कारवाईत सातत्याची गरज

संपूर्ण महाराष्ट्र राज्य अंमलीपदार्थ मुक्त करण्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला संकल्प स्वागतार्ह असला तरी या संकल्पाला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे, याचा विसर पडून चालणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र राज्य अंमलीपदार्थ मुक्त करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या निर्देशांमुळे खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब, बार आणि अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची मोहीम २७ जून पासून सुरु केली आहे. या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटर अंतराच्या आत असलेल्या पानटपऱ्या जप्त करण्यासह अनधिकृत हॉटेल, पब, बारवर कारवाई करण्यात येत आहे.१९ मे २०२४ रोजी घडलेल्या पुणे पोर्शे हिट ॲण्ड रन प्रकरणानंतर पुणे शहरासह राज्यभरात पब आणि बार मध्ये अल्पवयीन मुलांना सहज मद्य मिळत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे पोर्शे हिट ॲण्ड रन घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता राज्यातील सर्व पब, रेस्टॉरंट आणि बार मधील गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये पब, रेस्टॉरंट आणि बार मध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वयाची संपूर्ण चौकशी करण्यासह पब, रेस्टॉरंट, बारमधील वेळेच्या बंधनाचे काटेकोरपालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, बार आणि पबमधील काऊंटरवर मद्य दिले जाणाऱ्या ठिकाणी किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, सीसीटीव्ही कॅमेरे एआय प्रणालीअंतर्गत असणे अनिवार्य आहे. सध्या शहरी भागात पब, रेस्टॉरंट आणि बार रात्री दीड वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात अकरा वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, अनेक बार आणि पब रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत सुरु असतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. वेळेची मर्यादा न पाळता रात्री उशीरापर्यंत सुरु राहणाऱ्या बार आणि पबना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चाप बसणार आहे. वेळमर्यादा पाळली गेली नाही तर, कृत्रिम बुध्दीमत्तायुक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला अलर्ट मिळणार आहे. परिणामी बंद करण्याच्या वेळेचे बंधन न पाळणाऱ्या पब आणि बार व्यवस्थापनावर कारवाई करणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोपे जाणार आहे. पुणे शहरामध्ये तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. तरुण अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे गैरप्रकार राज्यातील कुठल्याही शहरात घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर निर्णय घेवून महाराष्ट्रातील सर्व शहरातील अनधिकृत पब, बार आणि अनधिकृत अंमली पदार्थ विक्री केंद्रे नष्ट करावीत अशा सूचना दिल्या आहेत. या सूचनांची सर्वत्र अंमलबजावणी सुरु झाली आहे. ठाणे शहरातील बेकायदेशीर पब, बार, अनधिकृत पानटपरी, गुटखा विक्रेते, अनधिकृत बांधकाम, अनाधिकृत हॉटेल, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय अनधिकृत दिव्यांग स्टॉलची तपासणी करुन धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आलेले स्टॉल जप्त करण्यात येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्य अंमलीपदार्थ मुक्त करण्यासाठी ठोस कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिल्यानंतर या निर्देशांनुसार शहरांतील सर्व अनधिकृत हॉटेल, पब, बार, हुवका पार्लर तसेच पानटपऱ्या निष्कासित करण्याची मोहीम स्थानिक प्रशासनाद्वारे सुरु करण्यात आली असली तरी या मोहीमेत सातत्य राहण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अनधिकृत हॉटेल, पब, बार, हुवका पार्लर, पानटपऱ्या निष्कासित करण्याची कारवाई केवळ दिखाव्याचीच ठरण्याची शवयता अधिक राहणार आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे इतिहासजमा