असामान्य ‘रानमाणूस'

कायम मुंबईत राहिलेला तसेच मुंबईत उच्च शिक्षण घेऊन, इंजिनियर झालेला प्रसाद गावडे अर्थात ‘कोकणी रानमाणूस' या तरुण मुलाने गावाची वाट धरली. त्याने कोकणातील ग्रामीण भागात राहून ‘इको टुरिझम पर्यटन' क्षेत्राच्या व्यवसायात पदार्पण केले आणि तो यशस्वी  झाला. त्याबद्द्‌ल या निसर्गप्रेमी युवकाला  मुंबईतील उदयदादा लाड यांच्या नामांकित ‘यूआरएल फाऊंडेशन संस्थे'कडून २९ मे २०२५ रोजी एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असा ‘सामाजिक गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्या ‘रानमाणूस' प्रसाद गावडे यांची ही ओळख.

प्रसाद गावडे याची ही उपलब्धी हे कोकणवासीयांसाठी खूप अभिमानास्पद आहे. तसेच गाव सोडून चाकरी करणाऱ्या मुंबईत राहणाऱ्या तरुणांना मार्गदर्शकही आहे. सावंतवाडी तालुक्यातील, सांगेली गावातील जायपेवाडीत राहणाऱ्या प्रसाद गावडे याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोकणी रानमाणूस' म्हणून ओळखले जाते, तो इंजिनियर असूनही त्याने चांगली नोकरी सोडून कोकणातील निसर्गाचे संरक्षण आणि पर्यटन या क्षेत्रात भरघोस काम केले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून तळ कोकणचे निसर्ग सौंदर्य आणि ग्रामीण जीवनशैलीची अनुभुती देत प्रसादने आजवर जे काही कार्य केलं आहे त्याचीच ही पावती होय. स्थानिकांसोबत खाद्य संस्कृतीचा आस्वाद पर्यटकांना करून देण्याचे आणि अद्‌भुत ग्रामीण जीवन शैलीचे शिक्षण देण्याचे वेगळे कार्य हा रानमाणूस करत आहे. कोकणाचे सौंदर्य आणि संस्कृती जगासमोर आणण्यासाठी या माणसाने ‘कोकणी रानमाणूस' नावाचे भ्दल्ऊल्ंा चॅनल सुरू केले आहे.

 प्रसाद गावडे कोकणातील पारंपरिक जीवनशैली, खाद्यसंस्कृती, आणि निसर्गावर आधारित पर्यटन याबद्दलची माहिती तरुण आणि मुलांना देतो. त्याने कोकणातील इको-टूरिझमच्या माध्यमातून स्वंयरोजगाराचा मार्ग निवडला आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांना मदत मिळत आहे. तसेच त्याने कोकणातील निसर्गावर आधारित अनेक व्हिडिओ बनवले आहेत, ज्यात तो विविध स्थळांची माहिती, पक्षी आणि प्राणी आणि पारंपरिक जीवनशैली दाखवतो. किंबहुना पर्यटन, कोकणातील  खाद्यसंस्कृती, जीवनशैली, शेती याबद्दलची माहितीही सर्वांना देतो.

 प्रसाद गावडे हा कोकणाच्या शाश्वत विकासासाठी काम करतो आणि लोकांना आपल्या जीवा जीवनातील निसर्गाचे महत्त्व समजावून सांगतो. तरुणान तो स्वंयरोजगाराची वाट दाखवित असून, कोकणाच्या शाश्वत विकासाबद्दल बोलताना स्थानिक प्रश्नही परखडपणे प्रशासनासमोर मांडतो म्हणूनच तो असामान्य आहेत.

   कोकणाबरोबरच गोव्याचा सुंदर निसर्ग पुढील पिढीकडे सुपुर्द करा! असे त्यांचे आवाहन असून आपली निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे, म्हणूनच निसर्ग आपल्याला बदलल्यासारखा वाटू लागला आहे, असे प्रतिपादन प्रसाद गावडे यांने केले आहे. तो पुढे सांगतो की ”निसर्गाकडे एकरुप होऊन जीवन जगणे हाच खरा नैसर्गिक आनंद आहे. प्रत्येकाने या नैसर्गिक संस्कृतीत जगणे आणि ती टिकवणे महत्त्वाचे बनले आहे. ‘आनंदाचे अर्थकारण या विषयावर त्याने विचार व्यक्त केले असून, ‘भौतिकवादी नसलेली माणसेच खरा आनंद मिळवू शकतात' असे सांगून,  पैसा नसतानासुद्धा कौशल्याच्या आणि मेहनतीच्या बळावर ग्रामीण भागात लोक जगतात. पर्यावरणाच्या नावावर उत्पादक कंपन्या लोकांना आकर्षित करु पाहत आहेत. या कंपन्या जे देतात तेच आम्हाला ग्रामीण भागात नैसर्गिकदृष्ट्या मिळू शकते. म्हणून निसर्ग जपण्याची जाणीव आपल्याला होणे गरजेचे आहे.

 गोमंतकीयांनी इतरांना गोव्याचे सौंदर्य भरपूर दाखवले आहे. हे सौंदर्य आता  जपण्याची गरज आहे, ग्रामीण भागातील संस्कृती, परंपरा, रुढी, चाल, चलनाचे लिखित दस्तऐवजीकरण न करता ते आपल्या जगण्यातून दिसायला हवे. "खरा आनंद केवळ ग्रामीण भागातच मिळू शकतो. औद्योगिक लॉबीने गोव्याची जी जाहिरात केली आहे. त्यात खऱ्या अर्थाने ‘गोंयकार' कुठेच दिसत नाही. सद्या जी नैसर्गिक उत्पत्ती आहे तिचे भविष्यासाठी जतन करणे गरजेचे बनले आहे. पर्यटन हे काही लांब काळासाठी राहणार नाही. त्यामुळे आपल्या जगण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे” असे त्यांचे म्हणणे आहे.

त्या करिता कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे ‘स्वदेशः पुन्हा गावाकडे जाताना' ही शिबिरे आयोजित करतो. वयोगट १८ ते ४५ करिता ही शिबिरे असून, शहरातल्या विध्वंसक आणि विनाशाच्या वाटेवरच्या घोडदौडीला कंटाळून गेलेल्यांना शहरापासून दूर कुठेतरी ग्रामीण भागात आणि जंगलात राहत येते. ‘निसर्ग वाचवा' या संकल्पनेतून अनेकजण यात पर्यावरणासाठी काम करत आहेत. दुर्मिळ वृक्षांच, पशू पक्षांचं, जंगलांचं संवर्धन करत आहेत. ४ दिवस शेतात काम करून ग्रामीण जीवन अनुभवणे हे याचे वैशिष्ट्य आहे. आता त्याच्या पुढे जाऊन ग्रामीण जीवन जगण्याबद्दल, ग्रामीण माणसांच्या समुदायाच्या काय समस्या असतात आणि गावाचं सामूहिक जीवन कसे असते हे प्रत्यक्ष गावात राहूनच समजून घेता येते. त्यावर संवाद साधता येतो. हे एक पूर्णतः श्रमदान आणि अनुभवातून शिक्षण देणारे शिबिर आहे, पर्यटनासाठी नाही. यात तरुणांनी भाग घ्यायला हवा.गाव, तेथली शेतकरी माणसे आणि निसर्ग समजून घ्यायला हवा. - शिवाजी गावडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जिताड्याची शेती आणि शेतातला जिताडा