हानिकारक वायू प्रदूषण
हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट (एचईआय) या अमेरिका स्थित संशोधन संस्था तर्फे ‘युनिसेफ' च्या सहकार्याने प्रसिध्द करण्यात आलेली वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी चिंताजनक आहे. भारत देशात २०२१ या वर्षभरात वायू प्रदूषणामुळे तब्बल २१ लाख व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे यामध्ये पाच वर्षांखालील दीड लाखापेक्षा जास्त बालकांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती ‘एचईआय' या संशोधन संस्था तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात समोर आली आहे. शहरांमध्ये रस्त्यावर धावणाऱ्या वाहनातून निघणाऱ्या धुरातून १९.६ टक्के वायू प्रदूषण, रस्त्यांवरील धुलीकणांतून १९.४ टक्के वायू प्रदूषण, रासायनिक कारखान्यांतून १८.९ टक्के वायू प्रदूषण, महापालिका घनकचरा प्रकल्प ठिकाणी लावण्यात येणाऱ्या आगीतून १३.८ टक्के वायू प्रदूषण, बांधकामांद्वारे ६.३ टक्के वायू प्रदूषण, झोपडपट्टीतून ५.२ टक्के वायू प्रदूषण, घरांतून ३.७ टक्के वायू प्रदूषण, ऊर्जा प्रकल्पातून ३.७ टक्के वायू प्रदूषण आणि अगरबत्ती, सिगारेट धूर, मॉस्केटो क्वाईल्समधून ३.३ टक्के वायू प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे.
वायू प्रदूषणामुळे २०२१ या वर्षभरात संपूर्ण जगात ८१ लाख निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. भारत देशात २०२१ या वर्षात वायू प्रदूषणामुळे पाच वर्षांखालील १,६९,१०० बालकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशिया खंडात वायू प्रदूषण मृत्यूकरिता सर्वात मोठा धोका असल्याचे तसेच त्यानंतर उच्च रक्तदाब, आहार आणि तंबाखूजन्य पदार्थ या धोक्यांचा नंबर लागत असल्याचे ‘एचईआय' या संशोधन संस्था तर्फे जाहीर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिका देशातील संशोधन संस्था ‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट' (एचईआय) या संस्थेने प्रसिध्द केलेल्या ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर' (एसओजीए) २०२४' नुसार भारतात दररोज, सरासरी वयानुसार ५ वर्षांखालील ४६४ मुले-मुलींचा वायू प्रदूषणाशी संबंधित कारणांमुळे मृत्यू होतो. तंबाखू आणि मधुमेह यांना मागे टाकून मृत्यूच्या धोवयाचा घटक म्हणून वायू प्रदूषण आता प्रथम क्रमांकावर आहे. ‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट' या संस्थेच्या अहवालानुसार २०२१ या वर्षामध्ये जगभरात ८.१ दशलक्ष लोकांचा वायू प्रदूषण संबंधित रोग आणि परिस्थितीमुळे मृत्यू झाला. वायू प्रदूषणामुळे २०२१ या वर्षात जगभरात झालेल्या मृत्यूंमधील चारपैकी एक मृत्यू भारतात झाला. भारत (२.१ दशलक्ष मृत्यू) आणि चीन (२.३ दशलक्ष मृत्यू) आदी देश २०२१ या वर्षी वायू प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अग्रस्थानी होते. भारतातील असंसर्गजन्य रोगांच्या ओझ्यावर वायू प्रदूषणाचा परिणाम झाला आहे. ‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट' या संस्थेच्या अहवालानुसार २०२१ या वर्षात हृदयविकारामुळे सुमारे ४० टक्के मृत्यू, फुपफुसाच्या कर्करोगाने ३३ टक्के मृत्यू, २० टक्के टाईप-२ मधुमेहामुळे मृत्यू, ४१ टक्के स्ट्रोक मृत्यू म्हणजेच ७० टक्के मृत्यू सीओपीडी (क्रोनिकोब्स्ट्रक्टिव्ह फुपफुसीय रोग) वायू प्रदूषणाशी संबंधित होते.‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट' (एचईआय) या संस्थेने प्रसिध्द केलेला ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर' (एसओजीए) अहवाल प्रथमच ‘युनिसेफ'च्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या अहवालात आरोग्य सेवा प्रणाली, अर्थव्यवस्था आणि समाज संबंधांवर ताण आणणाऱ्या दुर्बल तीव्र आजारांनी जगणाऱ्या लाखो लोकांवरही लक्ष केंद्रित केले आहे. पाच वर्षाखालील मुले-मुली यांचे वय अकाली जन्म, कमी वजन, दमा आणि फुपफुसाचे आजार यांमुळे असुरक्षित असते. २०२१ मध्ये वायू प्रदूषणामुळे ५ वर्षाखालील ७ लाखांपेक्षा अधिक मुले-मुलींंचा मृत्यू झाला होता. कुपोषणानंतर ५ वर्षाखालील वयोगटासाठी जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख घटक वायू प्रदूषण बनतात. लहान मुलांमध्ये वायू प्रदूषणाचा निमोनिया आजाराशी संबंध आहे. जागतिक स्तरावर पाचपैकी एक बाल मृत्यूसाठी वायू प्रदूषण जबाबदार आहे. वायू प्रदूषणामुळे लहान मुले-मुलींना अस्थमा, तीव्र श्वसन रोग होतात, असे ‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट' (एचईआय) या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. वायू प्रदूषणाशी संबंधित आजार सरकारी नियमांनुसार सूचित करण्यात येत नाहीत. वायू प्रदूषण जगभरातील मृत्यूंसाठी प्रमुख धोवयाचा घटक आहे. एकूणच अकाली मृत्यूसाठी वायू प्रदूषण सर्वात हानीकारक घटक आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करायचे कोणी?.