वृक्षसंपदेचे शहर

डिसेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत नवी मुंबई महापालिका उद्यान विभाग मार्फत करण्यात आलेल्या वृक्षगणनेत नवी मुंबई शहरात १५ लाख २८ हजार ७७९ वृक्षसंपदा आढळून आल्याने आता उद्यानाचे शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई शहराची वृक्षसंपदेचे शहर अशी नवी ओळख होणार आहे. नवी मुंबई शहरात आणि एमआयडीसी भागात मागील काही महिन्यांपासून विनापरवाना वृक्ष तोडीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आता वृक्षांची गणना झाल्याने नवी मुंबई मधील झाडांचा अचूक आकडा प्राप्त झाला आहे. त्यामुळे भविष्यात विनापरवाना वृक्ष कत्तल झाल्यास झाडांच्या आकडेवारीवरुन कारवाई करणे सोपे होणार आहे.यापूर्वी सन २०१५ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षगणनेनुसार नवी मुंबई शहरात ८ लाख ५७ हजार २९५ वृक्ष होते. त्यामुळे नवी मुंबई शहरात गेल्या ८ वर्षांत जवळपास ६ लाख ७९ हजार ४८४ वृक्षांची वाढ झाल्याचे महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई महापालिकेकडून दर पाच वर्षांनी वृक्षगणना केली जाते. सन २०२४ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षगणनेसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वृक्षगणनेमध्ये नवी मुंबई शहरात जवळपास २१६ प्रकारच्या देशी प्रजातींचे वृक्ष आढळून आले आहेत. गेल्या वेळी नवी मुंबई महापालिकेने सन २०१४ मध्ये वृक्षगणना करण्यास सुरुवात केल्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये  वृक्षगणना पूर्ण झाली होती. या सर्वेक्षणात महापालिका क्षेत्रात ८ लाख ५१ हजार २९५ वृक्ष आढळून आले होते. मध्यंतरी करोना काळामुळे नवी मुंबई शहरातील वृक्षगणना होऊ शकली नाही. त्यामुळे जवळपास आठ वर्षांनी पुन्हा वृक्षगणना करण्यास महापालिकेने सुरुवात केली. डिसेंबर २०२३ मध्ये जीआयएस आणि जीपीएस पध्दतीने महापालिकेने वृक्षगणनेस सुरुवात केल्यानंतर मे २०२४ मध्ये  नवी मुंबई शहरातील वृक्षगणना पूर्ण झाली. अवघ्या पाच महिन्यांत  नवी मुंबई शहरातील वृक्षगणना पूर्ण झाली असून यामध्ये १५ लाख २८ हजार ७७९ वृक्ष आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या वृक्षांमध्ये २१६ प्रकारच्या देशी प्रजातीचे वृक्ष आढळून आले आहेत. यामध्ये गोरख चिंच, चंदन, अंजीर आदी प्रकारची झाडे आहेत. एका व्यक्तीला साधारणतः ७४० किलो ऑक्सिजन लागतो. एक झाड वर्षात १०० किलोपर्यंत ऑक्सिजन देते. एक झाड वर्षभरात २२ किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. एक झाड ६ टक्क्यांपर्यंत धूर, धोके कमी करते. एक झाड प्रदूषित हवेतून १०८ किलोपर्यंत लहान कण शोषून घेते. त्यामुळे झाडांचे महत्व अनन्यसाधारण आहे. १० हेक्टरवरील झाडे तोडली गेली तर तेवढ्याच वनेतर जमिनीवर दुप्पट किंवा तिप्पट झाडे लावायची, असा सरकारी नियम आहे. पण, या नियमाचे कितपत काटेकोरपणे पालन होते का?, याचे उत्तर राज्य वन विभाग देखील देऊ शकणार नाही. राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून, महाराष्ट्र राज्यात आजघडीला वृक्षाच्छादित क्षेत्राचे प्रमाण २० टक्के आहे. त्यामुळेच वृक्षाच्छादन कमी असलेल्या विभागात वृक्षलागवड करुन आणि वृक्ष संवर्धन करुन राज्यातील हरित क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता आहे.हवाई बीज पेरणी असो, इको बटालियन मार्फत करण्यात येणारी वृक्षलागवड असो किंवा वन विभाग आणि लोकसहभागातून होणारी वृक्षलागवड असो ती करताना स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड केली तर पक्ष्यांची अन्नसाखळी विकसित होईल यादृष्टीने जाणीवपूर्वक लक्ष देण्याचीही गरज आहे. एकूणच नवी मुंबई शहरातील झाडे नवी मुंबई शहराच्या वृक्षसंपदेत भर घालणारी आहेत. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ