बांधावरच्या शेंगा

बऱ्याच वेळेस खाडीवरून परत येणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात एक हिरव्या रंगाचा वेणीदार गोफ दिसतो. बारकाईने पाहिल्यास या वेणीच्या एका टोकाला लहान लहान शेंगाही लगडलेल्या दिसतात. स्थानिक भाषेत  शेंगांचा उच्चार ‘शिंगा असा केला जातो. त्यामुळे या शेंगा ‘तेलशिंगा म्हणून ओळखल्या जातात. काही ठिकाणी त्यांना ‘कोल्हीत्र्याच्या शेंगा' असेही म्हटले जाते. विग्ना ल्युटेला या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आपल्या मुगाची चुलत बहिणच.

उत्तर कोकणातल्या शिल्लक खारजमिनींवर (अजून तरी!) भातशेती केली जाते. पावसाचा जोर मंदावल्याच्या काळात शेतीची किरकोळ कामे चालू असतात. या लहानसहान कामांसाठी गावापासून दूरवर असलेल्या खारपट्टयांतील शेतीकडे त्यांची ये-जा सुरू असते. या नेहमीच्या फेऱ्यांतून घरी परत येत असताना हा शेतकरी सहसा कधी रिकाम्या हाती परत येताना दिसत नाही. रस्त्यांच्या कडेला, शेतांच्या बांधांवर निसर्गतः मिळणारे फळे, फुले, कंद यांसारखे जिन्नस तो भरभरून घेत असतो. तिचे फुल, शेंग आणि बियांच्या बाबतीत मुगाशी असलेले साम्य विलक्षण आहे. परंतु सातत्याने मुग गिळायची सवय असल्याने तेलशेंगांसाठी कोणी आवाज काढताना दिसत नाही. चवळी वंशाशीसुद्धा तिचे दूरचे नाते आहे. इंग्रजीतील ‘हेअरी काऊपी'  या नामातूनही हे नाते अधोरेखीत होते.

आफ्रिकेचा किनारी भाग, मध्य व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियाई भागांत ही वनस्पती आढळते. दक्षिण अमेरिकेत तिची भाताच्या पिकांतील तण अशीच ओळख आहे, तर दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रीय तण प्रजांतींच्या यादीत या वनस्पतीचा समावेश आहे. विविध प्रकारच्या मातीमध्ये ती रूजू शकते, पण मातीचे ओलसर असणे ही प्रमुख अट आहे. खाडीकिनाऱ्यांवरील ओलसर बांध ही अट पूर्ण करतात. त्यामुळे या परिसरात ही वेलीसारखी वनस्पती उगवते. या वनस्पतीकडे सुरूवातीला कोणाचे फारसे लक्ष जात नाही. मात्र मूळ वनस्पतीतून निघालेल्या फुटभर लांबीच्या देठावर अगदी टोकाला लागलेली सुंदर, नाजूक पिवळ्या रंगाची फुले आपले लक्ष वेधतात. याच फुलांच्या गुच्छाचे रुपांतर हळूहळू शेंगांमध्ये होते. लांब सरळ देठ आणि त्यावरील शेंगांच गुच्छ ही रचना आपल्याला चौकात उभ्या असलेल्या हायमास्टच्या दिव्यांची आठवण करून देते. या देठांचा एक छानशी वेणी घालून गोफ तयार केला जातो. पाच-सहा सेमी लांबीच्या बारीक लव असणाऱ्या लहान शेंगांंमध्ये मुगासारखे दाणे तयार होतात. हे दाणे कच्च्या  स्वरूपात, शिजवून अथवा उकडून खाल्ले जातात. शेंग कोवळी असल्यास आवरणासह खाल्ली जाते. काही भागांत फुलांची देेखील भाजी केली जाते. तेलशेंगांची गोड मुळे सोलून खाल्ली जातात.

अन्नासह तिचे काही औषधी उपयोगही आहे. आफ्रिका, इथिओपिया येथील रेडवुड वनस्पतीच्या फुलांसह या वनस्पतीच्या पाने, फुलांचा वापर करून उपदंश व अल्सरसारख्या विकारांवर उपचार केले जातात. अर्जेंटीनामध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी तेलशेंगा वापरल्या जातात. तेलशेंगांची काही जंतुनाशक तत्वेही ज्ञात असून त्यावर अधिक संशोधन चालू आहे.
या मानवी उपचारांबरोबरच पॉलीनेशिया येथे ‘घोस्ट सिकनेस या अमानवी मानल्या जाणाऱ्या आजाराच्या उपचारांसाठी ही वनस्पती वापरतात. या वनस्पतीचे मृदेतील सूक्ष्मजीवांसोबत असलेल्या सहजीवी संबंधांमुळे वातावरणातील नायट्रोजन मातीत स्थिरावण्यास मदत होते. परिणामी परिसरातील इतर वनस्पतींना वाढीसाठी आवश्यक असणारा नायट्रोजन उपलब्ध होतो. जमिनीची धूप होऊ नये म्हणून वाढवल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्येदेखील तेलशेंगांचा समावेश होतो. या वनस्पतीची पाने सुरवंटांना आकर्षीत करतात. त्यामुळे अलिकडच्या काळात ‘बटरपलाय गार्डन या संकल्पनेचा होत असलेला प्रसार पाहता तेलशेंगा ही वनस्पती या उद्यानांसाठी एक परिपूर्ण वनस्पती ठरू शकेल.

तेलशेंगांचा प्रसार निसर्गतःच होत असतो, परंतु मोठ्या प्रमाणावर लागवड करायची असल्यास तिच्या बिया उकळत्या पाण्यातून अल्पकाळ काढून नंतर पुन्हा सुकवल्या जातात. अशा पद्धतीने बियांची रुजवण क्षमता वाढवता येते. कडधान्याला पर्याय आणि खाऱ्या जमिनीत उगवण्याची क्षमता या दोन वैशिष्ट्यांवर किनारी भागात तिचे महत्त्व वाढायला हरकत नाही. खार जमिनीतील भातशेतीबरोबरच तेलशेंगा दिसण्याचे प्रमाण अलिकडे कमी होत आहे. भातशेतीबरोबरच, तेलशेंगांच्या पूरक उत्पादनालाही चालना मिळावी ही अपेक्षा.
- तुषार म्हात्रे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्लास्टिक प्रदूषणामुळे जीवसृष्टी धोक्याच्या छायेत