सिमेंट गाळ रस्त्यावर टाकणाऱ्या वाहनावर कारवाई
नवी मुंबई : सिमेंट काँक्रिट मिश्रीत पाणी रस्त्यावर टाकणाऱ्या वाहनावर नवी मुंबई महापालिका तर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, या कारवाईत ३० हजार रुपये दंड स्वरुपात वसूल करण्यात आले आहेत.
बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट काँक्रिट मिश्रीत पाणी रस्त्यावर सोडून दिल्याने त्या रस्त्यावर काँक्रिटचा चिखल होऊन वाहने घसरुन अपघात होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिका परिमंडळ-२ अतिक्रमण विरोधी भरारी पथकाने महापालिका उपआयुक्त (परिमंडळ-२) डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली ३१ जानेवारी रोजी धडक कारवाई करीत रस्त्यावर काँक्रिटचा चिखल टाकणारे वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत वाहन चालकाकडून ३० हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
दरम्यान, नवी मुंबई शहर स्वच्छतेला बाधा आणणाऱ्या घटकांविरोधात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येत आहे, असे महापालिका उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांनी सांगितले.