आपणच अधिक दक्ष होण्याची गरज

 आपणच अधिक दक्ष होण्याची गरज
मृत व्यवतीच्या नावे असलेला भूखंड, गाळा, पलॅट, फार्म हाऊस, इमारत, दुकान, गोदाम, शेत, गॅरेज अशा मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनवून ती मालमत्ता इतरांना विकणे हा काही नव्याने अस्तित्वात आलेला प्रकार नाही. हे देशाच्या कानाकोपऱ्यात सातत्याने कुठे ना कुठे तरी घडत असते. ते कधीतरी संशयाच्या घेऱ्यात येते, कुणीतरी पोलीसांत तक्रार दाखल करते. मग तपासाची चक्रे फिरतात. चौकशा होतात आणि यातील व्हाईट कॉलर गुन्हेगार जेरबंद होतात. त्यातही तक्रार करणारा कमजोर, दुर्बल, शामळू असेल तर अनेकदा पोलीसही त्याला दाद देत नाहीत. मग त्याला कुणा नगरसेवक, पत्रकार, आमदार, खासदार अशा प्रभावशाली लोकांना घेऊन पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते. मगच तपासाची चक्रे फिरतात. ताज्या घटनेत टिटवाळ्याच्या विक्रम बनकर यांच्या आजोबांचा कल्याण पूर्वेस असलेल्या रुविमणी देवी अपार्टमेंट येथील गाळा चंद्रकांत बनकर यांनी अरुण पवार व त्याची पत्नी मनीषा पवार यांच्या नावे परस्पर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात या चंद्रकांत बनकरने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तत्कालिन ड प्रभाग सहाय्यक आयुवतासह पालिकेचा अधीक्षक, दोन लिपिक तसेच दुय्यम निबंधकाला हाताशी धरुन हा सारा बनावट व्यवहार केला होता. यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे जसे कल्याणमध्ये घडले तसेच पनवेल, नवी मुंबई, उरण पनवेल परिसरातही वारंवार घडत असते. येथे महापालिका, नगरपालिकेसह सिडको प्रशासनही कार्यरत असल्याने त्यांच्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांची सामीलकी अशा विविध गडबड घोटाळ्यांच्या व्यवहारात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. सिडकोमधून काही  अधिकारी-कर्मचारी चार-पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत; तरीही त्यांचे निवृत्ती उपरान्त देण्याचे आर्थिक हिशेब सिडकोने अद्याप पूर्ण केलेले नाहीत, याचेही कारण तेच आहे. यातील अनेकांचा विविध प्रकारच्या आर्थिक घोटाळ्यांत, लाचखोरीत प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग आढळून आला असून त्यांची चौकशी सुरु आहे. तर यातील काही जणांनी निवृत्तिनंतर दोन-चार महिन्यांची तुरुंगाची हवाही चाखली आहे. कल्याणच्या उपनिबंधकासह सहाय्यक आयुवतावर गुन्हा दाखल होणे हे केवळ हिमनगाचे टोक आहे. हे विविध ठिकाणी घडत असते. अशा व्यवहारात सामील असलेले अनेकजण आजही उजळ माथ्याने फिरताना दिसत आहेत. म्हणूनच लोकांनी कोणत्याही प्रकारच्या जागेचे, वास्तूचे, स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना त्या जागेची कागदपत्रे व ती जागा स्वतः प्रत्यक्ष पाहावी, तज्ञ वकिलाचा सल्ला घ्यावा व मगच व्यवहारासाठीच्या रकमेची देवघेव करावी हेच उत्तम! 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी