सार्वजनिक वाहतुकीसाठी लोकाभिमुख निर्णय
नेहमीच महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या सेवेत अग्रेसर राहिलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) तर्फे अलिकडेच, ज्येष्ठ नागरिकांना १५ जुलै २०२४ पासून मोफत एसटी प्रवास सुविधा देण्याचा घेण्यात आलेला निर्णय ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा आणणारा ठरणार आहे. एसटी महामंडळाने घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय विविध सामाजिक गटांना लाभदायक ठरणार आहेत. एमएसआरटीसी सध्या ३२ विविध सामाजिक गटांना प्रवासी भाडे सवलत देत आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) एमएसआरटीसी द्वारे सुमारे १,५७५ कोटी रुपयांच्या सवलती प्रवाशांना दिल्याने राज्य सरकार सार्वजनिक वाहतुकीला किती महत्त्व देते आणि समाजातील विविध घटकांना परवडणारी वाहतुक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी किती कटिबध्द आहे, याचा प्रत्यय यायला हरकत नाही.महाराष्ट्रातील लाल परी (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची महत्त्वाची घोषणा एमएसआरटीसी द्वारे करण्यात आली आहे. महिलांना एसटी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या निर्णयामुळे महिलांना अधिक स्वातंत्र्याने एसटी बस मधून प्रवास करता येणार असून, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यालाही चालना मिळणार आहे.एमएसआरटीसी द्वारे ज्येष्ठ नागरिकांना एसटी तिकीटामध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक १५ जुलै २०२४ पासून मोफत प्रवास करु शकणार आहेत. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता अधिक सहजतेने प्रवास करता येणार असून, त्यांच्या सामाजिक जीवनालाही चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे या नवीन धोरणांमध्ये वयाची किंवा लिंगाची कोणतीही अट घालण्यात न आल्याने स्त्री असो की पुरुष, सर्वांना या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.एसटी प्रवासात सवलत देण्याच्या निर्णयांमुळे गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, सवलतीच्या निर्णयांमुळे एसटी महामंडळासमोर आर्थिक आव्हाने उभी राहण्याची शवयता देखील आहे. परंतु, राज्य सरकारने एसटी प्रवासातील सवलतींसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. एमएसआरटीसी द्वारे अलिकडेच प्रवाशांना एसटी प्रवासात सवलत देण्याचे घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय खरोखरच स्वागतार्ह, सामाजिक समावेशनाला प्रोत्साहन देणारे आणि विविध समाज घटकांना एकत्र आणणारे आहेत. यामुळे एसटी खऱ्या अर्थाने ‘जनतेची वाहतूक सेवा' बनणार आहे. मात्र, या निर्णयांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होणे आणि त्यांचा गैरवापर न होणे महत्त्वाचे आहे. यासाठी सरकार, एसटी महामंडळ आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. एकूणच, एमएसआरटीसी तर्फे घेण्यात आलेले निर्णय महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारे तसेच राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक मजबूत आणि लोकाभिमुख बनवणार ठरणार आहेत.