भरधाव कारची २ रिक्षांना धडक

नवी मुंबई : पनवेल येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव होंडा सिटी कारने रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका रिक्षामध्ये झोपलेल्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सायन-पनवेल मार्गावर जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली. या अपघातात दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला असून नेरुळ पोलिसांनी होंडा सिटी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.  

या अपघातात मृत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव घनश्याम जैस्वाल (५०) असे असून तो तुर्भे नाका येथील शांतीनगरमध्ये राहण्यास होता. घनश्याम जैस्वाल याने रात्रभर रिक्षा चालवली होती. त्यामुळे २९जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्याने सायन-पनवेल मार्गावरील जुईनगर रेल्वे स्टेशन जवळच्या बस स्टापवर आपली रिक्षा उभी करुन त्यात तो झोपी गेला होता. यावेळी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र वनकळस त्याचठिकाणी आपल्या मुलासह रिक्षा घेऊन चहा पिण्यासाठी आले होते. यावेळी राजेंद्र यांनी घनश्याम जैस्वाल याच्या रिक्षाच्या पुढे आपली रिक्षा उभी करुन ते चहा पिण्यासाठी उतरले होते.  

याचवेळी पनवेल येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव होंडा सिटी कारने रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या घनश्याम आणि राजेंद्र या दोघांच्या रिक्षांना जोरात धडक दिली. या अपघातात रिक्षामध्ये झोपलेले घनश्याम जैस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र आणि त्यांचा मुलगा घटनेच्या काही मिनिटापूर्वी रिक्षातून उतरल्याने ते या अपघातातून थोडक्यात बचावले. या अपघातात मृत घनश्याम आणि राजेंद्र या दोघांच्या रिक्षांचा चक्काचुर झाला आहे.

सदर अपघातानंतर नेरुळ पोलिसांनी मानखुर्द येथे राहणारा होंडा सिटी कार चालक विष्णू देवानंद राठोड (२७) या सिव्हील इंजिनिअर विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सिमेंट गाळ रस्त्यावर टाकणाऱ्या वाहनावर कारवाई