नवी मुंबई पोलिसांची अंमली पदार्थाच्या तस्कराविरोधात पुन्हा एकदा धडक कारवाई
नवी मुंबई : अंमली पदार्थांची तस्करी करणाऱया परदेशी नागरिकांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याच्या उद्धेशाने नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनबद्ध धाडी टाकुन 14 परदेशी नागरिकांची धरपकड केली. या धडक कारवाईत 3 आफ्रिकन नागरीक अंमली पदार्थासह सापडले असून त्यांच्याकडुन सुमारे 1 कोटी 10 लाख रुपये किंमतीचे एमडी आणि कोकेन जफ्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पासपोर्ट आणि व्हिजाशिवाय बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या 11 परदेशी नागरीकांना भारत देश सोडुन जाण्याची लिव्ह इंडिया नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या सुचनेनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱयांविरोधात विशेषत: परदेशी नागरीकांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाउसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व गुन्हे शाखेतील अधिकाऱयांनी व अंमलदार यांनी उलवे, खारघर आणि तळोजा या भागात एकाच वेळी 11 ठिकाणी छापेमारी करुन कोंबिंग ऑपरेशन राबविले.
या कारवाईमध्ये एकुण 35 आफ्रिकन नागरिकांची पडताळणी करण्यात आली असुन त्यापैकी अंमली पदार्थ बाळगणाऱया 3 आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 118.48 ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन (59 लाख 24 हजार रुपये), 100.84 ग्रॅम एम.डी पावडर (50 लाख 42 हजार रुपये), तसेच रोख रक्कम 43,500 रुपये, असा एकुण सुमारे 1 कोटी 10 लाख 10 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जफ्त करण्यात आले आहे. या आफ्रिकन नागरीकांविरोधात उलवे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये पासपोर्ट व व्हिजाशीवाय अवैध्यरित्या वास्तव्यास असलेल्या 11 आफ्रिकन नागरीकांची देखील धरपकड करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय पासपोर्ट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना भारत देश सोडुन जाण्याची लिव्ह इंडिया नोटीस बजावण्यात आली आहे.
सदर कारवाईमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकुण 125 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झालेले होते. या कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांनी मागील पंधरा दिवसापासून नवी मुंबईत विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरीकांवर वॉच ठेवुन त्यांची गोपनीय माहिती काढली होती. त्यानंतर गुरुवारी पहाटेच्या सुमारास एकाचवेळी उलवे, खारघर आणि तळोजा मधील 11 ठिकाणी धाड टाकुन त्यात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरीकांची तपासणी करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.