जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग

स्पर्धेतील विजयी संघांचा मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित

नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिकेला शालेय क्रीडा स्पर्धांसाठी जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी मुंबईतील विद्यार्थी खेळाडूंना थेट विभाग स्तरावर आणि तेथून पुढे थेट राज्य स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आढळून येते.

याच उत्साही वातावरणात यावर्षी ‘नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा' जल्लोषात संपन्न होत असून मागील वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने ३५,००० हून अधिक खेळाडू विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेले आहेत. यामधील जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा तुर्भे मधील डॉ. सी. व्ही. सामंत विद्यालय आणि डी. आर. पाटील प्राथमिक विद्यालय येथील मैदानात उत्तम आयोजनात संपन्न झाल्या.

या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षाआतील गटांमध्ये मुलांच्या १३४ आणि मुलींच्या ८८ इतक्या मोठ्या प्रमाणात संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा शुभारंभ ‘शिक्षण संस्था'चे सचिव कमलाकर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ‘संस्था'चे सदस्य चंद्रकांत पाटील, ललीत म्हात्रे, मुख्याध्यापक कोळी, पर्यवेक्षक धनगर, उप मुख्याध्यापिका कोळी, आदि उपस्थित होते. या स्पर्धा आयोजनासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक डुबल आणि इतर सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

महानगरपालिका क्षेत्रातच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असल्याने शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून त्यामुळे विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ‘ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन'कडून अनुभवी पंचाची व्यवस्था करुन देण्यात आल्याने अत्यंत निकोप वातावरणात या स्पर्धा संपन्न होत आहेत.

सदर स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम कबड्डीच्या सामन्यात डॉ. सामंत विद्यालय संघाने २२ गुण संपादन करीत सानपाडा हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज संघावर ६ गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला. १४ वर्षाआतील मुलींच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात नवी मुंबई महापालिका शाळा क्र.३१, कोपरखैरणे संघाने रा. फ. नाईक विद्यालय कोपरखैरणे संघावर १९ विरुध्द १७ असा २ गुणांनी मात केली.  

१७ वर्षाआतील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात रा. फ.नाईक विद्यालय संघाने ३५ विरुध्द २३ असा डॉ. सी. व्ही. सामंत विद्यालय संघाचा १२ गुणांनी पराभव केला. १७ वर्षाआतील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात रा. फ. नाईक विद्यालय संघाने (२८ गुण) नवी मुंबई महापालिका शाळा क्र.१०४, रबाले संघावर (२५ गुण) अशी ३ गुणांनी मात केली.

१९ वर्षाआतील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात रा. फ. नाईक विद्यालय संघाने डॉ. सी. व्ही. सामंत विद्यालय संघावर १५ गुणांनी मात केली. तर १९ वर्षाआतील मुलींच्या गटात रा. फ. नाईक विद्यालयाने के.बी.पी. कॉलेज, वाशी संघावर २१ गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.

 या स्पर्धेत विजयी झालेल्या संघांनी मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतून विजयी होत पुढील स्पर्धेकरिता पात्र झालेल्या संघांचे अभिनंदन करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पुढील उत्तम कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत. 

 

Read Previous

राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय खो खो संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

Read Next

कोपरखैरणे मधील खो-खो खेळाडू वैष्णवी जाधव हिची महाराष्ट्र संघात निवड