महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नृत्यांगना ते नायिका
दि कपिल शर्मा शो या लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमात गतकाळातील लोकप्रिय नायिका तसेच नृत्यांगना आशा पारेख, वहिदा रहमान आणि हेलन यांना निमंत्रित केले होते. अँकरने हेलन यांना एक प्रश्न विचारला की ”आपके जमाने की सबसे बेहतरिंन नर्तकी कौन रही?” क्षणाचाही विलंब न करता "वन अँड ओंनली वैजयंती माला” असे सांगून हेलनने सर्वांना चकित केले. नृत्यांगना ते नायिका हा खडतर प्रवास पूर्ण करणारी कलाकार म्हणजेच वैजयंती माला यांचे नांव सर्वत्र आदराने घेतले जाते.
एका जुनाट वाड्याच्या प्रथम दर्शनी बसलेला मालक उग्र नारायण ज्याचे तैलचित्र काढण्यात व्यस्त कथेचा नायक...समोरुन जाणारा भव्यदिव्य असा जिना, वरुन खाली येणारी नायिका जी खरी नायिका नसून तिच्या सारखी दिसणारी एक अनामिक युवती...हातात पेटती मेणबत्ती घेऊन त्या भव्यदिव्य अशा जिन्यावरुन खाली उतरणार इतक्यांत उग्र नारायण (खलनायक) घाबरुन विचारु लागतो की त्याच्या चेहऱ्यावर हे रक्त कुठुन आले कुठून? डमी म्हणून जिन्यावरुन खाली येणारी युवती अचानक थांबते! खऱ्या मृत नायिकेच्या जागी आलेली हुबेहूब दिसणारी ती डमी मुलगी म्हणजेच मधुमती या मृत नायिकेचा आत्मा तर नसावा...?
हे दृश्य पाहिल्यावर पुढे अनेक वर्षे वैजयंती मला ही खरीखुरी सजीव हाडामासांची भटकंती करणारी आत्मा तर नव्हे ना? असे वाटत राहिले. नंतर आरके बॅनरकडून संगम नामक भव्यदिव्य असा रंगीत सिनेमा निर्माण केला गेला आणि पूर्वीचा तो गैरसमज पार निघून गेला. "मेरे मनकी गंगा और तेरे मनकी जमुना का, बोल राधा बोल संगम होगा के नही?” असे त्याकाळी राजकपूर यांनी थेट तार करुन वैजयंती माला हिला विचारलेला प्रश्न लगेच तसाच तार करून "होगा होगा होगा” असे उत्तर मिळताच संगम सिनेमा अस्तित्वात आला. सिनेमा अप्सरा येथे प्रदर्शित झाला अन् देशभरात खूप गाजला.
ही पार्श्वभूमी जाणून घ्यावी की मधुमती या सिनेमामुळे नावारूपाला आलेली नृत्यांगना वैजयंती माला ही एक अप्रतिम नृत्यांगना तर होतीच पुढे तिने हेही सिद्ध केले की ती एक सशक्त नायिका म्हणून तिने सिद्ध केले. नृत्यांगना म्हणून तिची एक वेगळी ओळख होती, आहे आणि आजही लाईव्ह शोमध्ये आपल्या अंगी असलेली कला जाणकारांसमोर सादर करण्याची क्षमता आहे, या उतारवयात, हे विशेष!
दिलीप कुमार समवेत गंगा-जमुना या सिनेमात धन्नोची भूमिका साकार करुन हिंदी सिनेप्रेक्षकांना मोहित करणारी दाक्षिणात्य कलाकार वैजयंती माला हिने उत्तर भारतीय अवधी भाषेत आपले डायलॉग बोलून सर्वांना चकितच केले! विशेष म्हणजे हा सिनेमा केवळ दोन भावांच्या भावनिक जीवनावर आधारित असूनही वैजयंती माला या नायिकेचा अभिनय पाहुन सर्वांना आनंद झाला. "दाक्षिणात्य नायिकेला गंगा-जमुना या सिनेमात घेऊन निर्मात्यांने घोडचूक केली...” असे त्यावेळी सिनेमा रिलीज होण्यापूर्वी बोलले जायचे. पुढे फिल्म रिलीज झाली आणि एक इतिहास घडला. गंगा-जमुना फ़िल्म सुपरहिट ठरली. त्यानंतर संघर्ष, लीडर, देवदास, नयादौर या इतर नामांकित सिनेमातसुद्धा वैजयंती मालाने दिलिप कुमार सोबत काम केले व आपले अस्तित्व टिकवून ठेवले. निश्चित असे काहीच नसते जोवर ते सिद्ध होत नाही! वैजयंती मालाने ते स्वकर्तृत्वाने सिद्ध केले.
देव आनंद समवेत नायिका म्हणून काम करण्याची संधी तशी तिला दुनिया या हिंदी सिनेमात मिळाली खरी; पण तो सिनेमा खिडकीवर विशेष जादू दाखवण्यात अपयशी ठरला. मात्र देव आनंद याच्या होम प्रोडक्शनचा बहुचर्चित ज्यूवेल थीफ हा त्या दोघांचा सिनेमा अफाट गाजला. त्यांतील ११ मिनिटांचा तो क्लायमॅक्सची उत्कंठा अन गूढ वाढविणारा वैजयंती माला आणि साथींनी सादर केलेला तो डान्स सिक्वेंस कुणीही विसरु शकत नाही. संगीत अर्थातच सचिन देव बर्मन यांचे होते. त्यांस सजीव राखले ते नृत्यांगना वैयजयंती मालाच्या तंत्रशुद्ध नृत्य कलेने! अशा प्रकारे तत्कालीन त्रिदेव म्हणून एकेकाळी हिंदी सिनेमा गाजवणारे दिलिप-राज-देव यांच्या व्यतिरिक्त शास्त्रीय नृत्यांत प्राविण्य मिळवणारी नृत्यांगना हळूहळू तत्कालीन नामवंत नायिका नूतन, मीना कुमारी, नर्गिस, गीताबाली, वहिदा रेहमान, आशा पारेख यांच्या नृत्य आणि अदाकारीच्या रांगेत सहज दिसू लागली, तिच्यातल्या मेहनतीचे ते फळ होय!
त्यावेळी सूरज चित्रपट विषेश गाजला. कारण त्यांतील भरतनाट्यम नृत्य, संगीत आणि वैजयंती मालाचा देखणा रुबाब, सूरज सिनेमामध्ये जरी राजेंद्र कुमार असला तरीही फ़िल्म यशस्वी होण्याचे श्रेय वैजयंती मालास जाते! आणखी एक महत्वाची नोंद म्हणजे लता मंगेशकर या त्यावेळी इतरत्र व्यस्त असल्याने शंकर-जयकिशन यांनी नवीन गायिका म्हणून शारदा यांच्याकडून सूरज फ़िल्म करिता दोन गाणी रेकॉर्ड केली. पडद्यावर वैजयंतीमला यांनी त्या गाण्यावर लिपसिंंगिंग करणे मान्य केले! कारण त्याकाळी बहुतांशी नायिकेला आपल्या करिता पार्श्वगायन फक्त लता मंगेशकर यांचेच अपेक्षित असायचे. तसे पाहता शारदा नामक गायिकेने सूरज सिनेमातील ती दोन गाणी गायलीत छान, चाली अतिशय श्रवणीय आहेत. आजही ऐकाविशी वाटतात. सूरजमधील ती दोन्ही गाणी पडद्यावर पाहतांना तसेच रेडियोवर ऐकतांना छान वाटतात...देखो मेरा दिल मचल गया...तितली उडी, हिच ती दोन गाणी, रसिकांना आवडली होती. याव्यतिरिक्त वैजयंती माला यांनी राजेंद्र कुमार आणि राज कुमार, मनोज कुमार, सुनील दत्त, जॉय मुखर्जी, शम्मी कपूर यांच्या समोर नायिकेच्या भूमिकेत काम केले. इतकेच काय तर बंगाली फ़िल्म इंडस्ट्रीतील उत्तम कुमार या महानायकासोबत ”छोटीसी मुलाकात” या हिंदी सिनेमात काम केले. जो म्युझिकल हिट ठरला.
ब्लॅक अँड व्हाईट काळातील वैजयंती माला यांचा एक असा सिनेमा येऊन गेला कि त्यांस इंडस्ट्रीत तोड नाही, त्याचे नाव मधुमती असे होय. या सिनेमात नायिका ही आपल्या पित्यासमवेत अरण्यांत राहते. दुर्गम भागांत राहणाऱ्यास संगीत हे एकमेव साधन असते स्वतःच्या दुःख-पीडा विसरण्याचा तो एकमेव मार्ग समजला जायचा. आधुनिक युगात कदाचित चित्र वेगळे असू शकेल. अरण्यांत देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक व त्या अनुषंगाने भरलेल्या जत्रेत मधुमती एक सूंदर नृत्य सादर करते, "जुलमी संग आंख लडी रे..." हे लोकगीत संगीतकार सलील चौधरी यांनी लता मंगेशकर यांच्या स्वरात रेकॉर्ड केले ज्यावर अप्रतिम फोक नृत्य सादर करणारी नृत्यांगना वैजयंती माला...अशी कलाकृती सहजासहजी घडून येत नसते. श्रम, ध्येय, चिकाटी असे गुण अपेक्षित असतात. त्याचे संपूर्ण श्रेय हे त्या नायिकेला जाते, वैजयंती माला तिने ते सिध्द केले...हे निर्विवाद!
मधुमती ह्याच सिनेमात आणखी एक लोकगीत आहे जे मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात रेकॉर्ड केले गेले आहे... "दय्या रे दय्या चढ गयो पापी बिच्छवा...” हे समूह गीत पडद्यावर पाहतांना खूप रंजक वाटते. सलील चौधरींनी संगीतबद्ध केलेली या सिनेमातील सर्व गाणी अतिशय लोकप्रिय झाली अन आजही रसिक आवडीने ऐकतात! त्यावेळी कलेला फार महत्व असायचे! आदर असायचा!
दि कपिल शर्मा शो- या लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमात गतकाळातील लोकप्रिय नायिका तसेच नृत्यांगना आशा पारेख, वहिदा रहमान आणि हेलन यांना निमंत्रित केले होते. अँकरने हेलन यांना एक प्रश्न विचारला की "आपके जमाने की सबसे बेहतरिंन नर्तकी कौन रही?”
क्षणाचाही विलंब न करता "वन अँड ओंनली वैजयंती माला” असे सांगून हेलनने सर्वांना चकित केले. विशेषतः मंचावर उपस्थित आशा पारेख, वहिदा रेहमान आणि स्वतः हेलन या अप्रतिम नृत्यांगना व नायिका असूनही, हेलन यांनी वैजयंती माला हेच नांव घेतले, याचा अर्थच असा होतो की अजूनही नृत्यांगना ते नायिका हा खडतर प्रवास पूर्ण करणारी कलाकार म्हणजेच वैजयंती माला यांचे नांव सर्वत्र आदराने घेतले जाते, त्यांचे मनापासून अभिनंदन. - इक्बाल शर्फ मुकादम