महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
सत्यसंकल्पाचा दातारु बापरखुमादेवीवरु
दहा पंधरा लाख माणसं एकाच दिवसासाठी एका छोट्या गावात मुक्कामी येतात, तर त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा पंचतारांकित पातळीवर देणं अशक्यच असतं आणि वर्षानुवर्षं वारी करणाऱ्यांची तशी अपेक्षाही नाही. दहा लाख लोकांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी आहे अन् एक हजार लोकांना ती गैरसोय वाटत असेल तर, शेवटी ते एक हजार लोकच वेगळे पडतात. वारी त्यांच्याशिवायसुद्धा सुरुच राहते. आपण कुणाकडं पाहून वारीविषयी मत व्यक्त करायचं ते आपण ठरवायचं. "माऊली कुणाला काहीही कमी पडू देत नाहीत” हा अनुभव लाखो लोक स्पष्ट सांगतात, तेव्हा ‘पाचामुखी परमेश्वर' हा न्याय त्याला निःसंशय लागू करावा.
वारीत माझी एका तरुणाशी भेट झाली. वारीच्या वाटेवर तो भाविकांना गंध बुक्का लावण्याची सेवा करतो. अगदी दरवर्षी नियमितपणे वारी करतो. जागा मिळेल तिथं पथारी पसरुन झोपतो, मिळेल तिथं आंघोळ करतो, जिथं मिळेल तिथं जेवतो. महिनाभर गंधसेवा करतो. पैसे ऐच्छिक असतात.
"माऊली, बाकी वर्षभर पोटापाण्यासाठी काय करता?” मी विचारलं.
"मी लाकडाच्या गोडाऊनमध्ये कामाला हाये. सात हजार पगारावर.” त्यानं ठसक्यात सांगितलं.
"सात हजारात महिना? माऊली, आता गॅस सिलेंडरच हजाराच्या घरात गेला की. एवढ्या महागाईत घर कसं चालायचं?”
"गॅस लागतच नई. लाकडाचं सरपण मिळतंय मला. कांडी कोळसा आणला की झालं.”
"पण बाकी खर्च असतोच ना.”
"बायको यार्डात धान्य निवडायला जाती. तिला अर्धी हजेरी २०० रुपये अन् पूर्ण हजेरी ३०० रुपये पडती. तिचे पैशे येतातच ना. तेवढ्यात भागतंय आपलं”. तो एकदम आनंदात सांगत होता.
"मग हे गंध बुक्क्याचं काम करुन किती पैसे मिळतात?” मी उत्सुकतेनं विचारलं.
"माऊली कधी कुणाला कमी पडू देत नाहीत. रोजचा तीनशेचा नेम आहे माझा.”
"तीनशेचा नेम म्हणजे?” माझ्यासाठी हा प्रकारच नवीन होता.
"वारीला प्रस्थानाच्या आधी माउलींना भेटतो, दर्शन घेतो आणि नेम धरतो. तीनशेचा नेम म्हणजे रोज तीनशे जणांना गंध लावायचं. त्याशिवाय दिवस पुरा करायचा नाही. पैशे किती मिळतात ते बघायचं नाही.”
"मग मिळतात का पैसे?”
"हो तर. निदान रुपया तरी देतातच लोकं. कुणी रुपया देतात, कुणी दोन रुपये, कुणी पाच रुपये, कुणी दहा रुपये पण देतात. माऊली तळावर समाज आरती असती. तिथं आरतीला उभा राहतो. नंतरच दिवस मोजतो. रात्री जिथं कुठं प्रसाद सुरु असेल तिथं घेतो. जागा मिळेल तिथं बसून दुसऱ्या दिवशी साठी गंध भिजवतो अन् मग झोपतो.”
"चांगलंय की मग तुमचं.” मी सहज बोलून गेलो.
"हो तर. पण कधी कधी परीक्षा बघतात देव. आज परीक्षाच होती. एक तास झाला, गंध लावून घ्यायला कुणी तयारच होईना. तीनशेला एकच कमी होता. पण इतकी लोकं असूनसुद्धा मला तासभर कुणी मिळालं नाही. शेवटी तुम्ही सापडलात. माझा नेम पुरा झाला.” त्याला आनंद झाला होता.
"पण एखाद्या दिवशी समजा नाहीच तीनशे पूर्ण झाले तर काय बिघडणार आहे? आता आज एकच राहिला होता ना? तो उद्या मिळाला असता. देव काय शिक्षा करणार आहे का?” मी म्हटलं.
‘अहंकाराचा वारा न लागो राजसा' असं संतवचन आहे ना, ते ‘उफराट्या नवमतवादाचा वारा न लागो राजसा' असं म्हणायला पाहिजे. ज्यातलं आपल्याला काही ढेकळं कळत नसतं, त्यातही स्वतःचं शहाणपण दाखवण्यासाठी ”ह्याला काय होतंय?, ”देव काय स्वतः असं सांगतो का?, ”हेच कर्मकांड आहे असला अर्धवटपणा अनेक लोक करत असतात. स्वतःला काही कळत नसतं, समजून घ्यायचं नसतं, करायचं तर त्याहून नसतं. पण करणाऱ्याच्या डोक्यात हळूच पिल्लू सोडण्यात मात्र ही माणसं तरबेज असतात. एखाद्याच्या श्रद्धेवर आपल्या मनोरंजनासाठी शंका घेणं हा एक मोठा अपराध. आपणही कधी कधी आपल्याही नकळत यांच्या पंगतीला जाऊन बसतो. मोठी चूक होते. मी म्हटलं खरं, पण आपण चुकीचं बोललो आहोत हे पुढच्याच क्षणी लक्षात आलं.
"एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, असंच असायला पाहिजे. तीनशे जणांना गंध लावायला देवानं मला सांगितलं होतं का? मीच देवांना तसं सांगितलं. आपला शब्द आपण पाळायला पाहिजे.” तो सहजपणे म्हणाला. दिलेल्या शब्दाची पूर्ण जबाबदारी घेण्याची आणि तो शब्द पाळण्यासाठी वाटेल तितके कष्ट करण्याची त्याची तयारी होती. केवळ पैसे कमावण्यापुरतीच बाब असती तर तो वारीत दुसरं काहीही विकू शकला असता. वारीत गंध-बुक्का लावणारे जसे असतात तसेच, चहा विकणारे असतात, ऊसाचा रस विकणारे असतात, चपला विकणारे असतात, कपडे विकणारे असतात आणि अगदी तंबाखू चुना विकणारेही असतात. पण यापेक्षा गंध बुक्का लावण्याचं काम करणं त्याला योग्य वाटलं.
"मी वारीत गंध बुक्का लावतो म्हणजे देवाचं काम करतो, धर्माचं काम करतो अशी त्याची श्रद्धा. स्वतःच्या कृतीमधून, कर्मामधून प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधणारा तो तरुण मला फार श्रेष्ठ वाटला. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही त्यानं माऊलींची वारी सोडली नाही अन् माऊलींनीही त्याला सोडलं नाही. त्याचा नेम रोज पूर्ण करुन घेतला!
प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्याचे प्रश्न वेगळे असतात. अडचणी असतात. विवंचना असतात. लाखो माणसं अशी आहेत, ज्यांच्या खिशात पैसे नाहीत. कित्येकजण रोजंदारीवर, मजुरीवर काम करतात. त्यांना रोज काम करुन घर चालवावं लागतं. पण तरीही तो वारीला पर्याय शोधत नाही. काहीही झालं तरी तो वारी करतोच. पंचवीस दिवस वारीत चालायचं अन् रोज नेमानं तीनशे जणांना गंध लावायचं. म्हणजे जवळपास साडे सात हजार लोकांना गंध लावायचं. सोपं नाहीय हे सगळं..!
अशी लोकं मला भेटवून ज्ञानोबाराय नेमकं काय सुचवत असतील? अर्धवट शाळा सोडून दिलेला आणि मजुरी करणारा एक साधा माणूससुद्धा किती निष्ठेनं नेम पाळतो, अन् आपण काय करतो? आपण चालढकल करतो आणि फक्त कारणं सांगत राहतो. मानवी मनाची ती व्यवहाराची पद्धतच आहे. आपल्यासाठीच गरजेच्या असलेल्या आणि आपण स्वतःच ठरवलेल्या कितीतरी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण पळवाटा शोधतो, कारणं शोधतो, टाळाटाळ करतो. काहीही कारण नसतानासुद्धा आपण वेळकाढूपणा करतो. सातत्य टिकवणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नव्हे. ”मीही केलं असतं, पण मला वेळच नसतो” हे वारंवार म्हणण्यातलं सातत्य मात्र बहुतांश माणसं टिकवतात. नकारघंटा वाजवतच राहतात. मग त्या नकारघंटेचा आकार देवघरातल्या छोट्याशा घंटीएवढा असो किंवा पार त्या नारो शंकराच्या घंटे एवढा..!
कुठल्याही साध्या वारकऱ्याचं निरीक्षण करा. काय वाटेल ते झालं तरी तो वारी चुकवत नाही. तो काहीही जुळवाजुळव करेल, पण वारी करेल. अनेक वर्षं नियमित वारी करणाऱ्या अनेक वारकऱ्यांना मी पाहतो. वास्तविक पाहता, तो वाहनाने पंढरपूरला येऊ शकतो, लॉजमध्ये राहू शकतो, ऑनलाईन दर्शन पास घेऊन भगवंताला भेटू शकतो. कुणीच कुणाला आडकाठी केलेली नाही. "
"वारी पायीच केली पाहिजे” असा आग्रह कुणी कुणाला केलेला नाही आणि "पायी वारी केलीच पाहिजे” असंही बंधन नाही. इतकंच नव्हे तर, "वारी केलीच पाहिजे” असंसुद्धा कुणी म्हटलं नाहीय. हा वैयक्तिक आस्थेचा, श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे आणि लोक तो आजही वैयक्तिकच मानतात.
मी अशी अनेक माणसं अगदी जवळून पाहिली आहेत, ज्यांनी पायी वारी व्रत म्हणून स्वीकारलेली आहे. वारीकडे पाहण्याची स्वतःची एक वेगळी दृष्टी त्यांनी स्वतंत्रपणे विकसित केली आहे आणि त्या अनुभवालाच ते अमृतानुभव मानतात. शिक्षण, विद्वत्ता, संपत्ती, सत्ता, सौंदर्य, आणि अपेक्षा यांचे पाश ज्यांना तोडता येतात, तेच पायी वारी करु शकतात. ज्यांचं मीपण सुटलेलं नाही, त्यांना पायी वारी शक्यतो जमतच नाही, असं माझं निरीक्षण आहे. वारकरी भौतिक सुविधा सहज सोडू शकतात आणि जे भौतिक सुविधा सहज सोडू शकतात तेच वारकरी होऊ शकतात. बाकीच्यांना त्यात गैरसोयी दिसू शकतात, अर्थात त्याचंही स्वातंत्र्य आहेच. दहा पंधरा लाख माणसं एकाच दिवसासाठी एका छोट्या गावात मुक्कामी येतात, तर त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा पंचतारांकित पातळीवर देणं अशक्यच असतं आणि वर्षानुवर्षं वारी करणाऱ्यांची तशी अपेक्षाही नाही. दहा लाख लोकांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी आहे अन् एक हजार लोकांना ती गैरसोय वाटत असेल तर, शेवटी ते एक हजार लोकच वेगळे पडतात. वारी त्यांच्याशिवायसुद्धा सुरुच राहते. आपण कुणाकडं पाहून वारीविषयी मत व्यक्त करायचं ते आपण ठरवायचं. "माऊली कुणाला काहीही कमी पडू देत नाहीत” हा अनुभव लाखो लोक स्पष्ट सांगतात, तेव्हा ‘पाचामुखी परमेश्वर' हा न्याय त्याला निःसंशय लागू करावा.
आम्ही एका ठिकाणी विसाव्याला थांबलो होतो. मोकळी जागा होती. भुईमुगाच्या शेंगा, फुटाणे, केळी असं खाणं सुरु होतं. जागेच्या मालकांनी चहा वाटपाचा मंडप उभारला होता. सगळं कुटुंब चहा वाटत होतं. आम्ही त्या मंडपापासून थोडे लांब बसलो होतो. त्या जागा मालकांचा मुलगा आमच्यासाठी चहा घेऊन आला. रस्त्याच्या लगतची मोठी मोकळी जागा. आमच्यातला एक जण म्हणाला, "माऊली, सोन्यासारखी जागा आहे, मोकळी कशाला ठेवलीय? हॉटेल बिटेल बांधा. भरपूर पैसा मिळेल.”
साधारण विशितला तो मुलगा म्हणाला, "इथं काही बांधकाम नाही करणार. ही जागा अडवली तर वारकरी कुठं थांबतील?”
त्याच्या उत्तरातला एक नैसर्गिक आपुलकीचा स्वर अजूनही माझ्या कानात आहे आणि तो मी आयुष्यभर विसरु शकणार नाही. वर्षातल्या एका दिवसासाठी आयुष्यभराच्या आर्थिक लाभावर पाणी सोडणारे असे अनेकजण आपल्याला भेटतील. पाच मिनिटं त्यांच्याशी गप्पा मारल्या की, त्यांच्या अंतःकरणाचा उलगडा होतो.
वारीच्या आडून काहीतरी निराळाच हेतू साध्य करु पाहणाऱ्यांची संख्या जरा वाढीस लागतेय. पण वारीत नव्यानं सहभागी होणाऱ्या तरुण पिढीची संख्या त्याहून कैक पटींनी जास्त आहे. तरुणांना, तरुणींना वारी करावीशी वाटते, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दरवर्षी टप्प्याची वारी करणारेही हजारो जण आहेत. कुटुंबात वारीची परंपरा नसूनही दरवर्षी वारी करणारे अनेकजण आहेत. अनेक कारणामुळं वारी करणं जमत नसलं तरीही आपापल्या गावी वारकऱ्यांची शक्य तितकी सेवा करणारे लोक आहेत. त्यात अनेक जण उच्चविद्याविभूषित आहेत, विद्यावाचस्पती आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, नोकरदार आहेत. शेतकरी तर बहुसंख्य आहेत.
अनुभवाशिवाय, प्रचितीशिवाय एवढा मोठा समुदाय कुठल्याही परंपरेला सुरु ठेवेल, असं वाटत नाही. दुसऱ्यानं स्वार्थापोटी उभ्या केलेल्या भ्रमाला आपण भुलू नये, एवढं शहाणपण त्यांच्यात निश्चित आहे. म्हणूनच, तर संप्रदायाची चौकट ते आनंदानं स्वीकारतात आणि आयुष्यभर पाळतात. स्वाभाविकच प्राणमय कोषापासून ते आनंदमय कोषापर्यंतचा त्यांचा प्रवास ते स्वतः अनुभवतात. आता कुणाची शब्दसंपदा कितीही संपन्न असली तरीही त्या आनंदाचं वर्णन शब्दांत करणं भल्याभल्यांना साधलेलं नाही.
"माऊली कधी कुणाला कमी पडू देत नाहीत” ही श्रद्धा भाबडी की रोकडी? असा शास्त्रार्थच करायचा झाला तर माऊलींची रोकडी प्रचिती असलेले ठायीठायी भेटतील. ज्याचा संकल्प सत्याचा आहे, त्याला माऊलींच्या अस्तित्वाचा, त्यांच्या सोबतीचा अनुभव येतोच. ‘जो जे वांछील तो ते लाहो' असं ते स्वतःच म्हणतात, तेव्हां ते आपल्यासारख्या सगळ्यांचाच कैवार घेत असतात. माऊलींनी आपलाच घेतलेला कैवार समजतो की नाही, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न..! -मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था कौन्सिलिंग सेंटर, पुणे