उल्हासनगर मध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
उल्हासनगर : उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर्स आहेत. पण, या डॉक्टरांवर महापालिकेच्या वतीने अत्यंत संथ गतीने कारवाई सुरु आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बोगस डॉक्टरांच्या विरुध्द कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले आहेत. या कारवाईत पोलीस प्रशासन सहकार्य करीत नसल्यास आरोप महाालिका अधिकारी करीत आहेत. तर बोगस डॉक्टरांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास त्वरित गुन्हा दाखल करण्यात येतो, असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.
डिसेंबर महिन्यात तत्कालीन महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी बोगस डॉक्टरांवर तक्रारी दाखल होऊनही स्थानिक पोलीस कारवाई करीत नाही, असे पत्र थेट पोलीस आयुक्त डॉ. आशुतोष डुंबरे आणि पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना देऊन कारवाईची मागणी केली होती.
विकास ढाकणे यांच्या अगोदरही तत्कालीन आयुक्त अजित शेख यांच्या कार्यकाळात बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यासाठी तब्बल ६ महिन्यांपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी शर्मा तसेच कायदा अधिकारी राजा बुलानी, सहाय्यक पोलीस आयुक्त, विभागाचे प्रतिनिधी, सर्व विभागीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्र-१ ते ६, आदि उपस्थित होते. बैठकीमध्ये उल्हासनगर महापालिका क्षेत्रांतर्गत वैद्यकीय समिती गठीत करण्यात आली होती, त्यामार्फत बोगस डॉक्टरांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी तपासणीत बनावट आढळून आलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली होती.
उल्हासनगर शहरात वैद्यकीय पदवी जवळ नसताना रुग्ण सेवा देणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी ‘महाराष्ट्र वैद्यकीय परिषद'चे प्रबंधक डॉ. डी. यु. वांगे यांचे आणि डॉ. राकेश गाजरे यांनी ४ वर्षांपूर्वी उल्हासनगर महापालिकेला पत्र प्राप्त दिले होते. तसेच ‘परिषद'द्वारा वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे.
यानंतर अधिकाऱ्यांच्या बैठका आणि आदेशामुळे केवळ १-२ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. उल्हासनगर-४ परिसरातील एका बोगस डॉक्टर विरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. त्याच्या विरोधात वि्लवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यापूर्वी कॅम्प नंबर ५ सेक्शन ४० मध्ये जीवनघोट हॉल समोर डॉ. जैस्वाल बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची तक्रार वैद्यकीय आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशान्वये उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी पगारे यांनी पोलीस बंदोबस्तात छापा मारला. यावेळी चौकशीत डॉ. भरतकुमार जैस्वाल कर्नाटक मधील बीएचएमएस धारक असून त्यांच्याकडे ‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी'चे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने बोगसगिरी उघड झाली आहे. विशेष म्हणजे दवाखान्यावर नामफलक नसून आत मध्ये ८ बेडची आणि रुग्णांना ॲडमिट करण्याची व्यवस्था होती.
२०१० मध्ये ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोम्बिंग ऑपरेशन राबवून ठाणेतून ६, भिवंडी ११, कल्याण १२ आणि उल्हासनगरमधून ४ अशा एकूण ३३ बोगस डॉक्टरांना अटक केली होती. पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटक, झारखंड आदि राज्यातील सदर डॉक्टर होते. सातवी पास बोगस महिला डॉक्टर अनिता सावंत उर्फ अनिता कश्मीरी हिला देखील काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती. मात्र, त्यानंतर बोगस डॉवटरांविरोधात अशी कारवाई झालेली नाही.
उल्हासनगर शहरात असंख्य बोगस डॉक्टर असून ते रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. या बोगस डॉक्टरांना काही राजकीय नेते आणि महापालिकेचे अधिकारी पाठीशी घालत असल्यानेच शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे.
-मैनुद्दीन शेख, शहर संघटक-मनसे.
महापालिका द्वारा बोगस डॉक्टरांची यादी तयार करण्यात आलेली आहे. तथापि, महापालिका आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरोधात भूमिका घेतली असताना, पोलीस कारवाई करीत नाही.
- डॉ. मोहिनी धर्मा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, उल्हासनगर महापालिका.
बोगस डॉक्टरांची कागदपत्रे तपासणे, त्याची शहनिशा करणे महापालिकेचे काम आहे. आमच्याकडे या संदर्भात तक्रार आल्यास त्वरित गुन्हा दाखल करण्यात येतो.
-सचिन गोरे, पोलीस उपायुवत- परिमंडळ ४, उल्हासनगर.