महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नुक्ता-ए-नजर
कृष्णमूर्ती स्वतः दाक्षिणात्य तरीही उर्दू, हिंदी भाषा बोलता येतात, ते मुंबईत नोकरी करत होते त्यामुळे चक्क मराठी पेपर वाचायचे! देशाला जोडणाऱ्या या सर्व भाषा खरंतर प्रत्येक भारतीयांची आई आहे असे मी मानतो. कृष्णमूर्ती हिंदी-उर्दू-मराठी सिनेमातील कलाकारांस थेट घरी किंवा स्टुडिओत जाऊन ते भेट घ्यायचे. गाणी, संगीत, नृत्य, अदाकारी, कथाकार, संगीत अशा क्षेत्रातील कलाकारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देणे त्यांना आवडे. संगीत, गायन यात त्यांना खूप रुची; आजही आहे. त्यांचा हा जगण्याचा एकूण दृष्टिकोन (नुक्ता-ए-नजर) पुनश्च त्यांना लाभो. शारीरिक अस्वास्थ्यामुळे कठीण अवस्थेतून ते जात आहेत. देव-अल्लाह-गॉड त्यांना उत्तम आरोग्य देवो आणि सीबीडी बेलापूर येथील त्यांच्या नेहमीच्या नुक्कडवर पुन्हा सामील होऊन गायन, शेर-शायरी, गप्पा होवोत याच शुभेच्छा.
ऑफिसलगत कँटीनमध्ये ब्रेकफास्ट घेत असताना नव्याने रुजू झालेले एक सिनियर ऑफीसर माझ्यासमोर येऊन बसले. तशी ओरिएंटेशनमध्ये तोंड ओळख झाल्याचे आठवले. पण दाक्षिणात्य व्यक्तीला येथे कोकणात कोण ओळखत असणार? म्हणून मी फवत गुड मॉर्निंग बोलून चहा घेत राहिलो. ही आमची समोरासमोर झालेली पहिली भेट!
सोशल मीडियावर तेव्हां मी विशेष कार्यरत नव्हतो. सॉपटवेअरचे ज्ञान नसल्याने फक्त कॉम्प्युटर ऑपरेट करणे एवढेच कळत होते. समोर बसलेली भारदस्त व्यक्ती आपल्या हातात छोटया मोबाईलवर गाणी ऐकत होती. हुद्दा अन अनुभवाने सीनियर असल्याने त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा होणे तसे सहज शक्य नव्हते. त्यांनीच विचारलं नांव, गाव, हुद्दा इत्यादि आणि मी चकित झालो! साहेब जरी तमीळ ब्राम्हीण असले तरीही ते हिंदी-उर्दू मिश्रित भाषा स्वच्छ बोलत होते! तेव्हां मला कळले गतकाळातील मखमली स्वर लाभलेले गायक तलत मेहमूद यांनी मराठी सिनेमात चार गाणी चक्क मराठीत गायली होती! तीच गाणी साहेब मोबाईलवर ऐकत होते. समोर बसलेल्या त्या व्यक्तीचे नाव श्री. कृष्णमूर्ती असे होते.
पुढे ग्राऊंड स्टाफ हा आपल्या टेक्निकल, इंजिनिअरिंग कामात व्यस्त राहिल्याने कृष्णमूर्ती साहेब यांच्याशी मला विशेष गप्पा मारणे शक्य नव्हते. एके रविवारी मी घरामगील खळ्यात जामाखाली बसून सुपारी सोलत होतो. सोबत फातीमाने अद्रकवाली चाय दिली होती त्याचा आस्वाद घेत होतो. नव वर्षाचा पहिलाच सप्ताह असेल, हवेतील गारवा बऱ्यापैकी जाणवत होता. इतक्यांत कंपनीचा एक कार चालक घरी येतांना दिसला. कंपनीतून आज का बरे बोलावणे झाले असावे? काहिसा साशंक झालो. इतक्यांत त्याच्या पाठोपाठ श्री. कृष्णमूर्ती साहेब सिव्हिल ड्रेसमध्ये आमच्या घरी येतांना दिसले. ते देवदर्शनास गेले असावेत, हे त्यांच्या कपाळी असलेल्या केशरी टिळ्यावरून ध्यानी आले. स्मित हास्य चेहऱ्यावर होते. साहेब जामाखाली सिमेंट बाकड्यावर बसले. बिस्लेरी त्यांच्या हातात होतीच. फातिमाने दोन कप अद्रकवाली चाय आणून दिली. ज्यामध्ये कृष्णमूर्ती साहेबांनी बिनसाखरेचा चहा घेतला. आणि बसलो त्याच ठिकाणी आमच्यात नकळत गप्पा रंगल्या. ब्लूटूथवरुन त्यांनी माझ्या मोबाईलवर ती चार मराठी गाणी सेंड केली जी तलत मेहमूद या महान गजल गायकाने मराठीत गायली होती.
बेचैन नजर, बेताब जिगर
ये दिल है किसीका दिवाना
कब शाम हो और ये दीप जले
कब उडकर पहुंचे परवाना
यास्मींन नामक हिंदी सिनेमात गायलेली गीते तलत मेहमूद यांच्या मखमली गायकीला अमर करून गेली. संगीत सी. रामचंद्र यांचे होते. कृष्णमूर्ती साहेब त्यांच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात दाभोळ येथे आले अन योगायोगाने मला भेटले. माध्यम अर्थातच सिने संगीत होते. त्यांचे एकूणच सिनेसंगीत आणि हिंदी सिनेमा विषयींचे ज्ञान अफाट होते. हा जगण्याचा त्यांचा छंद असावा असे मला वाटले! ते रफीचे फक्त चाहते होते असे नव्हे, तर रफी साहेबांनी गायलेली बहुतांश गाणी त्यांना तोंडपाठ होती. रफी साहेबांच्या घरी जाऊन भेट घेणे व त्यांच्या म्युझिकल लॉबीमध्ये जाऊन रफीना मिळालेले पुरस्कार ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत तेथे जाऊन संपूर्ण माहिती मिळवायचे. ऑर्केस्ट्रामध्ये जाऊन रफी साहेबानी गायलेल्या गाण्याचे अनुकरण जे कोणी कलाकार करत असतील त्यांना बॅकस्टेजवर जाऊन त्यांचे अभिनंदन करायचे. रेडिओ, रेकॉर्ड, कॅसेट, सिडिज आणि आता युट्यूब या संपूर्ण सांगीतिक प्रवासात कृष्णमूर्ती साहेब मोहमद रफी यांचे आजही चाहते म्हणून ओळखले जातात. ‘आदाब से रफी साहब' हे त्यांचे घोष वाक्य होय! आज ते वयोवृध्द झाले आहेत. आता त्यांनी साबीडीी - बेलापूर सोडले असून ते आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसमवेत कर्नाटकातील बेंगळुरू येथे वास्तव्यास आहेत.
त्यावेळी आपल्या ड्युटीमध्ये कुठेही कमी न पडता आपला छंद जोपासणारे कृष्णमूर्ती साहेब याही पुढे जाऊन हिंदी फ़िल्म मुगलए-आझम विषयी अनेक किस्से सांगत असत. सिनेमातील सलीम हे किरदार निभावणारे दिलीप कुमार म्हणजेच युसुफ खान यांचेही ते शेदाई होते आजही आहेत. दिलीप कुमार हयात असतांना कृष्णमूर्ती साहेब आपल्या ॲक्टिव्ह लाईफ मध्ये असताना थेट त्यांच्या बंगल्यावर जाऊन पोहोचले व सायराबानू यांच्या परवानगीने दिलीपकुमार यांना भेटले. सलीम या किरदारचे मुगल-ए-आझम मधील काही निवडक संवाद आवडीने सहज बोलायचे! गाणी, फिल्म्स, नाटक अशा विविध क्षेत्रातल्या गतकाळातील मान्यवरांना जाऊन भेटायचे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांना भेटण्यासाठी म्हणून सिने क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार नकार देत नसत! ‘रफी ग्रुप' हा त्यांनीच निर्माण केलेला सोशल मीडियावर संगीतमय प्रवास खुप लोकप्रिय ठरला.
स्वतः तमिळीयन ब्राम्हण, फक्त शाकाहार करणारे कृष्णमूर्तीसाहेब आज अंथरुणाला खिळून आहेत. शुगरचा त्रास होता तो आज खुपच वाढला आहे. सध्या बेंगळुरू मध्ये वास्तव्यास असून सोबत नातवंडांच्या समवेत जगत आहेत. तसे पाहता कॉलेजात असतांना मला अनेक दाक्षिणात्य मित्र लाभले खरे; पण कृष्णमूर्ती सारखा असा मनसोक्त छंद जोपासणारा एकमेव अप्रतीम मित्र लाभणे कठीण आहे.
इतरांच्यात उणिवा शोधत राहण्यापेक्षा स्वतःमध्ये दडलेले छंद जोपासणे कधीही योग्य वाटते. आपण नोकरीत किंवा व्यवसायात निपुण आहोत इथवर ठीक आहे, तो पोटापाण्याचा विषय झाला. मात्र आपण स्वतःमधली आंतरिक क्षमता जाणून घेतली का? स्वतः इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करुन फावल्या वेळात आपले छंद जोपासले तर स्वतःला जाणून घेण्याची, जगण्याची दिशा कळते. स्वतः दाक्षिणात्य तरीही उर्दू, हिंदी भाषा बोलता येतात, त्याहीपेक्षा चकित करणारे म्हणजे कृष्णमूर्ती साहेब मुंबईत नोकरी करत होते त्यामुळे चक्क मराठी पेपर वाचायचे! देशाला एकत्र करणाऱ्या या सर्व भाषा खरंतर प्रत्येक भारतीयांची आई आहे असे मी मानतो. कृष्णमूर्ती यांना बऱ्याच भाषा ज्ञात होत्या, आजही आहेत. हिंदी-उर्दू-मराठी सिनेमातील कलाकारांस थेट घरी किंवा स्टुडिओत जाऊन ते भेट घ्यायचे, या अधिक त्यांची कसलीच अपेक्षा नसायची. गाणी, संगीत, नृत्य, अदाकारी, कथाकार, संगीत दिग्दर्शक अशा सर्व क्षेत्रातील कलाकारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देणे, एवढेच साहेबांना अपेक्षित होते. आज आजारपणामुळे मूर्तीसाहेब प्रवास करत नाही. आवाजही तसा काहिसा कमी होत आहे. पण त्यांचे आवडते क्षेत्र म्हणजेच संगीत, गायन यात त्यांना खूप रुची होती, आजही आहे. त्यांचा हा जगण्याचा एकूण दृष्टिकोन (नुक्ता-ए-नजर) पुनश्च त्यांना लाभो. शारीरिक स्वास्थ्य ठीक नसल्याने खूप कठीण अवस्थेतून ते सध्या जगत आहेत. देव-अल्लाह-गॉड त्यांना उत्तम आरोग्य देवो आणि सीबीडी बेलापूर येथील त्यांच्या नेहमीच्या नुक्कडवर पुन्हा सामील होऊन आम्ही गायन, शेर - शायरी, गप्पा सुरू करू, हिच सदिच्छा.
-इक्बाल शर्फ मुकादम