नवी मुंबई शहर जागतिक महिला फुटबॉलपट्टूंचे स्वागत करण्यासाठी सज्ज
‘१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा'साठी नवी मुंबई सज्ज
नवी मुंबई ः ११ ऑक्टोबर पासून भारतात सुरु झालेल्या ‘१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा-२०२२'मध्ये नवी मुंबईतील पहिला सामना आज १२ ऑक्टोबर रोजी नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये संपन्न होत आहे. त्याअनुषंगाने जगभरातील १८ देशांच्या १७ वर्षाखालील महिला फुटबॉल संघांचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई शहर सज्ज झालेले आहे.
नवी मुंबईत सामने खेळण्यासाठी आलेल्या संघांच्या सरावासाठी नवी मुंबई महापालिकाने नेरुळ, सेक्टर-१९ए येथे विकसित केलेल्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान उपलब्ध करुन दिलेले आहे. त्यामध्ये ८ ऑक्टोबर रोजी सकाळी स्पेनच्या महिला संघाने तर सायंकाळी चीनच्या महिला संघाने सराव केला. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार या फुटबॉल मैदानात सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असून पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा त्वरित निचरा होण्याची व्यवस्था याठिकाणी आहे. त्यामुळे मैदानात पाणी थांबून रहात नाही.
८ ऑक्टोबर रोजी सकाळपासून पाऊस असल्याने स्पेनच्या संघ प्रशिक्षकांनी सरावासाठी उपलब्ध करुन दिलेल्या विविध मैदानांची पाहणी वन त्यामध्ये सरावासाठी प्रथम पसंती देत यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील फुटबॉल मैदानाची निवड केली. तसेच तेथील व्यवस्थेचे कौतुक केले. अशाच प्रकारे त्याच दिवशी संध्याकाळी चीनच्या संघाने तसेच त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी कोलंबियाच्या महिला संघानेही सदर ठिकाणी सराव करुन मैदानावरील योग्य प्रमाणात असलेली हिरवळ आणि मैदानाचे व्यवस्थापन याचे कौतुक केले.
फिफाचे सल्लागार आणि मैदान निरीक्षक गॅब्रिअल गल्लेगॉस यांनी मैदानाची पाहणी करुन तांत्रिक तपासणी केली. सतत २ दिवस तीन संघांनी सराव करुनही मैदानाची स्थिती अतिशय उत्तम असल्याचा शेरा त्यांनी नोंदविला. यापुढील काळात डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये स्पर्धेत खेळण्यासाठी येणारे आणखी काही देशांचे संघ सरावासाठी याच मैदानाला प्राधान्य देतील, असा अभिप्राय त्यांनी दिला.
‘१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा-२०२२'मध्ये १२, १५, १८, २१ आणि ३० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रत्येक दिवशी २ अशाप्रकारे नियोजित सामने खेळण्यासाठी जगभरातील विविध देशांच्या महिला फुटबॉलपटू तसेच विविध देशांतून प्रेक्षकही येणार असल्याने यजमान शहर म्हणून नवी मुंबई सज्ज झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात मुख्य ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणाच्या सुशोभिकरणांतर्गत फुटबॉल खेळाचा प्रचार करणारी भित्तीचित्रे रेखाटण्यात आली आहेत. विविध चौकांमध्ये फुटबॉलच्या शिल्पाकृती साकारण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये पातळीवर विविध उपक्रम आयोजित करुन फुटबॉल खेळाची वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे.
अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई शहर जागतिक महिला फुटबॉलपटुंचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. डॉ.डी.वाय.पाटील स्टेडियम येथील पहिला सामना १२ ऑक्टोबरला सायं. ४.३० वाजता मेक्सिको आणि चीन या संघांमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे दुसरा सामना त्याच दिवशी रात्री ८ वाजता स्पेन आणि कोलंबिया यांच्यामध्ये रंगणार आहे.