महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
शंकू शिंपला
बॉलीवूडचा बादशाह मानल्या जाणाऱ्या शाहरूख खानचा एक सुंदर चित्रपट आहे. यात त्याने नासामध्ये काम करणारा एक शास्त्रज्ञ साकारला आहे. अमेरिकेसारख्या विकसित आणि सुखसोईयुक्त देशातून भारतात, म्हणजेच ‘स्वदेस मध्ये आल्यावर तो आपल्या गावी जातो. गावात त्याला सोयीचं आणि सवयीचं वातावरण मिळणे कठीण असल्याची पूर्वकल्पना असल्याने तो आपल्या सोबत एक कॅराव्हॅन घेऊन जातो. ही गाडी त्याला आवश्यक असणाऱ्या सुविधांनी भरलेली असते. ही गाडी म्हणजे त्याचे एक प्रकारचे फिरते घरच!
या ‘स्वदेस नावाच्या चित्रपटातील नायकाप्रमाणेच बाहेरील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत स्वतःसाठी स्वतःचेच एक सुरक्षित विश्व तयार करणाऱ्या कित्येक प्रजाती आपल्या सभोवताली आढळतात. बॉलीवूडच्या बादशहाप्रमाणेच स्वतःचे घर सोबत घेऊन चालणारा एक बादशहा आपल्या किनारी 'देस' मध्येही पहायला मिळतो. डोक्यावर शंकू आकाराचा मुकूट असणारा हा किनाऱ्यावरचा बादशहा म्हणजे ‘शंक्वाकार शिंपला'. मुंबई आणि रायगडच्या किनारी भागात आढळणाऱ्या जवळपास सर्वच शिंपल्यांना ‘खुबा म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे या शिंपल्याला ‘अकली खुबा' असे एक स्थानिक नाव आहे. दर मैलागणिक बदलत जाणाऱ्या भाषेनुसार अनेक चित्र-विचित्र स्थानिक नावांनी हा शिंपला ओळखला जातो. टोकदार शिंगासारख्या रचनेमुळे त्याला इंग्रजीमध्ये त्याला हॉर्न स्नेल म्हटले जाते. तर काही ठिकाणी त्याचा उल्लेख कोन शेल असाही होतो. मृदूकाय आणि कवचधारी वर्गातील हा प्राणी शास्त्रीयदृष्ट्या टेलीस्कोपियम टेलीस्कोपियम या नावाने ओळखला जातो.
एखाद्या सुंदर कळसाप्रमाणे रचना असलेला आणि लाल, काळ्या रंगांचे वेटोळे असलेल्या रेषांनी नटलेला हा प्राणी कायम किनाऱ्यावरील मातीतच राहील्याने त्याच्या सौंदर्याची शब्दशः माती होते. मखमली काळा आणि लालसर तपकिरी रंगाचा हा शिंपला दलदलीत राहील्याने नव्याने पाहणाऱ्याला त्याचे मूळ स्वरूप दिसत नाही. किनाऱ्यावर पडलेला एक सामान्य जीव इतपतच त्याची ओळख राहते. त्याच्या शरीररचनेमध्ये आणखी एक वैशिष्ट्य दडलेले आहे. या शिंपल्याच्या कवचावरील वेटोळ्यांची रचना फी या दैवी गुणोत्तर मानल्या जाणाऱ्या गणितातील संकल्पनेप्रमाणे आहे. शंकू शिंपल्यांमध्ये लागोपाठच्या वेटोळ्यांमध्ये हे गुणोत्तर दिसून येते.
भरती ओहोटीमुळे कायम दलदलयुक्त असणाऱ्या भागात या खुब्यांचे वास्तव्य असते. शंकू शिंपल्याचा आकार एखाद्या शंक्वाकृती मुकूटाप्रमाणे असला, तरी चालताना मात्र हा मुकूटरूपी कवच आडवं होतं. आपले घर अंगावर घ्ोतल्यासारखं हा जीव ओल्या चिखलातून सरपटत अतिशय संथपणे मार्गक्रमण करत राहतो. या वेळेस त्याच्या तोंडाकडील बाजूने गोगलगायीप्रमाणे असलेली शुंडके बाहेर येतात. या शुंडकांवरच डोळ्यांची रचना असल्याने एक नावापुरती ‘दूरदृष्टी' त्याला लाभते. दोन्ही शुंडकांची स्वतंत्रपणे हालचाल करता येत असल्याने एकाच वेळेस अधिक बाबी त्याला पाहता येतात. अंतराच्या बाबतीत लाभलेली ही दूरदृष्टी या प्राण्याच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची ठरते, कारण मूळात या खुब्याला खूपच अंधुक आणि कमी दिसते. पर्यायाने लांब शुंडकांवरील डोळ्यांनी थोडं दूरपर्यंतच पाहता येतं. अकली खुब्याच्या डोळ्यांमध्ये रंगपेशी नसल्याने त्याला रंग ओळखता येत नाहीत. (थोडक्यात जगातला कुठलाही पुरूष आणि हा जीव साड्यांच्या दुकानात फारसा उपयोगाचा नाहीच.) आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, या शिंपल्याच्या कवचाखालील जागेत ‘तिसरा डोळा' ही असतो. हा तिसरा डोळाही खुब्याच्या दैनंदिन हालचालींसाठी मदत करतो.
खारफुटीने वेढलेल्या चिखलात शैवाल आणि इतर सेंद्रीय पदार्थांवर ते आपली गुजराण करतात. समुद्राला भरती असताना या जीवांच्या अन्न मिळवण्याच्या प्रक्रीयेला मात्र ओहोटी लागते. कालांतराने पाण्याने व्यापलेली जागा रिकामी होताच, या बादशहाला भरपूर अन्न उपलब्ध होते. समुद्र किनाऱ्यावरील जीवनाला अनुकूल शरीररचना आणि जीवनशैली असल्याने प्रतिकूल परिस्थिततही हे खुबे तग धरतात. पाण्याबाहेर असतानाही कित्येक काळ ते जीवंत राहू शकतात. तर अन्नाची उपलब्धता कमी असताना संथपणे एका जागी पडून राहून ते उर्जेची बचत करतात. यावेळेस आपल्या शरीरात साठवलेल्या उर्जेचा वापर ते करू शकतात.
या खुब्यांप्रमाणेच अन्नाच्या शोधात कायम भटकणारा एक जीव या समुद्रकिनाऱ्यांच्या आसपास आढळतो. तो अन्न म्हणून या शिंपल्यांचा वापर करतो. प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत म्हणून त्यांचा अन्नात समावेशही करतो. मानव नावाच्या या जीवाला या ‘अकली खुब्यांसारख्या' सामान्य जीवांचा व्यावसायिकदृष्ट्या चांगलाच उपयोग होतो. अलिकडेच या सामान्य जीवाची एक ‘खुबी' समोर येत आहे. कर्करोग किंवा काही जनुकीय आजारांच्या उपचारांसाठी ‘जैविक दृष्ट्या क्रीयाशील' पदार्थांची आवश्यकता असते. अशा प्रकारचे जैवक्रीयाशील पदार्थ या खुब्याच्या शुक्राणू पिशवी पासून मिळवण्यावर संशोधन झाले असून वैद्यकीय क्षेत्रात त्याचा वापरही होत आहे. शंक्वाकृती शिंपल्याचे हे उपयोग पाहता किमान आपल्या आरोग्यासाठी, आयुष्यासाठी तरी या जीवांचा जीव वाचवायलाच हवा! - तुषार म्हात्रे