नवी मुंबईतून 200 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेले चार जण अटकेत
नवी मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागीय युनिटने नवी मुंबईतील बेलापूर येथे छापेमारी करुन तब्बल 200 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत एनसीबीने चार जणांना अटक केली आहे. अंमली पदार्थाच्या या तस्करीच्या सिंडीकेट शोध घेण्यासाठी एलसीबीच्या पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
एनसीबीच्या एमझेडयूने गत जानेवारी महिन्यामध्ये तपास करुन मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर एजन्सीमधून ऑस्ट्रेलियाला पाठवल्या जाणाऱ्या एका पार्सलमधुन 200 ग्रॅम कोकेनचा साठा जप्त केला होता. तसेच या कारवाईत एका आरोपीला अटक केली होती. या कारवाईनंतर एनसीबीच्या पथकाने तांत्रिक आणि गुप्त बातमीदाराकडुन सदर अंमली पदार्थाच्या स्रोताचा शोध घेतला असता, नवी मुंबईतील बेलापूरमध्ये मोठया प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने गत 31 जानेवारी रोजी बेलापूर येथील एका घरावर छापा मारुन तब्बल 200 कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.
या कारवाईत एनसीबीने 11.540 किलो उच्च प्रतीचे कोकेन, 4.9 किलो हायड्रोपोनिक गांजा, 200 पाकिटे (5.5 किलो) कॅनाबिस आणि 1 लाख 60 हजार रुपयांच्या रक्कम जप्त करुन तिघांना अटक केली आहे. अंमली पदार्थाच्या या सिंडिकेटचे संचालन परदेशात असलेल्या काही लोकांकडुन करण्यात येत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. तसेच जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे स्रोत अमेरिकेतून मुंबईत आल्याचे व कुरिअर-स्मॉल कार्गोच्या माध्यमातून आणि मानवी वाहकांद्वारे भारतातील वेगवेगळ्या भागात आणि परदेशात पाठवले जात असल्याचे देखील आढळुन आले आहे. या प्रकरणात सहभागी असलेले लोक एकमेकांना ओळखत नसून ते अंमली पदार्थांच्या व्यवहाराबाबत चर्चा करण्यासाठी सांकेतीक नावांचा वापर करत असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.