विलक्षण प्रवेशद्वारांची रचना आहे. गनिमी कावा अर्थात गुरीला युद्ध नीतीमध्ये अशी रचना किती आवश्यक असते याचेही महत्त्व या रचनेवरून कळते. हे किल्ले केवळ लढायांचे ठिकाण नव्हते, तर स्वराज्य संकल्पनेचा प्रचार करणारी केंद्रेही होती. युनेस्को अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषावर आधारित स्थळांची निवड करते. यामध्ये ऐतिहासिक महत्त्व आणि वैभवशाली परंपरा, स्थापत्यशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण रचना, जगात अन्यत्र न आढळणारा अद्वितीय स्वरूप, मानवतेच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाशी असलेली नाळ, संरक्षणाची अवस्था आणि व्यवस्थापन हे पाच गुणधर्म पाहिले जातात.या निकषांवर महाराष्ट्रातील किल्ले पूर्ण उतरतात, म्हणूनच यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे.

 शिवरायांचा प्रताप जगव्यापी : या मान्यतेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगासमोर अधिक प्रभावीपणे मांडता येईल. त्यांच्या युद्धनीतीचा जागतिक स्तरावरील युद्धांच्या युद्धनीती सोबत अभ्यास होईल. जगाच्या पटलावर एका महान योद्धाच्या पराक्रमाचे चिंतन, मंथन होईल. हे फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या सन्मानाचे लक्षण आहे. जागतिक पर्यटकदेखील या ठिकाणी आकर्षित होतील, ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही उभारी मिळेल. १२ पराक्रम स्थळांचे युनेस्कोच्या व्यासपीठावर आगमन होणे ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाची घटना आहे. हे फक्त वास्तुकलांचे प्रतिनिधी नसून स्वातंत्र्याची, धैर्याची आणि एकीची अमूल्य प्रतीके आहेत. यामुळे शिवरायांचे विचार, त्यांचे शौर्य आणि त्यांची दूरदृष्टी नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि जगातील इतिहासात भारताचे स्वाभिमानी पान अधिक उजळून निघेल. - प्रवीण टाके, उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 वऱ्ह्याची तऱ्हा