‘मृत्यु'चा रस्ता

मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण परिसरात वाहनांची ये-जा सुरु असणारा सायन-पनवेल महामार्ग भरधाव वेगासाठी प्रसिध्द आहे. सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ सुरु असते. मात्र, वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावर वाशी ते कळंबोली दरम्यान गेल्या ३ वर्षात झालेल्या १११ अपघातांपैकी ७५ अपघात (६७ टक्के) उड्डाणपुलाच्या सुरुवातीला आणि उड्डाणपुलाच्या उतरावर झाल्याचे तसेच काही ठिकाणी पादचारी पुल नसल्याने झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच सायन-पनवेल महामार्गावरील अपघातांमधील ३९ मृतांपैकी २९ मृत्यू (७४ टक्के) या महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ ठराविक १४ ठिकाणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीनुसार सायन-पनवेल महामार्ग ‘मृत्यु'चा रस्ता बनत चालल्याचे वास्तव समोर येत आहे. सायन-पनवेल महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणी वेळीच उपाययोजना केल्या गेल्यास रस्ते अपघातात होणारी जीवीतहानी टाळता येणे शक्य असल्याचे नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. वाहन अपघात टाळण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची सूचना नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील सायन-पनवेल महामार्गावर मागील ३ वर्षात झालेले अपघात आणि त्यातील मृत्यूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागाकडून सायन-पनवेल मार्गावरील अपघातांच्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला आहे. या अवलोकनात सायन-पनवेल मार्गावरील उड्डाणपुलाच्या सुरुवातीस आणि उतारावर अनेक वाहन अपघात झाल्याचे तसेच काही ठिकाणी पादचारी पुल नसल्याने अपघात झाल्याचे आढळून आले आहे. सायन-पनवेल महामार्गावर झालेले बहुतांशी अपघात वाशी खाडीपुल, वाशी प्लाझा, सानपाडा, एलपी, शिरवणे, उरणफाटा, सीबीडी, हिरानंदानी, कोपरा, पुरुषार्थ पेट्रोलपंप, कामोठे आणि कळंबोली कॉलनी आदी ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाजवळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये या उड्डाणपुलाजवळ एकूण ६१ वाहन अपघात झाले असून, या अपघातात २४ व्यवतींचा मृत्यू तर ६३ नागरिक जखमी झाले आहेत. दुसरीकडे वाशी गाव आणि तुर्भे उड्डाणपुल येथे पादचारी पुल नसल्याने रस्ता ओलांडताना झालेल्या १४ अपघातात ५ व्यवतींचा मृत्यू तर १७ जण जखमी झाले आहेत. सायन-पनवेल मार्गावर २०१९ पासून मार्च-२०२१ पर्यंत झालेल्या एकूण १११ अपघातांपैकी ७५ अपघात (६७ टक्के) उड्डाणपुलाच्या सुरुवातीला आणि उड्डाणपुलाच्या उतारावर झाल्याचे तसेच काही ठिकाणी पादचारी पुल नसल्यामुळे झाल्याचे नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी केलेल्या अवलोकनावरुन स्पष्ट होत आहे. एकूणच भरधाव वेगासाठी प्रसिध्द असलेला सायन-पनवेल महामार्ग रस्ते अपघातांना निमंत्रण देत आहे. महामार्गावरील अपघातांमुळे सायन-पनवेल महामार्ग ‘मृत्यु'चा महामार्ग देखील बनत चालला आहे. सायन-पनवेल महामार्गावर सुरक्षित वाहने चालविण्याची दक्षता चालकांनी घेतली तर त्यांचेच भले होणार आहे. पण, लक्षात घेतो कोण?. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

‘एनडीटीव्ही'चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रविश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा