घरफोडी चोरी करुन नवी मुंबईत धुमाकुळ; सराईत गुन्हेगार कर्नाटकात जेरबंद  

नवी मुंबई : नवी मुंबईत रात्रीच्या सुमारास घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने शोध घेऊन त्याला कर्नाटक येथून जेरबंद केले आहे. आसिफ नहीर शेख (४१) असे या साराईत चोरट्याचे नाव असून त्याने नवी मुंबईच्या विविध भागात केलेले ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या चोरट्याकडून सदर गुन्ह्याातील तब्बल ६० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.  

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये ऐरोली, एपीएमसी परिसरामध्ये रात्रीच्या घरफोडीच्या गुह्यात वाढ झाली होती. त्यामुळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदाराकडून या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्यात येत होता. परंतु, या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी हेल्मेट आणि चोरीच्या मोटारसायकलवर बनावट नंबर प्लेट वापरत असल्याने त्याला पकडण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.  

दरम्यान, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या सुचनेनुसार मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी दोन तपास पथकांच्या माध्यमातून घटनास्थळाचा तांत्रिक तपास करुन आरोपी आसिफ नहीर शेख याचा माग काढला असता, सदर आरोपी मुंब्रा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंब्रा परिसरातील पाच गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांकडे कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपी निष्पन्न केले. मात्र, तो कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे सासुरवाडीत लपल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने तत्काळ कर्नाटक राज्यात पथक पाठवून सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.  

त्यानंतर गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत आरोपी आसिफ शेख याने एपीएमसीच्या हद्दीत ३, रबाले २, तसेच रबाले एमआयडीसी आणि कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे एकूण ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याची अधिक चौकशी करुन सदर गुन्ह्यातील अर्धा किलो सोन्याचे दागिने, ३.२ किलो चांदीचे दागिने, १६ लाखांची रोख रक्कम, २ मोटारसायकल, ३ लॅपटॉप, १ आयफोन असा एकूण ६० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केले आहेत.  

सुतारकाम करता-करता घरफोडीला सुरुवात...  
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी आसिफ शेख पूर्वी सुतारकाम करत होता. मात्र, कोव्हीड काळात कामबंद झाल्याने त्याने घरफोडी, चोरी करण्यास सुरवात केल्याचे त्याच्या चौकशीत आढळून आले आहे. तो वेगवेगळ्या परिसरात फेरफटका मारत असे. यावेळी एखादे घर बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यानंतर तो सदरचे घर फोडत असल्याचे तपासात आढळून आले आहे. यापूर्वी त्याच्या विरोधात कर्नाटकातील गुलबर्गा येथील युनिव्हर्सिटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

भिवंडीत १ हजारहुन अधिक तर राज्यात २ लाख बांग्लादेशी नागरिक