अभिनव संकल्पना

 अभिनव संकल्पना
टाकाऊतून टिकाऊ या संकल्पना अंतर्गत कोपरखैरणे सेक्टर-१४ आणि सेवटर-१९ मध्ये आकांक्षी शौचालय उभारुन नवी मुंबई महापालिका तर्फे ‘अनोखा पायंडा' पाडण्यात आला आहे. स्वच्छता आणि सुशोभिकरणाकडे प्राधान्याने लक्ष देणारी नवी मुंबई महापालिका नेहमीच स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये आघाडीवर राहिली आहे, इतकेआता लपून राहिलेले नाही. विशेष म्हणजे महापालिका तर्फे कोपरखैरणे मध्ये सुरु करण्यात आलेली दोन आकांक्षी शौचालये शासनाच्या निकषानुसार बनविण्यात आल्याची बाब दुर्लक्षित करता येणार नाही. घनकचरा व्यवस्थापनात कचऱ्याचा पुनर्वापर एक महत्वाची बाब असून, कोपरखैरणे येथे आकांक्षी शौचालय उभारताना ४२६ चौ. मी. क्षेत्रफळाच्या पुर्नप्रक्रियाकृत प्लास्टिक शीटचा वापर करण्यात आलेला आहे. याशिवाय ५.३० मेट्रिक टन एकल वापर प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे शौचालयाची सजावट ११ हजार ७०० पेक्षा अधिक प्लास्टिक बाटल्यांचा वापर करुन करण्यात आला असून, त्यातही लक्षवेधी बाब म्हणजे या शौचालयातील विविध सांकेतिक चिन्हे ३५ हजार २०० पेक्षा अधिक बाटल्यांच्या झाकणांचा कलात्मक वापर करुन निर्माण करण्यात आलेली आहेत. तर शौचालय सजावटीसाठी संगणकाच्या ८५ की-बोर्डचा उपयोग करण्यात आलेला आहे. तसेच शौचालयासमोर तयार करण्यात आलेल्या आकर्षक वाहन प्रतिरुपासाठी २८४ किलो इतक्या वजनाच्या टाकाऊ लोखंडी वस्तूंचा वापर करण्यात आलेला आहे. शौचालयासमोर नयनरम्य कारंजे उभारण्यात आले असून, या कारंज्यासाठी प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर करण्यात येत आहे. आकांक्षी शौचालय उभारताना सर्वच बाबींमध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आलेला असून, आकांक्षी शौचालय ‘थ्री आर' संकल्पनेचे उत्त्म उदाहरण आहे. एकूणच आकांक्षी शौचालयांद्वारे नवी मुंबई महापालिकेने टाकाऊ पासून टिकाऊ रचनेचा नवा अविष्कार घडविला आहे. अर्थात, महापालिकेने कोपरखैरणे मध्ये टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेतून दोन आकांक्षी शौचालये उभारली असली तरी या शौचालयांची देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छता याकडेही प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा महापालिकेच्या इतर सार्वजनिक शौचालयांसारखी आकांक्षी शौचालयांची अवस्था होण्याची शवयता नाकारता येणार नाही. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 वाहतुक शिस्तीची गरज