अटल सेतूवरुन उडी मारुन शिक्षकाची आत्महत्या
नवी मुंबई : अलिबाग येथे राहणा-या एका शिक्षकाने शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वैभव पिंगळे (45) असे मृत शिक्षकाचे नाव असून सेक्सटॉर्शनच्या छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
या घटनेतील मृत वैभव पिंगळे हे अलिबाग येथील कुर्डुस गावात राहण्यास होते. तसेच ते प्राथमिक शिक्षक म्हणुन कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या क्रेटा कारने अटल सेतुवर आले होते. त्यांनतर त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करुन पुलावरुन समुद्रात उडी मारली. पुलावरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाने तत्काळ पोलिसांना पुलावर एक कार थांबल्याची माहिती दिल्यांनतर पोलिसांनी तत्काळ कार जवळ धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच वैभव पिंगळे हे समुद्रात वाहुन गेले होते. त्यानंतर उलवे पोलिसांनी व सागरी सुरक्षा विभागाने त्यांची शोधमोहीम सुरु केली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नाही.
सायबर गुन्हेगारांकडून वैभव पिंगळे यांना सेक्सटोरशनच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मागील 8 दिवसांपासून ते तणावाखाली आले होते. सायबर गुन्हेगारांकडून पिंगळे यांचा मानसिक छळ वाढल्याने अखेर त्यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या कारने अटल सेतू गाठले. त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली कार उभी करून समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. उलवे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.