फुटबॉलच्या विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्याकरिता संपूर्ण नियोजन केले जाईल - ना. धर्मेंद्र प्रधान

भारतात मुलांमध्ये फुटबॉलप्रेम रुजविण्यासाठी ‘फिफा'चा सामंजस्य करार

नवी मुंबई ः १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा-२०२२ आयोजित करण्याचा बहुमान यावर्षी भारताला लाभलेला असून या स्पर्धेतील १० सामने नेरुळ मधील डॉ.डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये संपन्न झाले. विशेष म्हणजे स्पर्धेचा अंतिम सामनाही नवी मुंबईत संपन्न झाला.

स्पर्धेचे यजमान शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेने खेळाडू आणि क्रीडाप्रेमी रसिकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. तसेच शहरात फुटबॉल वातावरण निर्मितीसाठी चित्रभिंती, शिल्पाकृती, चित्ररथ, बलुन्स, शाळांमधील उपक्रम अशा विविध माध्यमांचा उपयोग करण्यात आला. स्पर्धेच्या सामन्यांपूर्वी संघांना सराव करण्यासाठी महापालिकेच्या नेरुळ, सेक्टर-१९ए येथील यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाला विविध देशांच्या संघांनी प्रथम पसंती दिली. स्पेन, चीन, मलेशिया अशा विविध देशांच्या संघांनी फुटबॉल मैदानावरील हिरवळीचे आणि तेथील व्यवस्थेचे मुक्तकंठाने कौतुक केले.

याच मैदानावर ३० ऑक्टोबर रोजी अंतिम सामन्यापूर्वी फिफा आणि केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामध्ये फुटबॉल खेळाच्या विकासाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्वाचा सामंजस्य करार झाला. भारत सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षण- कौशल्य विकास मंत्री ना. धर्मेंद्र प्रधान तसेच ‘फिफा'चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जियानी इन्फॉटिनो यांनी सामंजस्य कराराचे माहितीपत्र अनावरण केले. याप्रसंगी केंद्रीय गृह-क्रीडा राज्यमंत्री ना. निशीथ प्रामाणिक, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर तसेच केंद्र-राज्य शासनाचे संबंधित विभागांचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

फुटबॉलच्या माध्यमातून मुलांमध्ये जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी ‘फिफा'च्या वतीने जागतिक पातळीवर फुटबॉल फॉर स्कुल असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून शैक्षणिक उपक्रमांमध्ये फुटबॉल खेळातून सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील २.५० कोटी मुलांना सोबत घ्ोऊन सदर उपक्रम राबविला जात असून त्याबाबतचा सामंजस्य करार कार्यक्रम नवी मुंबईतील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणामध्ये ‘ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन'च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.

भारतातील मुलांमध्ये फुटबॉल खेळात उंची गाठण्याची क्षमता असून मुले फुटबॉलमध्ये भारताचा नावलौकिक उंचावतील, असा विश्वास यावेळी ‘फिफा'चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जियानी इन्फॉटिनो यांनी व्यक्त केला. फुटबॉलच्या शास्त्रशुध्द प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण, विकास आणि सक्षमीकरण असे तिन्ही उद्देश साध्य होतील, असेही ते म्हणाले. फुटबॉलच्या विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्याकरिता सरकारमार्फत संपूर्ण नियोजन केले जाईल, असे ना. धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. ना. दिपक केंसरकर यांनी राज्यातील शाळा-शाळांमधून मुलांमधील फुटबॉलच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याची भूमिका विषद केली. राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही क्रीडांगणाची पाहणी करीत मुलांचा उत्साह वाढविला.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका शाळांतील १० क्रीडा शिक्षक तसेच ५० विद्यार्थी आणि ५० विद्यार्थिनींना फुटबॉल फॉर स्कुल या उपक्रमाचा शुभारंभ होताना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याची प्रात्यक्षिके मान्यवरांसमोर सादर करण्यात आली. 

Read Previous

लीग सामन्यांव्दारे पालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी

Read Next

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ