संशयकल्लोळ अन् उत्सुकता
महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीत ११ जांगासाठी १२ उमेदवार मैदानात असल्याने या निवडणुकीत चुरस आणि उमेदवारी अर्ज भरलेल्या १२ उमेदवारांपेकी कुणीही माघार न घेतल्याने रस्सीखेच होणार इतके निश्चित आहे. साहजिकच आज १२ जुलै रोजी होणाऱ्या राज्य विधान परिषद निवडणुकीकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. ११ जांगासाठी १२ उमेदवार उभे ठाकल्याने या निवडणुकीत विजयासाठी घोडेबाजार झाला तर आश्चर्य वाटण्याचे काहीएक कारण नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीचा निकाल आजच १२ जुलै रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या एका उमेदवारावर पराभवाची नामुष्की ओढवते, याचा निकालही आजच लागणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा ५ जुलै शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेकाप उमेदवार जयंत पाटील आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्यापैकी एकजण माघार घेईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असताना कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप तर्फे पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे या पाच उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे आदी दोघे मैदानात उतरले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना तर्फे भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या (शरदचंद्र पवार) पाठिंब्यावर जयंत पाटील तर काँग्रेस पक्षाकडून डॉ. प्रज्ञा सातव निवडणूक लढणार आहेत. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर सत्ताधारी महायुती मधील कोणत्या पक्षाची मते फोडणार तसेच जयंत पाटील यांच्यासाठी कुठून कशी मतांची बेगमी होणार, यावर संबंधितांचा विजय अवलंबून असणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी विधिमंडळात आज १२ जुलै रोजी मतदान पार पडणार असून, या निवडणुकीचा निकाल देखील आजच लागणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान गुप्त पध्दतीने होणार असल्याने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता तसेच गुप्त मतदान पध्दतीमुळे मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाची मते फुटणार, याबाबत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि संशयकल्लोल असणे स्वाभाविक आहे. विधानसभा मधील एकूण आमदारांची संख्या २७४ इतकी आहे. त्यामध्ये भाजप-१०३, शिवसेना ३७, राष्ट्रवादी (अजित पवार गट) -३९, काँग्रेस-३७ शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) -१५ राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) -१३ शेकाप-१, अपक्ष-१४, एमआयएम- २, समाजवादी पार्टी-२, माकप- १ क्रांशेप- १ असे एकूण पक्षीय बळाबळ आहे. या २७४ आमदारांचा नेमका कल कुणाकडे आहे, ते आज १२ जुलै रोजी सायंकाळी स्पष्ट होणार आहे. एकूणच विधान परिषद निवडणूक सर्वच पक्षांची कसोटी पाहणार, इतके निश्चित!.