आता ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना'

संपादकीय
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना' १ जुलै २०२४ पासून सुरु केल्यानंतर या योजनेचे कवित्व संपत तोच १७ जुलै पासून ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना' सुरु करुन राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना मोठाच आर्थिक दिलासा दिला आहे. अर्थात या योजनेची अंमलबजावणी किती पारदर्शक, गतिमान पध्दतीने होते, यावरच या योजनेचे यशापयश अवलंबून राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना'च्या धर्तीवर आता ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना' जाहीर करण्यात आली आहे. माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना'चा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना' म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना'च्या माध्यमातून राज्य सरकार तरुणांना राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देणार आहे. प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे. तसेच लाभार्थी तरुणांच्या बँक खात्यांमध्ये सरकार विद्या वेतन म्हणून ६ ते १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे. तरुण या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अर्ज करु शकणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ' या योजनेतून लाभार्थी तरुणांसाठी तीन प्रकारचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचे शिक्षण घ्ोतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार सहा महिन्यांची इंटर्नशिप मिळवून देणार आहे. सरकार लाभार्थी तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध करुन देणार आहे. तसेच प्रत्येक लाभार्थीला दर महिन्याला सरकारकडून प्रशिक्षणार्थी रवकम दिली जाणार आहेत. या योजनेतून बारावी उत्तीर्ण तरुणांना महिन्याला ६ हजार रुपये, आय.टी.आय. किंवा डिप्लोमा केलेल्या तरुणांना दर महिन्याला ८ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दर महिन्याला १०  हजार रुपये पैसे सरकारकडून मिळणार आहेत. सरकार लाभार्थी तरुणांच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला पैसे पाठवणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.अर्थात या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित तरुण मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी असणे, तरुणाचे वय १८ ते ३५ वयोगटाच्या आत असणे, तरुणाच शिक्षण बारावी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतके झालेले असणे, तरुणाचे बँक खाते आधारकार्डशी जोडले गेलेले असणे, अनिवार्य आहे. अर्थात, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेत बेरोजगार असलेले तरुणच पात्र ठरणार असून, केवळ बेरोजगार तरुणानांच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ' या योजनेमुळे बेरोजगार तरुणांना मोठाच दिलासा मिळणार असला तरी या योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने झाली तरच खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत. ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' आणि ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ' या योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिला आणि तरुणांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिला आणि तरुणांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या सूचनांचे किती प्रामाणिकपणे पालन होते, याचा प्रत्यय लवकरच येणार आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये घुसलेल्या दलालांना रोखायचे कोणी?. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

पालकांच्या चिंतेत भर