बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला तिच्याच घरात  

तळोजा : तळोजा गावातील राहत्या घरासमोरुन २५ मार्च रोजी भरदुपारी अपहरण झालेल्या २ वर्षे १० महिन्यांच्या हर्षिका शर्मा या चिमुकलीची हत्या तिच्या घरासमोर राहणाऱ्या मोहम्मद मजीर वझीर अन्सारी (२९) याने केल्याचे उघडकीस आले आहे. २६ मार्च रोजी उशीरा रात्री हर्षिकाचा मृतदेह तिच्याच घरातील बाथरुमच्या माळ्यावर एका रेग्झिनच्या बॅगेत आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे. हर्षिकामुळे तिची आई आणि अन्सारीची पत्नी यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असल्यामुळे आरोपीचा हर्षिकावर राग होता. तसेच ऑनलाईन गेमींगमध्ये तो पैसे हरल्याने हर्षिकाचे अपहरण करुन तिच्या वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी आरोपीने सदर सर्व प्रकार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  

या घटनेतील मृत हर्षिका आई-वडील आणि मोठ्या भावासह तळोजा गावातील देवीचा पाडा भागात माऊली कृपा बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर राहात होती. २५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता इमारतीच्या गॅलेरीत खेळत असताना, हर्षिकाच्या घरासमोर राहणाऱ्या आरोपी मोहम्मद अन्सारी याने आपल्या तीन्ही मुलांना खाऊ आणण्याच्या बहाण्याने दुकानात पाठवून दिले होते. त्यानंतर त्याने संधी साधून हर्षिकाला आपल्या घरामध्ये नेले होते. यावेळी अन्सारीची पत्नी बाथरुममध्ये आंघोळ करत असताना, त्याने बुटाच्या लेसच्या सहाय्याने हर्षिकाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने लोकल ट्रेनमधील एका प्रवाशाच्या चोरलेल्या रेग्झीन बॅगमध्ये तिचा मृतदेह भरुन ठेवला.

हर्षिका अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिची शोधा-शोध सुरु केली. पोलिसांनी देखील तिची शोधा-शोध सुरु केल्याने आरोपीला तिच्या मृदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे मोहम्मद अन्सारी याने संधी साधून हर्षिकाचा मृतदेह असलेली रेग्झिन बॅग त्यांच्याच घरातील बाथरुमच्या वरच्या भागात ठेवली. २६ मार्च रोजी रात्री उशीरा मृत हर्षिकाच्या कुटुंबियांना त्यांच्या घरातील बाथरुमच्या वरच्या भागात असलेल्या रेग्झीनच्या बॅगेतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी सदर बॅगेची तपासणी केली असता, त्यात त्यांना हर्षिकाचा मृतदेह आढळून आला होता. तळोजा पोलिसांनी हर्षिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता.  

त्यानंतर तळोजा पोलिसांनी आणि गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने तपासाला सुरुवात केली असता, ज्या रेग्झीन बॅगमध्ये हर्षिकाचा मृतदेह सापडला, ती रेग्झीन बॅग हर्षिकाच्या घरासमोर राहणाऱ्या मोहम्मद अन्सारी याची असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने हर्षिकाची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी त्याला अटक केली.  

आरोपी मोहम्मद अन्सारी याला ३ मुले असून हर्षिका त्यांच्यासोबत खेळत असे. या लहान मुलांमध्ये अनेकवेळा खेळण्यावरुन भांडण होत होते. या भांडणावरुन हर्षिकाची आई आणि आरोपी मोहम्मद अन्सारी याची पत्नी यांच्यामध्ये सुध्दा नेहमी भांडण होत होते. त्यामुळे अन्सारी याला हर्षिकाचा राग होता. त्यातच मोहम्मद अन्सारी ऑनलाईन गेममध्ये ४२ हजार रुपये हरला होता. हरलेले पैसे वसूल करण्यासाठी त्याने हर्षिकाचे अपहरण करुन तिच्या वडिलांकडून पैसे उकळण्याची योजना आखली होती. मात्र, पोलिसांनी हर्षिकाची शोधा-शोध सुरु केल्यामुळे त्याची योजना फिस्कटली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची वाशीमध्ये धडक कारवाई,