हिललाईन पोलीस ठाण्यातील फायरींगची वर्षपूर्ती
वैभव गायकवाड यांना अटक करण्याची मागणी
उल्हासनगर : तत्कालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या फायरींगच्या घटनेला वर्षपूर्ती झाली आहे. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी गणपत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात नसल्याकडे ‘मोर्चा'द्वारे लक्ष्य वेधले.
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर सदर गोळीबार प्रकरणात सह आरोपी असलेले गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गणपत गायकवाड फरार झाले आहेत. ते अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसतानाच आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या ३ आरोपींनाही जामीन मंजूर झाला आहे. बीडच्या धर्तीवर पोलीस कारवाई पाहता दुटप्पी असल्याकडे लक्ष्य वेधण्यासाठी अनिल अशोक थिएटर येथून पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यासह शेकडो समर्थक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या समोर शिष्टमंडळाने व्यथा मांडली. वैभव गायकवाड याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. दरम्यान, आम्हाला न्याय न मिळाल्यास पुढील मोर्चा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर काढू, असा इशाराही यावेळी महेश गायकवाड यांनी दिला.
शिष्टमंडळाने माझ्याकडे अनेक मुद्दे मांडले. गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे असून शिष्टमंडळाच्या भावना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवू. -सचिन गोरे, पोलीस उपायुक्त-उल्हासनगर.