महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पाकिस्तानातील भारतीय राजदूत योध्दा!
सैनिक सीमेवर लढत असतात. तसेच राजनैतिक अधिकारी, मुत्त्सद्दी जीवाचा धोका पत्करून अहोरात्र कार्यरत असतात. यासाठी प्रचंड अभ्यास, अनुभव आवश्यक असतो...जेपी सिंग साहेब हे गणवेश नसलेले सैनिकच आहेत! त्यांना प्रणाम. जेपी सिंग साहेब हल्ली इस्रायलमध्ये विशेष कामगिरीवर नियुक्त आहेत. उझ्माच्या कथेवर आधारीत Diplomat नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात कलात्मक स्वातंत्र्य घेण्यात आलेले आहेच.
ती कशीबशी दोनच आणि ती सुद्धा अर्धवट वाक्ये उच्चारू शकली...मी भारतीय आहे आणि प्रचंड संकटात आहे...मदत करा!
पाकिस्तानात असलेल्या भारतीय दुतावासातल्या नुकत्याच उघडलेल्या खिडकीसमोर ती उभी होती. अंगावर स्थानिक महिलांचा परंपरागत पेहराव, चेहरा झाकलेला...पण केवळ ही दोन वाक्ये बोलण्यासाठी चेह-यावरील बुरखा बाजूला केलेला. डोळ्यांमध्ये भय आणि चेह-यावर एखाद्या हरिणीचे भय दाटून आलेले. कोणत्याही सहृदय, संवेदनशील व्यक्तीला शब्दांपेक्षा चेह-यावरील भाव अधिक लवकर उमजतात. संकटात असलेली समोर उभी असणारी व्यक्ती भारतीय आहे इतकं त्याला पुरेसे होते. मूळात दूतावासाचे कामच असते आपल्या देशाच्या नागरीकांना साहाय्य करण्याचे त्यामुळे परिस्थिती लक्षात येताच त्या अधिका-याने तिला त्याच्या कार्यालयाच्या विशिष्ट दरवाजातून आत बोलावले..तिच्यासोबत असलेल्या दोन पुरुषांना ती त्या दरवाज्याच्या दिशेला का पळत निघाली असावी, याचा बहुदा अंदाज आला असावा...ते दोघेही मोठ्या त्वेषाने त्या दिशेला धावले.
पूर्वीच्या काळी एका देशाचा राजदूत दुस-या देशात जायचा तो प्रसंगोत्पात्त. पण बदलत्या जागतिक राजकीय परिस्थितीत, एका देशाला दुस-या देशांत आपापले दूतावास आणि राजदूत ठेवावे लागतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १४७ प्रमुख देशांमध्ये भारताचे राजदूत सदैव कार्यरत असतात...पाकिस्तानातही! दूतावास जरी परकीय भूमीवर असला तरी प्रत्यक्ष दूतावासाच्या आत संबंधित पाहुण्या देशाचा कायदा लागू असतो. अतिशय विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तरच यजमान देशाचे सैनिक, अधिकारी आत प्रवेश करू शकतात. अन्यथा यजमान देशाने नेमलेले सुरक्षा रक्षकही आत परवानगीविना प्रवेश करू शकत नाहीत.
इंडीयन फॉरेन सर्विस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवेमधील अधिकारी एका अर्थाने जागतिक पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करीत तर असताच तसेच एका अर्थाने देशासाठी, त्या देशातील आपल्या नागरीकांसाठी लढतही असतात. मदतीची याचना करीत आलेल्या महिलेसोबत आलेल्या दोघा पुरुषांनी आत शिरण्याचा प्रयत्न करताच त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखून धरले. आत शिरलेल्या या महिलेची अवस्था अत्यंत कठीण होती. तिची संरक्षणदृष्ट्या पूर्ण तपासणी करण्यात आली...कारण अफगाणिस्तानमध्ये सुसाईड बॉम्बर्सचा आपल्याला अनुभव आहेच...पाकिस्तानातसुद्धा असे शक्य होतेच. परंतु दुतावासात प्रवेशाच्या वेळी तिची व्यवस्थित तपासणी झाली होतीच. मात्र दुस-या तपासणीतही या महिलेकडे कोणतीही शस्त्रे किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाहीत. मात्र तिच्या शरीरावर प्रचंड छळ केला गेल्याच्या अनेक खुणा महिला अधिका-यांना आढळून आल्या...लैंगिक अत्याचार झाल्याचेही स्पष्ट दिसत होते..एकंदर स्थिती बिकट आणि त्वरीत निर्णय घ्यावा लागेल, अशी होती.
यावेळी या पाकिस्तानातील भारतीय दूतावासात डेप्युटी हाय कमिशनर या पदावर एक अत्यंत अनुभवी, कर्तबगार आणि निर्णयक्षम व्यक्ती नियुक्त होती....जितेंदर पाल सिंग अर्थात जेपी सिंग यांची. सामाजिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या आणि २००२ मध्ये परराष्ट्र सेवेत पदार्पण केलेल्या जेपी साहेबांनी आरंभी मॉस्को (रशिया) आणि नंतर काबुल (अफगाणिस्तान) मध्ये सुरु असलेल्या भारतीय मोहिमांमध्ये सेवा बजावली होती. त्यावेळी सुद्धा अफगाणिस्तानात प्रचंड संघर्ष सुरूच होता. राजकीय धामधुमीत भारताचे हितसंबंध जपत काम करण्याचे कौशल्य जेपी साहेबांनी दाखवले. त्यामुळेच त्यांच्यासारख्या कुशल राजनैतिक अधिका-याला पाकिस्तानी दुतावासात नेमले जाणे साहजिकच होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण विभागाचे संयुक्त सचिव म्हणून त्यांचा अनुभव दांडगा होताच. अगदी कालपरवापर्यंत त्यांचे नाव सर्वसामान्य भारतीय नागरीकांच्या समोर प्रकर्षाने आलेले नसले तरी अनेक अतिरेकी कारवाया, भारत-पाक सीमेवरील चकमकी, दोन्ही देशांदरम्यान उद्भवलेले राजनैतिक पेचप्रसंग यांत जेपी यांनी अत्यंत प्रभावी काम केले होते. त्यांच्या कामाचे स्वरूप भारतीय चित्रपट, कादंब-या यांतून नीटसे लक्षात येईल, असेही नाही. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि भारताने तक्रार केली आणि पाकिस्तानी राजदूताला बोलावून घेतले की कांगावेखोर पाकिस्तान अशीच कृती पाकिस्तानमध्येही करीत असे. जेपी यांनी अशी अनेक बोलावणी येत. त्या प्रत्येक वेळी त्यांनी भारताची बाजू कुशलतेने मांडली. भारताचे माजी नौसेना अधिकारी श्री.कुलभूषण जाधव साहेब यांना पाकिस्तानने अवैधरीत्या ताब्यात ठेवले आहे. या प्रकरणातही जेपी यांनी कणखरपणे अनेक बाबींचा पाठपुरावा केला आहे.
दुतावासात आश्रय मागणा-या या महिलेला जेपी साहेबांच्या समोर आणण्यात आले. अत्यंत अनुभवी नजर असलेल्या साहेबांनी काही वेळातच या महिलेचा खरेपणा तपासून पाहिला आणि तिला भारतीय दुतावासात आश्रय देण्याचा मोठा निर्णय घेतला. वरवर ही बाब अतिशय सोपी वाटेल कदाचित. परंतु भारत पाकीस्तान मधील ताणले गेलेले संबंध, त्यात कुलभूषण जाधव साहेबांची अटक, सरबजीत सिंग या भारतीयाची पाकिस्तानातील तुरुंगात झालेली हत्या आणि अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन पावले उचलावी लागली.
एक तर संबंधित महिला उझ्मा अहमद ही एका पाकिस्तानी नागरिकाची तेथील कायद्यानुसार निकाह झालेली पत्नी. पतीच्या परवानगीशिवाय उझ्मा पाकिस्तान सोडून जाऊ शकणार नव्हती आणि तो तर तिला तेथून घेऊन जायला बेचैन होता.
संबंधित महिलेची जीवनकथाही अत्यंत वेगळी आहे. एका मुलाखतीत तिनेच सांगितल्यानुसार ती अनाथ आहे. एका कुटुंबाने तिला दत्तक घेतले होते. तिचे दत्तक वडील अनिवासी भारतीय असल्याचे समजते. उझ्माचे पहिले लग्न अयशस्वी ठरले होते. पण त्या संबंधातून तिला एक मुलगी झाली होती आणि दुर्दैवाने या मुलीला थाल्सेमिया नामक खर्चिक व्याधी होती. या मुलीला भारतात आजीकडे ठेवून उझ्मा मलेशियात एम.बी.ए. किंवा तत्सम काही शिकायला गेली होती. तिथून भारतात परतल्यानंतर ती पुन्हा पर्यटनासाठी म्हणून मलेशियात गेली. मलेशियात तिची एक परिचित महिला पतीसह नोकरी करीत असे. या पर्यटन-भेटीदरम्यान त्यांनी ठरवलेला वाहन चालक आलाच नाही. त्याऐवजी ताहीर नावाचा एक बदली चालक आला. या पर्यटन प्रवासात उझ्मा आणि ताहीरचे वैय्यक्तिक बोलणे झाले असावे. ताहीरने पाकिस्तानातही स्वित्झर्लंड सारखी पर्यटनस्थळे असल्याचे सांगितले होते. तसेच पाकिस्तानमध्ये उझ्माच्या मुलीवर उत्तम आणि स्वस्त उपचार होऊ शकतात, असेही नमूद केले होते. उझ्मा भारतात परतल्यावर ताहीरने तिला वारंवार फोन केले आणि तिने पाकिस्तानात तिच्या घरी एकदा भेटीस यावे असे सुचवले...आणि खूप प्रयत्नांती ताहीर यशस्वी झाला. ताहीर अविवाहित होता अशी उझ्माची कल्पना होती. तो वागायला शालीन, शिवाय मुलीची काळजी घेणारा आहे असे वाटले असावे तिला. पहिला संसार मोडलेला, मुलीची जबाबदारी या सर्व बाबी उझ्माला ताहीरकडे आकर्षित करण्यास कारणीभूत झाल्या असाव्यात. अर्थात उझ्मा याबाबत संदिग्ध बोलते. पण ती स्वतः पाकिस्तानात गेली, हेही खरेच. मात्र तिच्या पाकिस्तान प्रवेशाच्या कागदपत्रात सर्वच बाबी कायदेशीर नव्हत्या. ताहीरने विशेष व्यवस्था करून प्रवासी परवान्यावर उझ्माला पाकिस्तानात दाखल करून घेतले. तिची पाकिस्तानातील एक मावशी आजारी असल्याचे कारण त्याने दाखवले होते आणि उझ्माने याकडे डोळेझाक केली होती!
ताहीर आणि त्याचा एक कथित भाऊ उझ्माला न्यायला अटारी सीमेवर आले. त्यांच्या मोटारीतून प्रवास करताना तिला खराब रस्त्याचा त्रास होऊ नये या सबबीखाली ताहीरने तिला काही औषध खायला दिले...आणि ती बेशुद्ध झाली. तिला जाग आली तेंव्हा ती पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील, तालिबानी नियंत्रण असलेल्या एका खेड्यात, एका विचित्र घराच्या दारात होती. ताहीर बहुदा विवाहित होता आणि त्याला एकापेक्षा जास्त पत्नी होत्या. घरात चार लहान मुलेही होती..पण ती ताहीरच्या मयत भावाची आहेत, असे ताहीरने तिला सांगितले. त्या घरात उझ्माला जणू नजरबंदीमध्ये ठेवण्यात आले...विरोध करताच मारहाण झाली...लैंगिक अत्याचार झाले. तिला विकण्याचाही अयशस्वी प्रयत्न झाला. भारतात असलेल्या तिच्या लेकीचे अपहरण करून तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली...आणि बंदुकीच्या धाकात तिचा ताहीरशी निकाह लावण्यात आला. तशी कागदपत्रे तयार करण्यात आली. उर्दू लेखी भाषा अवगत नसलेल्या उझ्माची स्वाक्षरी घेण्यात आली. आणि उझ्माचा ताहीरशी संसार सुरु झाला...चार पाच दिवसांसाठी. तिथून सुटका होण्याचा एक मार्ग तिथे तिच्यासारख्याच फसवून आणलेल्या एका मुलीने मोबाईल उपलब्ध करून दिल्याने तिला सापडला..तिच्या मलेशियातील मैत्रीणीच्या नव-याने तिला एक युक्ती सांगितली. भारतीय लोक जावयांना महिलांना लग्नात हुंडा म्हणून मोठी रक्कम देतात...माझा भाऊ पाकिस्तानी दुतावासात कामाला आहे...त्याच्या माध्यमातून ही रक्कम भारतातून मागवून घेता येईल...त्यासाठी इस्लामाबाद येथे असलेल्या भारतीय दुतावासात जाणे गरजेचे आहे...असे ताहीरला पटवण्यात ती यशस्वी झाली...आणि आता ती जेपी साहेबांच्या समोर उभी होती...मला भारतात पाठवा! अशी विनंती करीत होती. अन्यथा मला विष द्या..मी आत्महत्या करते असेही तिने सांगितले.
जेपी सिंग साहेबांनी भारतात संबंधित मंत्री, अधिकारी यांच्या कानावर ही गोष्ट घातली. भारतीय मंत्री, अधिकारी यांनी साहेबांना हिरवा कंदील दाखवला...पण जपून पावले उचलायला सांगितली. ताहीर न्यायालयात गेला. भारतीय दुतावासाने माझ्या बायकोचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचे त्याने नमूद केले. तोवर इकडे जेपी सिंग साहेबांनी उझ्माचा जबाब नोंदवून तो प्रसिद्धी माध्यमांत पोहोचेल अशी व्यवस्था केली होती. ही वेगळी घटना पाकिस्तानी आणि भारतीय माध्यमांनी लगेच उचलून धरली. दरम्यान उझ्माला फसवून, धाकदपटशा दाखवून लग्नाच्या बंधनात टाकण्यात आले आहे, असे सिद्ध करणे गरजेचे होते. जेपी सिंग साहेबांनी या कामी पाकिस्तानातील मानवतावादी वकील मलिक शहनवाज नून यांची मदत घेतली. नून यांनी पाकिस्तानी लोकांचा रोष पत्करून उझ्माची बाजू मांडली. उझ्माला जबरदस्ती करून निकाह करायला लावला हे न्यायाधीशांनी लक्षात घेतले. जेपी सिंग साहेबांनी या खटल्याचा रीतसर आणि अचूक अभ्यास केला. उझ्माला पाकिस्तानात आणले गेल्याची कोणतीही अधिकृत नोंद ताहीरने केलेली नव्हती. हाही मुद्दा महत्वाचा मानला गेला. पाकिस्तानी जनमत ताहीरच्या बाजूने होते. परंतू जेपी साहेबांचे पाकिस्तानी दूतावासातील अधिका-यांशी असलेले व्यावसायिक.. पण तसे सौहार्दाचे संबंध, नून साहेबांनी हिरीरीने मांडलेले मुद्दे, पाकिस्तानातील न्याययंत्रणा आणि परराष्ट्र खात्यातील लोकांनी केलेले सहकार्य आणि न्यायाधीश महोदयांनी घेतलेला योग्य निर्णय यामुळे उझ्मा सुटली! २५ मे, २०१७ रोजी ती भारतात आली! तिला वाघा सीमा मार्गे भारतात नेले जात असताना तिच्या संरक्षणाची व्यवस्थाही पाकिस्तानी सरकारने पुरवली. विविध कायदेशीर अडथळे पार करीत उझ्मा भारतीय सीमेत दाखल झाली. जेपी सिंग साहेब आणि त्यांचे सहकारी तिला सुरक्षित पोहोचवायला अगदी सीमेपर्यंत आले होते. भारताच्या सीमेवर तत्कालीन परराष्ट्र मंत्री महोदया श्रीमती सुषमा स्वराज उपस्थित होत्या. त्यांनी उझ्मा ही भारताची कन्या असल्याची भूमिका अगदी आरंभापासून घेतली, तिची सुटका करण्याच्या कामी रात्रंदिवस परिश्रम घेतले...सुषमाजी यांच्या योगदानाविषयी स्वतंत्र लेख यानंतर लगेचच लिहिणार आहेच.
उझ्माने भारतीय मातीत पहिले पाऊल ठेवण्याआधी ती माती आपल्या कपाळाला लावली..आणि तिची भयकथा समाप्त झाली! उझ्मा प्रकरणाला अनेक पैलू आहेत आणि ते त्यावेळी प्रचंड गाजले होते. पण इथे आपण जेपी सिंग यांच्या अफाट कर्तृत्वाविषयी विचार करतो आहोत. सैनिक सीमेवर लढत असतात. तसेच राजनैतिक अधिकारी, मुत्त्सद्दी जीवाचा धोका पत्करून अहोरात्र कार्यरत असतात. यासाठी प्रचंड अभ्यास, अनुभव आवश्यक असतो...जेपी सिंग साहेब हे गणवेश नसलेले सैनिकच आहेत! त्यांना प्रणाम. जेपी सिंग साहेब हल्ली इस्रायलमध्ये विशेष कामगिरीवर नियुक्त आहेत.
उझ्माच्या कथेवर आधारीत Diplomat नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात कलात्मक स्वातंत्र्य घेण्यात आलेले आहेच. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे संपूर्ण घटना आहे, असे नसावे. भारतात सुखरूप परतल्यावर उझ्माने केलेल्या वक्तव्याबाबतही इथे चर्चा करणे गरजेचे नाही. हा लेख म्हणजे संबंधित चित्रपटाची भलावण,जाहिरात नाही. मात्र जे.पी.सिंग साहेब आणि दिवंगत श्रीमती सुषमाजी स्वराज यांचे कर्तृत्व पडद्यावर समजून घेणे या निमिताने शक्य आहे! जय हिंद!
(माहिती अर्थातच विविध ठिकाणी वाचून, पाहून जमा केलेली आहे. तपशील, संख्या, नावे, घटनाक्रम यांमध्ये नेहमीप्रमाणे माझ्या मर्यादा आहेतच. पण विषय पोहोचावा म्हणून लिहिले आहे. आपणही शोध घ्यावा. छायाचित्र साभार.) - संभाजी बबन गायके